‘जलयुक्त’मुळे भूजल पातळी वाढली

ठिबकचा वापर करावा ``जलयुक्त शिवार योजना एक चळवळ बनली आहे. त्यामुळे अनेक गावांना शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले. हे पाणी टिकून ठेवण्यासाठी माती परीक्षण करूनच योग्य ती पिके घ्यावीत. पाणी जपून वापरणे ही गरज आहे. याची जाणीव आता सर्वसामान्यांना होत आहे. हा पाणीसाठा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या पिकांना जास्त पाणी लागते, अशी पिके घेऊ नयेत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे.`` - श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा.
‘जलयुक्त’मुळे भूजल पातळी वाढली
‘जलयुक्त’मुळे भूजल पातळी वाढली

सातारा : राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविल्याने जिल्ह्यात जलचळवळीने जोम धरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये जलसाक्षरता वाढत आहे. या योजनेतून चार वर्षे काम सुरू असून, टॅंकरची संख्या घटू लागली आहे. लागवडीखालील क्षेत्रही वाढले असून, भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६- १७ मध्ये झालेल्या कामांमुळे १७ हजार ४०.२४ टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. विहिरींतील पाणीपातळीत ०.५० ते १.३८ मीटरने वाढ झाली आहे.

‘जलयुक्‍त’मधून २०१५-१६ मध्ये २१५ गावांमध्ये आठ हजार ४१८ कामे झाली. त्यावर १६ हजार ४०२ लाख खर्च झाले. २०१६-१७ मध्ये २१० गावांमधील पाच हजार ६६५ कामांवर १३ हजार ८९१ लाख रक्कम खर्च केली गेली. २०१७-१८ मध्ये २१० गावांमधील दोन हजार ८७५ कामांवर ६२९ लाख खर्च केला गेला आहे.

‘जलयुक्‍त’मधील ८२ गावांना २०१६ मध्ये ६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यात लक्षणीय घट होऊन आता फक्त तीन गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच २०१६-१७ मध्ये २७ गावांना ३० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. आता केवळ दोन गावांनाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

‘जलयुक्त’च्या गावातील १०६ विहिरींचे निरीक्षण केले असता भूजल पातळी ०.५१ ते १.३८ मीटरने वाढली आहे. केवळ ओढाजोड प्रकल्पामुळे १८० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ३२ विहिरींना त्याचा लाभ झाला. चांदक-गुळूंब ओढाजोड प्रकल्पामुळे गुळूंबमधील पाणीटंचाई दूर झाली. ओढाजोड प्रकल्पामुळे एक हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले. आता २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ८८ गावांची निवड केली असून, आराखडे तयार करून कामेही सुरू केली आहेत.

जलयुक्त शिवार अभियानातून खटाव तालुक्‍यातील येरळा, माण तालुक्‍यातील माणगंगा, कोरेगाव तालुक्‍यातील वांगणा, वसना नदी, फलटण तालुक्‍यातील बाणगंगा या नद्यांवरील ब्रिटिश कालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच सर्व नद्यांवर नवीन बंधारे बांधण्यात आले आहेत. जास्तीतजास्त पाणीसाठा होण्यासाठी या नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com