नाशिक जिल्ह्यातून १५०० टन द्राक्ष निर्यात

द्राक्षे
द्राक्षे
नाशिक : जिल्ह्यातून चालू हंगामातील द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत १५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. येत्या जानेवारीपासून जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.  
 
जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. १३६० टन द्राक्षे रशियात, मलेशियात ६०, तर श्रीलंकेत ८० टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे.गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातून १ लाख ३१ हजार टन द्राक्ष निर्यातीची नोंद झाली होती.
 
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ३.५ लाख एकरांत द्राक्षबागांची लागवड झाली आहे. त्यापैकी २ लाख एकर लागवड एकट्या नाशिक जिल्ह्यात झाली आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी जिल्ह्यातून ९० टक्के द्राक्ष निर्यात केली जाते.
 
नाशिक जिल्ह्यातून युरोपसाठी ४०,११० एकर क्षेत्रावरील निर्यातक्षम द्राक्षांची नोंदणी झालेली आहे. २५,०५७ द्राक्ष उत्पादकांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र रशिया, चीन, इंडोनेशिया, अरब राष्ट्रांसाठी नियम कडक केले आहेत.
 
गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. गेल्या वर्षी द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आल्याने मातीमोल भावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. मात्र या हंगामात परतीचा पाऊस, ओखी वादळ यातून मोठा खर्च करून हे पीक वाचवले आहे.
 
सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी भारतातील, विशेषत: नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना वाढती मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com