राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विटंल ७०० ते ३५०० रुपये

राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विटंल ७०० ते ३५०० रुपये
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विटंल ७०० ते ३५०० रुपये

राज्यातील बाजार समित्यांमध्ये हिरव्या मिरचीची आवक बऱ्यापैकी होत असली तरी सोलापूर, नाशिक, अकोला, सांगली येथे आवक कमीच आहे. सर्वात कमी आवक सोलापूर बाजार समितीत नोंदली गेली. गुरुवारी (ता. ४) हिरव्या मिरचीला सर्वाधिक ३५०० रुपये दर अकोला बाजार समितीत मिळाला. तर सर्वात कमी दर सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये मिळाला.  

पुण्यात २५०० ते ३५०० रुपये गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) हिरव्या मिरचीची परराज्यांतून सुमारे १० तर स्थानिक सुमारे ४ टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये एवढा दर हाेता. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक मिरचीच्या घटलेल्या उत्पादनामुळे बाजाराची भिस्त परराज्यातील मिरचीवर अवलंबून असल्याने दर टिकून असल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामधून हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक हाेत आहे. सध्या ही आवक दरराेज सरासरी १० ते १२ टेम्पाे असते, तर पुणे विभागाच्या विविध जिल्ह्यांमधून म्हणजेच स्थानिक आवक ही अवघी ३ ते ४ टेम्पाे अाहे.

अकोल्यात २५०० ते ३००० रुपये येथील बाजारात सध्या हिरवी मिरची २५०० ते ३००० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. प्रतिदिन ३० ते ३५ क्विंटल आवक होत आहे. अकोला बाजारात जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून आवक होत असते. १५ दिवसांपूर्वी २५०० ते ४००० दरम्यान भाव होता. सध्या किरकोळ मिरचीचा दर ४५०० ते ६००० रुपये क्विंटल आहे. पंधरा दिवसांपूर्वी बाजारात २० ते २५ क्विंटल आवक होत होती. यावेळी हिरव्या मिरचीला २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असे दर होते. 

कोल्हापुरात १६०० ते २८०० रुपये येथील बाजार समितीत हिरव्या मिरचीस (ओली) प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून बाजारात मिरचीचे दर स्थिर आहेत. बाजार समितीत प्रामुख्याने बेळगाव भागातून मिरचीची आवक होते. दोन महिन्यांपूर्वी मिरचीचे दर दहा किलोस सातत्याने २०० रुपयांच्या वर होते. पंधरवड्यापूर्वी यात काहीशी घसरण झाली. सध्या १६० ते २८० च्या दरम्यान दर टिकून आहेत. येत्या काही दिवसांत तरी हेच दर कायम राहतील, अशी शक्‍यता आहे

सांगलीत २५०० ते ३००० रुपये  येथील शिवाजी मंडईत दररोज दोन टेंपो म्हणजे ८० पोती (४० ते ५० किलोचे एक पोते याप्रमाणे) आवक होते. गुरुवारी (ता. ४) हिरव्या मिरचीची आवक ९० पोती झाली असून त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. शिवाजी मंडईत हिरव्या मिरचीची आवक सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज तालुक्‍यासह आंध्र प्रदेशातून होते. गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात हिरव्या मिरचीची आवक २५ पोत्यांनी वाढली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. चालू सप्ताहात मिरचीची आवक वाढली असली तरी मिरचीची दर स्थिर आहेत. पुढील सप्ताहात मिरचीची दर वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. किरकोळ बाजारात मिरचीचे दर प्रतिकिलोस ४० ते ५० रुपये असे होते.

जळगावात १५०० ते २००० रुपये  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ३) हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली. तिस १५०० ते २००० आणि सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बाजार समितीत हिरव्या मिरचीची आवक जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील पहूर, शेंदूर्णी, वाकोद तसेच जळगाव तालुक्‍यातील कानळदा, विदगाव, यावल (जि. जळगाव) तालुक्‍यातील डांभुर्णी आदी भागातून होते. या आठवड्यातील आवक मागील आठवड्याच्या तुलनेत घटली. पण दर अपेक्षित नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात आवकेत आणखी घट होईल. कारण आगाप रब्बी मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. नंदुरबारमधील हिरवी मिरची फारशी येत नाही, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

परभणीत २२०० ते २८०० रुपये  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ४) हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल २२०० ते २८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच आंध्र प्रदेशातून हिरव्या मिरचीची आवक येत आहे. महिनाभरात प्रत्येक गुरुवारी सरासरी २५ ते ४० क्विंटल आवक झाली तर प्रतिक्विंटल १८०० ते ३२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ४) ४० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २२०० ते २८०० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सोलापुरात ७०० ते १५०० रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक कमी झाली, पण दर मात्र टिकून आहेत. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० व सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक कमीच होती. पण आवक कमी असली, तरी मागणी चांगली असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. गेल्या महिनाभरापासून हिरव्या मिरचीच्या आवकेत काहीसा चढ-उतार होत राहिला. पण त्याचा काहीच परिणाम दरावर झाला नाही. ३ जानेवारीला मिरचीची आवक १० क्विंटल ३७४ किलोपर्यंत राहिली. तर हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी किमान ७० रुपये, सरासरी १४० रुपये आणि सर्वाधिक १५० रुपये दर राहिला. 

नाशिकला २००० ते २९०० रुपये नाशिक बाजार समितीत बुधवारी (ता. ३) हिरव्या मिरचीची एकूण २७ क्विंटल आवक झाली. या वेळी लवंगी वाणाची १९ क्विंटल झाली. लवंगीला प्रतिक्विंटलला २००० ते २९०० व सरासरी २४०० रुपये दर निघाला. ज्वाला वाणाची ८ क्विंटल आवक झाली. ज्वालाला १९०० ते २६०० व सरासरी २१०० दर मिळाले. हिरव्या मिरचीचे दर व आवक मागील महिण्यापासून स्थिर आहेत. येत्या आठवड्यात मिरचीची आवक व दर टिकून राहतील, असे सूत्रांनी सांगितले. 

नागपुरात २२०० ते २५०० रुपये स्थानिक बाजार समितीत आवक स्थिर असताना हिरव्या मिरचीच्या दरात तेजी आल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात चार डिसेंबर २०१७ रोजी १५० क्‍विंटलची आवक, तर दर १५०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. अवघ्या महिनाभरातच आवक २७० क्‍विंटल आणि दर २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलवर पोचल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कळमणा बाजार समितीत हिरव्या मिरचीची आवक महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे तसेच लगतच्या मध्य प्रदेशातून होते. ६ डिसेंबरला हेच दर १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. त्यानंतर १६०० ते १८०० रुपयांवर मिरची स्थिर होती. डिसेंबरअखेरीस या दरात तेजी आल्याचे चित्र आहे. यापुढील काळात मिरचीच्या दरात काहीअंशी तेजी राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी                  वर्तविला.

मागील महिनाभरातील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

बाजार समिती आवक किमान कमाल
पुणे   ७४० १८०० ३८००
अकोला ३० २५०० ३५००
कोल्हापूर ५० १७०० २६००
सांगली ३० २२०० २७००
जळगाव ६२ १३०० २०५०
परभणी ३२ २१०० २९००
सोलापूर ९०० १७००
नाशिक २५ २०५० २७००

देशातील महत्वाच्या बाजारातील दर (प्रतिक्विंटल/रुपये)    

बाजार (राज्य)   आवक किमान कमाल
साधौरा (हरियाना) १४ २००० ३०००
आदमपूर(पंजाब)   ५० २५०० ३५००
बांगा (पंजाब)   ३२ २५०० ३१७२
मोरिंडा(पंजाब) १३ २४०० २६५०
अंवाला (उ.प्र.) २५ २५०० २७००
बारौत (उ.प्र.)  ७१ १६०० १६००
महिपूर्वा (उ.प्र.)   ३९ १३०० १६५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com