बीड जिल्ह्यात ११ हजार शेतकरी हरभरा खरेदीपासून वंचित

हरभरा
हरभरा

बीड  ः हरभरा खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रांना दिलेली मुदतवाढ संपल्यानंतरही ऑनलाइन नोंदणी केलेले ११ हजार ४९० शेतकऱ्यांवर हमीभावापासून वंचित राहण्याची वेळ ओढावली आहे.

हरभरा खरेदीसाठी बुधवारी (ता. १३) अंतिम मुदत होती. त्यानुसार खरेदी केंद्रे बंद होईपर्यंत ऑनलाइन नोंद केलेल्या २० हजार ९५६ शेतकऱ्यांचा तब्बल २ लाख ९१ हजार ४५४ क्विंटल इतका हरभरा नाफेडकडून खरेदी झाला. परिणामी, नोंदणीनंरतही साडेअकरा हजार शेतकऱ्यांना आता त्यांचा जवळपास १ लाख क्विंटल इतका हरभरा व्यापाऱ्यांना विक्री करावा लागणार असून, त्यांना आता शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडमार्फत हमीभावाने होणाऱ्या हरभरा खरेदीचा प्रश्न बिकट बनला आहे. हरभरा खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रांना यापूर्वी ९ जून ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, सदरील अंतिम तारखेपर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेल्या एकूण ३२ हजार ४४६ शेतकऱ्यांपैकी केवळ १२ हजार ३९९ शेतकऱ्यांचा १ लक्ष ७२ हजार ३६२ क्विंटल हरभऱ्याचीच खरेदी होऊ शकली होती.

मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरेदीपासून वंचित असल्याने शासनाने यानंतर १३ जूनपर्यंत खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली होती. मात्र, त्यातही सुरवातील जिल्ह्यातील बारदाना संपला असल्याने तो उपलब्ध होईपर्यंत दोन दिवसांचा कालावधी वाया गेला अन्‌ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात तीनच दिवसांचा अवधी खरेदीसाठी मिळाला. या मुदतवाढीमध्ये नोंदणी केलेल्या आणखी साडेआठ हजार शेतकऱ्यांचा १.१९ लक्ष क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आला.

खरेदी केंद्र बंद होईपर्यंत जिल्ह्यातील एकूण २० हजार ९५६ शेतकऱ्यांच्या २ लाख ९१ हजार ४५४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अंबाजोगाई येथील खरेदी केंद्रावर सर्वाधिक ८३ हजार ३३५ क्विंटल इतकी खरेदी झाली असून, पाटोदा येथील खरेदी केंद्रावर सर्वांत कमी म्हणजेच फक्त २ हजार ६९९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीमती एस. के. पांडव यांनी दिली.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेडकडून खरेदी करण्यात आलेल्या २.९१ लक्ष क्विंटल हरभऱ्यापैकी केवळ ३७ हजार ९७८ क्विंटल इतकाच हरभरा गोदामांमध्ये साठवण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडील गोदामे यापूर्वीच झालेल्या तुरीच्या खरेदीमुळे हाऊसफुल झालेली आहेत. त्यामुळे उर्वरित २ लाख ५३ हजार क्विंटल हरभरा हा संबंधित खरेदी केंद्रावर उघड्यावरच पडून आहे. यापूर्वी खरेदी झालेला जवळपास १९ हजार क्विंटल हरभरा पावसात भिजल्याने या वेळी मार्केटिंग फेडरेशनने काळजी घेऊन उघड्यावर पडलेला हा हरभरा बारदान्यात भरून त्यावर ताडपत्रीचे अाच्छादन टाकल्याचे समजते.

ऑनलाइन नोंदणीनंतरही जिल्ह्यातील साडेअकरा हजार शेतकरी हरभरा खरेदीपासून वंचित राहिले आहेत. शासकीय खरेदी केंद्रे बंद होईपर्यंत या शेतकऱ्यांच्या मालाची खरेदीच होऊ न शकल्याने या शेतकऱ्यांचा जवळपास १ लक्ष क्विंटलहूनही अधिक शेतीमाल घरीच पडून आहे.

या शेतकऱ्यांना आता हमीभाव मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून या शेतकऱ्यांना आता आपला माल हा खासगी व्यापाऱ्यांनाच विकावा लागणार आहे. खरेदी केंद्रे बंद होताच एवढ्या दिवस हमी भावासाठी प्रतीक्षा करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी आता आपल्याकडील हरभऱ्याचा माल विक्री करण्यासाठी व्यापाऱ्याकडे धाव घेतली असल्याचे समजते. आता मिळेल त्या भावाने हरभरा घालण्याची वेळ वंचित शेतकऱ्यांवर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com