फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा बहिष्कार
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेने रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेवर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. २२) चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवक संघटनेने या योजनेवर बहिष्कार टाकल्याचे या वेळी सांगण्यात आले. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप कदम म्हणाले, की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची कामे कृषी विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. तरीही जिल्हा परिषद स्तरावरून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांवर फळबाग लागवडीची कामे जबरदस्तीने लादली जातात, त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी फळबाग लागवड कामास विरोध करून त्यावर बहिष्कार टाकला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी विविध वैयक्तिक तसेच सार्वजनिक लाभाची कामे केली जातात. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात फळबाग लागवडीवर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीची मुख्य जबाबदारी राज्य सरकारच्या कृषी विभागावर सोपवण्यात आली आहे. तसा शासन निर्णयदेखील यापूर्वी पारित झाला आहे. फळबाग लागवडीबाबत स्पष्ट शासन निर्णय असताना ही कामे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांवर जबरदस्तीने लादली जात आहेत. प्रत्येक गावात हेक्‍टरी प्रमाणात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. मुळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय योजना राबवल्या जातात. शासनाने एखादी नवीन योजना जाहीर केल्यास प्रथमतः ती ग्रामपंचायतीवर लादली जाते. शासन निर्णयात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी नसली तरी त्यांना योजनेच्या अंमलबजावणीत जबरदस्तीने गोवले जाते. गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवडीची कामे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी राबवीत आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत उद्दिष्टपूर्ती न झालेल्या ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मुळात जबाबदारी नसतानाही काम करूनही कारवाईला सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com