सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड छाटणी

तासगाव पूर्व भागात पहिल्यापासूनच पाणीटंचाई आहे. बागादेखील टॅंकरने पाणी देऊन जगवल्या आहेत. त्यात आता खरड छाटणीलादेखील टॅंकरनेच पाणी द्यावे लागते आहे. त्यामुळे टॅंकरकरिता पैसे अधिक मोजावे लागत आहेत. - विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव, जि. सांगली.
टॅंकरच्या पाण्यावर खरड छाटणी सुरु आहे
टॅंकरच्या पाण्यावर खरड छाटणी सुरु आहे

सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. द्राक्ष उत्पादक खरड छाटणीचे नियोजन  करू लागले आहेत. ज्या भागांत पाणी उपलब्ध आहे, अशा भागांत खरड छाटणी करण्यास सुरवात झाली असून, इतर   भागांत पाण्याअभावी ही छाटणी रखडली आहे.

म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होऊन वीस दिवस झालेे आहेत. पाच महिने अव्याहतपणे सुरू असणाऱ्या म्हैसाळ योजनेस पंपगृह दुरुस्तीमुळे ब्रेक द्यावा लागला आहे. हा खंड तीन आठवडे झाले तरी संपलेला नाही. तसेच ताकारी आणि  टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. सध्या द्राक्षबागांच्या खरड  छाटणीचा कालावधी आहेत. छाटणीनंतर मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने छाटण्या रखडल्या आहेत. 

पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर काडी अपरिपक्व तयार होणे, तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. यामुळे पुढे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो. म्हैसाळ योजनेचे पाणी दूरच कृष्णा नदीच्या पात्रातही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांमधून काही मिनिटेच पाणी उपलब्ध होत आहे. जलस्रोत कोरडे पडले आहेत. शेततळ्यांतील पाणी संपले आहे. शेतीसाठी भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू असल्याने शेतकरी टॅंकरने पाणी आणून खरड छाटणी करू लागले आहेत. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बागेला टॅंकरनेच पाणी द्यावे लागत आहे, त्यातच आता खरड छाटणीला देखील पाणी टॅंकरनेच द्यावे लागत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. 

दरम्यान म्हैसाळ योजनेच्या पंपांची दुरुस्ती, पंपगृह देखभाल, नव्या कालव्यांचे चेंबर काढणे, मीटर बसविणे, काही भागांत अस्तरीकरण कामे गतीने सुरू आहेत. अवधी जास्त मिळाला तरच दुरुस्त्या अन्‌ देखभाल कामे शक्य आहेत. सर्व दुरुस्त्या झाल्या तरच पूर्ण उन्हाळा योजना जतपर्यंतच्या चार तालुक्यांत क्षमतेने चालविता येणार आहेत. मात्र तूर्तास तरी अपुरे पाणी,  दुरुस्त्यांची सुरू असलेली कामे या कात्रीत योजना सापडली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com