ओखी चक्रीवादळामुळे द्राक्ष, कांदा, आंबा संकटात

सटाणा तालुक्यातील विशाल कापडणीस यांच्या तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत.
सटाणा तालुक्यातील विशाल कापडणीस यांच्या तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत.

पुणे : ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी (ता. ५) पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड तालुक्यांसह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर रत्नागिरी जिल्ह्यात दुपार पर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याच्या अन्य भागांतही पावसाने हजेरी लावली. निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक, सटाणा या तालुक्यांतील अनेक भागांत पावसामुळे द्राक्ष बागा, कांदा, डाळींब आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे आंब्याच्या मोहरावर परिणाम होऊन नुकसान होण्याची भीती आहे.

मंगळवारी पहाटेनंतर दुपारपर्यंत अवकाळी पावसाने निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर, निफाड, नैताळे व उगाव परिसरातील गावांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. लासलगाव परिसरात वनसगाव, सारोळे खुर्द शिवडी, ब्राह्मणगाव, वनस येथील काही शेतांमध्ये प्रचंड वाऱ्याने पाणी साचून पावसामुळे काही द्राक्ष बागावरील द्राक्ष घड खाली पडले. तसेच द्राक्ष बागांच्या पानांची पाणगळ झाली आहे. निफाड शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी पहाटे सोसाट्याचा वारा होता. विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला आहे. तसेच रोगट वातावरण बरोबरच सकाळी तालुक्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते. पावसाने होणाऱ्या नुकसानीस कसे सामोरे जावे या विवंचनेत शेतकरी आहेत. द्राक्ष, कांदा, गहू, डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून, पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. किनाऱ्यावर अजस्र लाटांचा मारा सुरूच आहे.

वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात मालवणात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सावंतवाडी परिसरात मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. कणकवली, देवगड तालुक्यांतही मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टी भागात पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने मच्छीमारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्री समुद्राला आलेले उधाण कमी झाले आहे. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत वाऱ्याचा जोर कायम होता. गणपतीपुळे किनाऱ्यावर संरक्षक कठड्यापर्यंत रात्री पाणी आले होते. रात्रीच्या तुलनेत दुपारी एकपर्यंत लाटांचा जोर काहीसा कमी झाला आहे. हर्णे बंदर येथे समुद्राला उधाण आल्याने किनाऱ्यावरील काही दुकानांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com