पीकविमा योजनेबाबत मार्गदर्शन करा

पीकविमा योजनेबाबत मार्गदर्शन करा
पीकविमा योजनेबाबत मार्गदर्शन करा

नगर ः जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीकविमा योजना व पंतप्रधान विमा योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत त्यांना सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभागाने येत्या वीस दिवसांत प्रत्येक गावापर्यंत संपर्क साधून विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना मागदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये पीकविमा उतरवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रमाणिकपणे काम केले तर हे प्रमाण वाढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी (ता. ४) कृषी विभागातर्फे ‘पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग खरीप हंगाम २०१८-१९’ या कार्यशाळा झाली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, पुणे येथील तंत्र अधिकारी कांतीलाल पवार, अरुण कांबळे, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, गौरव शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, ‘नगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. मागील वर्षीचा विचार केला, तर खूप कमी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न आहे. जिल्ह्यात ९ लाख शेतकरी असून त्यापैकी ११ हजार शेतकरी ऑनलाइन नाव नोंदणी करतात हे प्रमाण खूप कमी आहे. आपल्याकडे वीस दिवस आहेत. या वीस दिवसांत गावागावात जाऊन चौक सभा, प्रशिक्षणाचे आयोजन करा. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केले, तर लक्ष्यांक गाठाल. सुरवातीपासूनच मोहीम चालू ठेवा. तंत्र अधिकारी कांतीलाल पवार, प्रशांत पाटील, अरुण कांबळे यांनी पीक कापणी प्रयोगाविषयी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आयुक्तानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी झापले नगर जिल्ह्यामधील कृषी विभागाच्या कामाची फारशी प्रगती नाही, असे स्पष्ट करत जिल्हाभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आठ दिवसांपूर्वी अचानक नगरला आढावा बैठक घेऊन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी चांगले झापले. कृषी विभागाने तयार केलेली माहिती एकूण घेतली तर नाहीच, उलट ‘कामात कसूर केला तर थेट कारवाई’ असा इशारा त्यांनी भर बैठकीत दिला. त्यानंतर बुधवारी झालेल्या पीक कापणी प्रयोग कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनीही झापल्याने कृषी विभागावर आठवड्यात दोनदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी सहन करण्याची नामुष्की आली. जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाच्या कामाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सिना नदीतील अतिक्रमण काढण्यासह अन्य बाबींमुळे द्विवेदी जिल्हाभर लोकप्रिय झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com