पुणे विभागात ‘जलयुक्त’च्या कामांसाठी १५४ कोटींचा निधी : डॉ. म्हैसेकर

जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार
पुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१८-१९ मधील कामांकरिता पुणे विभागातील ५९९ गावांसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला अाहे. या कामांचा गाव आराखडा तयार करून त्याला ग्रामसभेची मंजुरी घ्‍यावी, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिल्या आहेत. पुणे विभागात सुरु असलेली ‘जलयुक्त’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही डॉ. म्हैसेकर यांनी दिले आहेत. 
 
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्‍हापूर या जिल्‍ह्यातील जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. १७) घेतला. पुण्याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याच्या जिल्‍हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्‍हापूरचे  जिल्‍हाधिकारी अविनाश सुभेदार, सोलापूरचे अपर जिल्‍हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सांगली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपायुक्‍त अजित पवार, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आैटी अादी उपस्थित होते.
 
डॉ. म्हैसेकर म्हणाले, की यंदा जलयुक्‍त शिवार अभियानात विभागातील ५९९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पुणे जिल्‍ह्यातील २१९, साताऱ्यातील ९०, सांगलीतील ९२, सोलापुरातील ११८ आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील ८० गावांची निवड झाली करण्यात आली आहे. यासाठी १५४ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, निधीची कमतरता भासणार नाही. या गावांचा आराखडा तयार करुन ग्रामसभेची तातडीने मंजूरी घ्‍यावी, असे अादेश डाॅ. म्हैसेकर यांनी यावेळी दिले. 
 
जलयुक्‍त शिवार अभियानात २०१७-१८ मध्ये विभागात ८२३ गावांची निवड करण्‍यात आली होती. या गावांमध्ये प्रस्‍तावित केलेल्‍या २७ हजार २०० कामांपैकी १४ हजार २११ कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ७३ कामे प्रगतिपथावर आहेत. सर्व कामांवर ६५ कोटी ४५ लाख रुपये खर्च झाले आहेत.
 
‘मागेल त्‍याला शेततळे’ या योजनेअंतर्गत विभागाला १७ हजार ३२० शेततळ्यांचा लक्ष्‍यांक देण्‍यात आला होता. त्‍याकरिता ५६ हजार ५६८ अर्ज प्राप्‍त झाले होते. यातील ३२ हजार ५३९ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्‍यात आले आहेत. ११ हजार ९०६ कामे पूर्ण झाली असून, ८७८ कामे प्रगतिपथावर अाहेत. ११ हजार ७०७ शेततळ्यांना अनुदान दिले असल्याची माहितीही बैठकीत देण्‍यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com