रस, मनुक्यासाठी द्राक्षाचे नवे वाण

एआरआय-५१६ द्राक्ष वाणाचा घड
एआरआय-५१६ द्राक्ष वाणाचा घड

पुणे : येथील आघारकर संशोधन संस्थेने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीसाठी ‘एआरआय-५१६’ ही नवी जात विकसित केली आहे. सध्या देशभरातील सात संशोधन केंद्रांवर या जातीचा इतर पाच रसांच्या द्राक्ष जातींच्या बरोबरीने तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांकडेही या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही जात लागवडीसाठी उपलब्ध होईल, असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले. द्राक्ष जातीच्या संशोधनाबाबत आघारकर संशोधन संस्थेच्या अनुवंशिकी व वनस्पती पैदास विभागातील तज्ज्ञ डॉ. सुजाता तेताली म्हणाल्या, की सन १९७१ पासून द्राक्षाच्या नवीन जातीच्या विकासाबाबत संशोधन सुरू आहे. आम्ही बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीला उपयुक्त ठरणारी ‘एआरआय-५१६’ ही द्राक्ष जात विकसित केली. कटावबा आणि ब्यूटी सिडलेस या जातींच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. द्राक्ष मणी निळसर काळ्या रंगाचे आहेत. रस आणि मनुक्याला वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि स्वाद असल्यामुळे बाजारपेठेत निश्चितपणे मागणी मिळेल. आम्ही या जातीतून येत्या काळात बिनबियाची जात विकसित करत आहोत. अजून किमान ३ ते ४ जाती येत्या काळात शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत. या संशोधनासाठी संस्थेतील एस. पी. करकमकर, एस. व्ही. फाळके यांचे सहकार्य लाभले आहे.  एआरआय-५१६ जातीची वैशिष्टे 

  • मण्याचा रंग निळसर काळा. मण्यात मऊ बी. खाण्यासाठी, मनुका, रस आणि वाईनसाठी उपयुक्त.
  • फळ छाटणीपासून ११० ते १२० दिवसांत तयार.
  • लांबट व सुटसुटीत गोलाकार मणी, एकसमान 
  • घडाची पक्वता.
  • १०० मण्याचे वजन ः १५० ते १९० ग्रॅम.
  • साखरेचे प्रमाण ः २२ ते २४  अंश ब्रीक्स, आम्लता ०.४ ते ०.६ टक्के.
  • रसाचे प्रमाण ः ६० ते ७० टक्के.
  • केवडा व भुरी रोगास मध्यम आणि करपा रोगास प्रतिकारक.
  • जीएच्या वापराची गरज नाही. लागवड आणि पीक व्यवस्थापन खर्च कमी.
  • प्रतिवेल १५ किलो उत्पादन. शीतगृहात आठ दिवस साठवणूक क्षमता.  
  • औषधी गुणधर्म 

  •  ॲन्टीआॅक्सिडंट घटकांनीयुक्त. यामध्ये रेस्वेरेट्रॉल असल्याने कोलेस्र्टॉल नियंत्रणात राहण्यास मदत.
  •  रसाचे सेवन केल्याने स्थूलता आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत. पचनास पूरक.
  •  चेतासंस्थांचे संरक्षण, मानसिक विकारावर उपयोगी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com