राज्यात वटाणा प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये

वटाणा दराचा आढावा
वटाणा दराचा आढावा

पुणे ः राज्यातील वटाण्याचा हंगाम सध्या सुरू झाला नाही. त्यामुळे बाजारात स्थानिक वटाण्याची आवक खूपच कमी होत अाहे. सध्या मध्य प्रदेशातून वटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासोबतच गुजरात, बेळगाव येथूनही आवक आहे. गुरुवारी (ता. १४) सरासरी किमान २००० आणि कमाल ४५०० दर मिळाला. 

पुण्यात २५०० ते ३००० रुपये गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१४) मध्य प्रदेश येथून वटाण्याची सुमारे १५ ट्रक आवक झाली हाेती. या वेळी प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये एवढा दर हाेता. आवकेमध्ये गाेल्डन वाणाच्या वटाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने गाेल्डनचे दर दहा किलाेला ३०० ते ४०० रुपये एवढे हाेते. सध्या बाजारात केवळ मध्य प्रदेशातूनचवटाण्याची आवक सुरू असून, स्थानिक आवक बंद आहे. स्थानिक पातळीवर फक्त खरिपामध्येच पुरंदर, पारनेर परिसरात उत्पादन घेतले जाते. मात्र याठिकाणी रब्बी हंगामात उत्पादन हाेत नसल्याने बाजाराची भिस्त मध्य प्रदेशावर अवलंबून आहे. वटाण्याला मागणी चांगली असल्याने दर देखील चांगले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

जळगावात २००० ते २८०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१४) वटाण्याची १० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते २८०० आणि सरासरी २३०० रुपये तर मिळाला. येथील बाजार समितीमध्ये नारायणगाव (पुणे), कन्नड (जि. औरंगाबाद) आदी भागातून वटाण्याची आवक होते. आवक रोज होत नाही. आठवड्यातून दोन तीन दिवस वटाणा येतो. आवक कमी होत असल्याने दरही बऱ्यापैकी मिळतात. मागील पंधरवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आवकेत काहीशी वाढ झाली. मध्यंतरी पाच ते सात क्विंटल अशी आवक होती. त्यात गुरुवारी वाढ झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. मागील महिन्यातही आवक कमी होती. प्रतिदिन अडीच ते तीन क्विंटल एवढी आवक नोंदविण्यात आली.

साताऱ्यात ३००० ते ३५०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१४) वटाण्याची ४० क्विंटल आवक झाली होती, त्यास क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये दर मिळाला. मागील महिन्याच्या तुलनेत वटाण्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. खटाव, माण, कोरेगाव व सातारा तालुक्‍यातून आवक होत आहे. पावट्याची आवक सुरू झाल्यामुळे वटाण्याच्या आवकेत वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. २३ नोव्हेंबरला २३ क्विंटल आवक होऊन ४००० ते ५००० रुपये दर होता. ३ डिसेंबरला वाटाण्याची २८ क्विंटल आवक होऊन क्‍विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाला आहे. वाटाण्याची ५० ते ६० रुपये प्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे. 

अकोल्यात ३५०० ते ४५०० रुपये दरवर्षी दिवाळीनंतर येथील बाजारपेठेत दाखल होणारे वटाणा सध्या अकोला बाजारात ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलने विकल्या जात आहे. मध्य प्रदेशातून या वटाण्याची दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. आवक वाढल्याने वटाणा दरात गेल्या १५ दिवसांत घसरण झाली आहे. हंगामाला सुरवात झाली त्या वेळी वटाणा ६००० रुपयांपेक्षा अधिक दराने विकल्या जात होता. गेल्या पंधरवड्यात मटार ४५०० ते ६००० पर्यंत होते. त्या वेळी १५ ते २० क्विंटलची आवक व्हायची. आता दररोज आवकेत सुधारणा होत चालली आहे. त्यामुळे दरांमध्ये घट आली असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे. वटाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. किरकोळ बाजारात ६० रुपये किलोने विक्री केली जात आहे.

परभणीत २२०० ते २७०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१४) वटाण्याची ३०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २२०० ते २७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली. येथील भाजीपाला मार्केटमध्ये सध्या मध्य प्रदेशातील जबलपूर, रतलाम जिल्ह्यातून वटाण्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात दर गुरुवारी सरासरी ११० ते ३०० क्विंटल वटाण्याची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ३५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१४) ३०० क्विंटल आवक झालेली असतांना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २२०० ते २७०० रुपये होते तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये किलो दराने सुरू होती, असे व्यापारी मोहमंद इस्साक यांनी सांगितले.

औरंगाबादेत २००० ते २८०० रुपये  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१४) वटाण्याची ८९ क्‍विंटल आवक झाली. या वेळी वटाण्याला २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीमध्ये वटाण्याची आवक साधारणपणे मध्य प्रदेश, नाशिक, पुणे भागातूनच होते. व्यापाऱ्यांमार्फत व्यापाऱ्याकडे येणाऱ्या या मालाची औरंगाबादच्या व्यापाऱ्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करतात. अलीकडे सुरू झालेल्या वटाण्याच्या आवकेत व दरात चढउतार पहायला मिळाला. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २० नोव्हेंबरला मटारची ४८ क्‍विंटल आवक तर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१ नोव्हेंबरला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. २ डिसेंबरला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कोल्हापुरात ३००० ते ४५०० रुपये येथील बाजारसमितीत मटारला दहा किलोस ३०० ते ४५० रुपये दर मिळत आहे. मटारची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून मटारचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजारसमितीत प्रामुख्यने गुजरात, बेळगाव भागातून मटारची आवक होते. येथून कोकणातील व्यापाऱ्यांकडे मटार पाठविला जातो. मध्यंतरी मटारची आवक पावसामुळे कमी झाली होती. आता ती नियमित असल्याचे बाजारसमितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com