बेदाण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापण्याची आवश्यकता : पवार  

अनेक समस्या असूनही द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने साडे तीन लाख एकरपर्यंत द्राक्ष बागा उभारल्या आहेत. ४० लाख टनांचे उत्पादन आणि दोन लाख टनांची निर्यात करून गेल्या हंगामात दोन हजार कोटींचेपरकीय चलनदेखील तुम्ही मिळवून दिले. दोन लाख टनांचे बेदाणा उत्पादन घेताना ५० हजार टनांची केलेली बेदाणा निर्यातही कौतुकास्पद आहे.
संघाच्या अधिवेशनात बोलताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
संघाच्या अधिवेशनात बोलताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

पुणे : स्थानिक बाजारापेठांवर आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. केंद्र सरकारने देखील रेल्वे, विमानतळ व बंदरावरदेखील विक्री व्यवस्थेची साखळी तयार करीत बेदाण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ व जहाजमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, खा. हरिश्चंद्र चव्हाण, महाग्रेप्सचे प्रमुख सोपान कांचन, बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे आणि उपाध्यक्ष राजेंद्र पवार, महेंद्र शाहीर व्यासपीठावर उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, की अनेक समस्या असूनही द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने साडे तीन लाख एकरपर्यंत द्राक्ष बागा उभारल्या आहेत. ४० लाख टनांचे उत्पादन आणि दोन लाख टनांची निर्यात करून गेल्या हंगामात दोन हजार कोटींचे परकीय चलनदेखील तुम्ही मिळवून दिले. दोन लाख टनांचे बेदाणा उत्पादन घेताना ५० हजार टनांची केलेली बेदाणा निर्यातही कौतुकास्पद आहे. 

राज्याचे भौगोलिक क्षेत्र फलोत्पादनासाठी चांगले आहे. त्यामुळे द्राक्ष, संत्री, केळी, आंबा, सीताफळ आणि इतर फळांच्या उत्पादनासाठी केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. केंद्र सरकारने द्राक्षउत्पादकांना अत्यावश्यक ठिकाणी मदत केली पाहिजे, असे सांगतांना पवार यांनी ‘शेतीच्या प्रश्नात आस्था असलेला मंत्री म्हणून आम्ही नितीन गडकरी यांच्याकडे बघतो, असे भाषणात नमूद केले. तसेच, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणारे मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.   

‘सालकरी टिकत नाही; मी ४३ वर्षांपासून येतोय’ मी १९७४ पासून संघाच्या अधिवेशनाला हजेरी लावतो आहे. गेल्या ४३ वर्षांपासून न चुकता अधिवेशनाला येतोय. खरे तर इतके वर्ष सालकरी देखील टिकत नाही, असे पवार यांनी आपल्या भाषणात सांगताच सभागृहात हशा पिकला.

‘सीसीसीप्रकरणी शेतकऱ्यांचा दोष नव्हता’ खासदार हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले, ‘‘मी स्वतः द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. मी पूर्वी नागरी, भात पिकवायचो; पण आता द्राक्ष पिकवू लागलो आहे. मला द्राक्षक्षेत्रातील समस्यांची जाण आहे. २०१०च्या द्राक्ष निर्यातीच्या सीसीसी प्रकरणात समुद्रात द्राक्ष फेकून द्यावी लागली. शेतकऱ्यांचा काहीही दोष नसताना फटका बसला. त्यामुळे आम्ही एकजूट करून श्री.गडकरी यांना लक्ष घालण्याची विनंती केली. परिणामी आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे. मात्र, काहीही व्यापारी खोडा घालत असून शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे.     निर्यातीसाठी केंद्राची मदत हवी ः कांचन  श्री. सोपान कांचन या वेळी म्हणाले : निर्यात आता सहा हजार कंटेनरपर्यंत केली आहे. मात्र, भारतीय द्राक्षाला संधी असून, इतर देशांची दालने खुली होण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. शेतकरी आता झिरो रेसिडयूची द्राक्ष तयार करू लागला आहे.  राज्यात बेदाणा पार्क झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. बांगलादेश सरकारशी चर्चा करून तेथील द्राक्ष आयातकर कमी करणे, वाइन उत्पादकांसाठी देशभर समान कर, एनएचबीच्या बंद योजना सुरू करणे आदी मागण्या कांचन यांनी केल्या. सीसीसीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी श्री. पवार व श्री. गडकरी यांनी लक्ष घातल्यामुळे भरपाईचा प्रस्ताव अपेडाकडे अंतिम टप्प्यात आहे. मदत लवकरच मिळण्याची शक्यता आहे, असेही कांचन म्हणाले.  डॉ. जयराम खिलारी यांचा सत्कार  राज्याच्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांसाठी संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयराम खिलारी यांना या वेळी मानपत्र देऊन या वेळी गौरविण्यात आले. गेल्या ४५ वर्षांपासून संघासाठी कार्यरत असललेले डॉ. खिलारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com