द्राक्ष बाजाराला `मध्यम गती'चा दिलासा

द्राक्ष बाजाराला `मध्यम गती'चा दिलासा
द्राक्ष बाजाराला `मध्यम गती'चा दिलासा

फेब्रुवारी महिना संपलाय आणि मार्च महिना सुरू झालाय. या टप्प्यावर गतवर्षीच्या तुलनेत द्राक्षाची गुणवत्ता, चव, गोडी यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. देशांतर्गत बाजारात आणि निर्यातीच्या बाजारात मागणी चांगली आहे. त्या अपेक्षेत दर मात्र काही प्रमाणात स्थिरावलेले आहेत. निर्यातीच्या द्राक्षांना प्रति किलोला ५५ ते ७७  (सरासरी ६०) रुपये तर देशांतर्गत बाजारात किलोला ३५ ते ५५ (सरासरी ४५) रुपये असा दर मिळतो आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या पंधरवड्यात दराची हीच स्थिती होती. आवक, मागणी आणि उपलब्ध द्राक्षांचा विचार करता द्राक्षांचे सध्याचे दर हे द्राक्ष बाजाराची नैसर्गिक स्थिती दाखविणारे दर आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  द्राक्ष उत्पादक व निर्यातदार माणिकराव  पाटील म्हणाले की, सध्याच्या दराची स्थिती पाहता ते खूप कमी किंवा जास्त आहेत असं म्हणता येणार नाही. मध्यम स्वरूपाचे दर निर्यातक्षम तसेच देशांतर्गत बाजारातील द्राक्षांना मिळत आहेत. नाशिक जिल्ह्यात फुलोरा दरम्यान अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले होते. या स्थितीत उत्पादन ३० टक्‍क्‍यांनी घटेल, असे सांगितले जात होते. त्यावरून आवक कमी राहील व दर चढे राहतील, असाही अंदाज  मांडला जात होता. मात्र निर्यातीचे आकडे वाढत गेले.  नाशिक भागात जरी उत्पादन काही प्रमाणात कमी झाले असले तरी सांगली, सोलापूर, जालना, लातूर या भागांबरोबरच राज्याबाहेरील बंगलोर, हैदराबाद येथे द्राक्ष उत्पादन आणि द्राक्ष निर्यात वाढली आहे. सर्वच बाजाराची स्थिती पाहता सध्याची बाजारभावाची पातळी ही उत्पादक, व्यापारी व निर्यातदारांसाठीही चांगली आहे. यामुळे बाजाराची स्थिरता टिकून राहणार आहे. मध्यम स्थिती जास्त काळ टिकणारी असते. जास्त प्रमाणात वाढलेले दर त्याच प्रमाणात खालीही उतरतात हा अनुभव आहे. सांगलीच्या द्राक्षांना मागणी  यंदा राज्यातील सर्वच भागातील द्राक्षांमध्ये चांगले गुणवत्तेचे काम झाले असले तरी यात सांगली विभागाची आघाडीच राहिली आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीपासून मिळालेले पूरक वातावरण, उत्तम व्यवस्थापन यामुळे व्यापाऱ्यांनी सांगलीच्या द्राक्षांना सुरवातीपासून पसंती दिली. बेदाण्याचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या या भागात टेबल ग्रेप्सला विशेष मागणी वाढली. त्या तुलनेत बेदाणा विविध कारणांनी अडचणीत सापडल्याने अनेक शेतकरी बेदाण्याकडून टेबल ग्रेप्स उत्पादनाकडे वळले. त्यामुळे गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्हीतही वाढ झाली. 

सोलापूरचा हंगाम उशिरापर्यंत   नाशिक व सांगलीतील द्राक्षे मार्च महिन्यात चालतील. जास्तीत जास्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथील हंगाम चालेल. त्यानंतर सोलापूर विभागातील हंगाम सुरू होईल. तो एप्रिल अखेरपर्यंत चालेल, असे या भागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १५ मार्चनंतर आवक कमी होईल. मात्र फार मोठा तुटवडा राहील, असू परिस्थिती नाही. नाशिक भागात मोठ्या प्रमाणावर अर्लीच्या म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत छाटण्या होत्या. तो माल फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात राहिला. एक मार्चपासून नियमित हंगाम सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील आवकेची स्थिती अशीच आहे. निर्यातीबाबत काळजी आवश्यक देशातून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ३७२६ कंटेनरमधून ४८ हजार ८५३ टन द्राक्षे निर्यात झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ही निर्यात तब्बल ४७०० टनांनी जास्त झाली आहे. युरोपच्या मार्केटच्या क्षमतेच्या तुलनेत ही निर्यात अधिक असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात बाजारावर परिणाम झाला आहे. द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे म्हणाले की, यावेळी युरोपीय बाजारात द्राक्षांना साडेअकरा ते साडेबारा युरो या दरम्यान दर मिळाले. अजूनही आवक आणि मागणीच्या तुलनेत बाजाराची परिस्थिती काही प्रमाणात स्थिर आहे. या अत्यंत संवेदनशील परिस्थितीत दर्जाबाबत तडजोड होऊन साधारण दर्जाचा माल बाजारात गेला तर परिस्थिती बिघडू शकते. ती बिघडणार नाही याची उत्पादक आणि निर्यातदार या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com