रावेर, यावल, चोपडा भागांतील भूजल पातळी घटतेय

रावेर व यावल तालुके केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी पाणी उपसा होतो. परंतु शेतकरी यावर उपाय म्हणून ठिबकचा वापर अधिक प्रमाणात करू लागले आहेत. शेतकरी आपले प्रयत्न करतात. परंतु ग्रामपंचायती, शासन यांनीही मोठे प्रकल्प हाती घेतल्याशिवाय पाणीपातळी वाढण्यासाठी मोठी मदत होणार नाही. - अनिल विश्राम पाटील, शेतकरी, सावखेडासीम, जि. जळगाव.
भूजल पातळीत घट
भूजल पातळीत घट
रावेर, जि. जळगाव  ः केळी पिकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, यावल आणि चोपडा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने घसरू लागली आहे.
 
गेल्या दहा वर्षांत या तालुक्‍यातील ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या गावांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक असून, पाणी पातळी उंचावण्यासाठीचे उपाय फारसे प्रभावी व व्यापक नसल्याने अडचणी वाढत आहेत. तापी नदीवर प्रस्तावित खारिया गोटी (मध्य प्रदेश) येथील महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प तातडीने सुरू करावा, अशी मागणीही यानिमित्त पुढे आली आहे. 
 
रावेर, यावल आणि चोपडा हे तीनही तालुके सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहेत. सातपुड्यातून उगम पावलेल्या नागोई, भोकरी, सुकी, मात्राण, मोर, हडकाई, खडकाई, अनेर या नद्या आणि असंख्य नाल्यांमुळे या भागातील भूजल पातळी बरीच वर होती. पाण्याच्या दृष्टीने हा भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ असल्याने या भागास महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हटले जात होते. 
 
गेल्या वीस वर्षांत केळी पिकासाठी पाण्याचा भूगर्भातून झालेला भरमसाट उपसा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, पाणी अडवा-पाणी जिरवा या योजनेकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, यामुळे या भागातील भूजल पातळी हळूहळू खाली घसरली आहे. गेल्या ३० वर्षात ही भूजल पातळी दुप्पटीने खालावली आहे. रावेरात तर १९६२ पासून विहिरींमधून पाणी उपसा सुरू आहे. 
 
या भागात विहिरींची पाणीपातळी १९९० च्या सुमारास सरासरी शंभर फुटांवर होती, ती आता सरासरी दोनशे फुटांच्या खाली गेली आहे. कूपनलिकांना जिथे दीड-दोनशे फुटांवर मुबलक पाणी लागायचे, तिथे आता चार-पाचशे फुटांवर पाणी लागेल, याचीही खात्री राहिलेली नाही. 
या तीन तालुक्‍यांत भूजल घसरली, हे खरे आहे. पण या तालुक्‍यांतील बहुसंख्य गावे ‘डार्क झोन’ म्हणून जाहीर करण्यात आल्याने नव्या विहिरी, कूपनलिकांवर बंधने आली आहेत.
 
पर्यायाने पाण्याचा उपसा काहीसा कमी झाला आहे. पण पुनर्भरणाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने ‘डार्क झोन’मधील गावांची संख्या २००८ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढली आहे. तथापि या तीनही तालुक्‍यांत अजूनही उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर लागत नाही. किरकोळ अपवाद वगळता विहीर अधिग्रहीत करावी लागत नाही किंवा एखाद्या गावाला तीव्र पाणीटंचाई भासत नाही.

रावेर तालुक्‍यातील सुकी नदीपात्रात ज्याप्रमाणे तेथील पाणी वापर संस्थेने विहिरी खोदल्या आहेत, तशा विहिरी या तीनही तालुक्‍यांच्या सर्व प्रमुख नदीपात्रात खोदण्याची आवश्‍यकता आहे. सुमारे १०-१२ वर्षांपूर्वी शासनाने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला होता. आता त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. नदीनाल्यांच्या पात्रात आडवे चर खणूनदेखील पाणी अडेल आणि जिरण्यास मदत होईल. त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. तसेच महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प लाभदायी ठरू शकणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com