नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी बंद

हरभरा खरेदी
हरभरा खरेदी

नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा नसल्याने नगर जिल्ह्यातील सहा हरभरा खरेदी केंद्रे बंद आहेत. मागणी करूनही वखार महामंडळाकडून गोदाम उपलब्ध होत नाही. सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यांतून पाठवलेल्या गाड्या परत आल्या आहेत. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशनसह केंद्रचालक त्रस्त झाले आहेत.

हमीभावाने खरेदीसाठी तुरीपाठोपाठ शासनाने हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यात सुरवातील एक लाख तेरा हजार क्विंटल तूर खरेदी झाली होती. मात्र, मागणी झाल्यानंतर पुन्हा खरेदीला मुदत वाढवून दिली. त्यामुळे आता तूर खरेदीचा आकडा एक लाख २३ हजार १६० क्विंटलवर गेला.

मनुष्यबळाचा विचार करून आणि खरेदी करणे सोपे जावे म्हणून नाफेडने तूर खरेदी सुरू असलेल्या ठिकाणीच हरभरा खरेदी सुरू केली. सध्या जिल्ह्यामध्ये तेरा ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. आतापर्यंत १० हजार ६६८ शेतकऱ्यांकडून १ लाख ११ हजार ४४४ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे, तर तब्बल ५६ हजार २४१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. मात्र, आता हरभरा खरेदीतदेखील अडचणी येऊ लागल्या आहेत.

जिल्ह्यामधील वखार महामंडळाची गोदामे हाऊसफुल्ल झाली आहेत. शेजारच्या जिल्ह्यामध्ये काही साठवण केलेली आहे. त्यामुळे नव्याने खरेदी केलेला हरभरा साठवायला जागा नाही. दोन दिवसांपासून पारनेर, शेवगाव, कोपरगाव, कर्जत, राहुरी व राहाता या सहा ठिकाणी हरभरा खरेदी बंद आहे. जवळपास साठवणुकीसाठी जागा नसल्याने थेट पनवेल (जि. रायगड) येथे जागा असल्याचे सांगून तेथे हरभरा नेण्याचे सांगितले जात आहे.

मात्र, एवढ्या दूरवर नेण्यासाठी एका ट्रकला तब्बल पंचवीस ते तीस हजारांचा खर्च येतो. एवढा खर्च करायला खरेदी केंद्र चालकही तयार नाही. त्यामुळे हरभरा खरेदीच्या अडचणी वाढल्या आहेत. मार्केटिंग फेडरेशनने गोदामे उपलब्ध करून देण्याची विनंती केली जात असली तरी अजूनही साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध झाले नसल्याने अजून तरी हरभरा खरेदी केंद्रे बंद आहेत. जिल्ह्यामध्ये अजून साधारण साठ ते सत्तर हजार क्विंटल हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. ऑनलाइन नोंदणीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

जिल्ह्यामध्ये गोडाऊन उपलब्ध नसल्याने हरभरा खरेदीला अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांची अडचणी कमी करण्यासाठी वखार महामंडळाने तातडीने गोडाऊन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com