भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे संकेतस्थळ झाले अद्ययावत

भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे संकेतस्थळ झाले अद्ययावत
भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे संकेतस्थळ झाले अद्ययावत

पुणे : भूजल स्राेतांचा शोध घेऊन तांत्रिक साह्याने विद्यमान भूजल संसाधनांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या भूजलसंदर्भातील विविध योजना, तसेच आवश्यक माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हे संकेतस्थळ यूजरफ्रेंडली तयार करण्याकडे प्रशासनाने भर दिल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने अद्ययावत करण्यात आलेल्या संकेतस्थळावर नागरिकांना शासनाच्या नवीन योजना, तसेच प्रशासनामार्फत राबविण्यात आलेले प्रकल्प यांची माहिती मिळणार आहे. दरम्यान, सुरवातीच्या काळात इंग्रजीमधून माहिती उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, मराठीमध्ये सुविधा असूनही बहुतांश माहिती ही इंग्रजीमधूनच उपलब्ध होत होती. नव्या संकेतस्थळाद्वारे मराठी भाषेतून पूर्ण क्षमतेने माहिती देण्यात आली आहे. नवीन सकेतस्थळ हे आकर्षक असून या संकेतस्थळावर चलचित्रे तसेच विकासकामांची छायाचित्रे पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशी सहा कार्यालये भूजल सर्वेक्षण व विकासाचे काम करतात. नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातील पाणी पातळी, भौगोलिक रचना, पावसाचे प्रमाण, नद्या आदी माहितीसह सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा, कृत्रिम पुनर्भरण, शिवकालीन पाणी साठवण योजना यांसह विविध माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. राज्यातील भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे, भूजल पातळी त्याची गुणवत्ता आदी माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. याखेरीज भूजल माहिती, मार्गदर्शक व सूचना, दरपत्रक आदी माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांना भूजलासंदर्भात असलेले प्रश्‍न व समस्या विभागाकडे मांडता येणार असून फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियांना फॉलो करता येईल. तसेच, भूजल विभागामार्फत तयार करण्यात आलेले व्हिडिओ यूटुबवर पाहता येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com