येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात

मागील दहा वर्षात द्राक्ष निर्यातीचा आलेख उंचावत राहिला असून यंदा तर विक्रमी निर्यात झाली आहे. शेतकरीदेखील प्रतिकूल वातावरण असताना सकारात्मक राहिले आहेत. आम्ही प्रयत्न केले, पण शेतकऱ्यांनी जिद्दीने उत्पादन घेतले. - अभय फलके, तालुका कृषी अधिकारी, येवला, जि.नाशिक.
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात
येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची तहान टॅंकरच्या पाण्याने भागवण्याशिवाय पर्याय नसलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र प्रयोगशीलतेच्या जोरावर पाणीटंचाईलादेखील शरण आणले आहे. पाणीटंचाई असतानादेखील येथील २०० शेतकऱ्यांनी यंदा २८७३ मेट्रिक टन द्राक्ष युरोपियन देशांत निर्यात केले आहेत. दोन वर्षांपूर्वी निर्यातीचा आकडा ३२ शेतकरी व ४०० टन इतका होता, तोच यंदा चार पटीने वाढल्याचे आकडे सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांची ही भरारी प्रेरणादायी आहे.
 
राज्यातील टंचाईग्रस्त असलेल्या ९४ तालुक्यांच्या यादीत आजही येवल्याचे नाव पुढे असते. पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे शेतकरी शेततळ्यांसह अनेक पर्याय शोधून शेतीला बागायती करत आहेत. किंबहुना याचमुळे पीकपद्धती बदलून मका, कपाशी अन् कांदा हे पीक येथील मुख्य बनले आहेत, असे असले तरी स्कॉर्च बोनेट मिरची, बांबू, केसर आंबा, हळद, केळी, शेवगा, आले अशा पिकांची शेतीदेखील येथे अल्प पाण्यावर फुलली आहे. येथील शेतकरी प्रयोगशील असल्याने स्वस्थ बसत नाहीत, म्हणूनच टंचाईच्या झळांना न जुमानता परदेशातही आपल्या यशाचा सुंगध दरवळत आहे, हे विशेष.  
 
तालुक्याच्या पूर्व भागात तर पाण्याअभावी आठमाही शेती करणेच शक्य आहे. पश्चिम भाग पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र हे पाणीही बेभरवशाचे आहे. तरीही शेतकऱ्यांनी याचे नियोजन करून शेती बागायती केली असून द्राक्षासारखे पीक यशस्वीपणे घेतले आहे, इतकेच नव्हे तर ते परदेशातदेखील पोचवले आहे. द्राक्ष निर्यातीत एकवेळ नामोनिशाण नसलेल्या या तालुक्याने आता यात मोठी झेप घेतली आहे.
 
यंदा कृषी विभागाकडे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ४५५ शेतकऱ्यांनी ११५ हेक्टर क्षेत्र नोंदवले होते. यापैकी २३८ शेतकऱ्यांनी नोंदी नूतनीकरण केल्या तर प्रथम नोंदणी करणारे २१७ शेतकरी होते. यापैकी २०१ शेतकऱ्यांच्या शेतातून २८७३ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.
 
कृषी विभागाने शेतकऱ्यांची नोंदणी करताना एनआरसी, द्राक्ष बागायतदार संघ यांच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले होते. शेतकऱ्यांनी मेहनतीने निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित केल्याने अपेडासह निर्यातदारांच्या मदतीने ही द्राक्ष युके, रशिया, बांगलादेश, जर्मनी, नेदरलॅंड, इटली, स्पेन, स्वित्झर्लंड आदी देशांत पोचली आहेत. 
 
साहेबराव बोराडे (मुखेड), साहेबराव बोरनारे, बाळासाहेब पिंपरकर (पाटोदा), अनिल कदम (निळखेडे), विजय वावधाने (देशमाने), योगेश्वर ठोंबरे (पिंपरी) आदी शेतकऱ्यांनी निर्यातीत उच्चांक साधला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह नोंदणीसाठी तालुका कृषी अधिकारी अभय फलके, फायटो सॅनेटरी इन्स्पेक्टर प्रकाश जवने, साईनाथ कालेकर यांचे सहकार्य मिळाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com