गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा मतमोजणीस प्रारंभ

 गुजरात (१८२), हिमाचल प्रदेश (६८) विधानसभा निवडणुकीचे आज निकाल
गुजरात (१८२), हिमाचल प्रदेश (६८) विधानसभा निवडणुकीचे आज निकाल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेली आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता.१८) लागणार असल्याने ‘गल्ली ते दिल्ली’ सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. मतदानोत्तर चाचण्यांचा कौल हा भाजपच्या बाजूने असला, तरीसुद्धा दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे- प्रतिदावे केले जात असल्याने या निकालाची उत्कंठा शिगेला पोचली आहे. दरम्यान, गुजरातमध्ये सकाळी ८.३० पर्यंत भाजप ५६ तर कॉंग्रेस ३१ जागांवर आघाडीवर होते. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. हिमाचल प्रदेशचा मागील २४ वर्षांचा राजकीय इतिहास अभ्यासला असता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. यावेळेस जनता जनार्दन आपला कौल भाजपच्या बाजूने देते, की पुन्हा काँग्रेसला सत्ताधीश बनविते, हे निकालानंतरच समजू शकेल. गुजरातचे तप्त रण पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले होते. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते. पाटीदार नेता हार्दिक पटेल, ‘ओबीसीं’चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील कथित हेराफेरीचा मुद्दा लावून धरला असून, याची आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसची खलबते दिल्लीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर गुजरातमधील प्रदेशपातळीवरील नेत्यांनी सरकार स्थापनेसाठीच्या प्रयत्नांना वेग द्यायला हवा, अशी विनंती त्यांच्याकडे केल्याचे समजते. अहमद पटेल, मधुसूदन मिस्त्री आणि प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी या अनुषंगाने राहुल गांधींसोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे आज गुजरातमध्ये चार मतदारसंघांतील ६ केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले, ‘ईव्हीएम’मधील बिघाडामुळे येथील मतदानाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. बंदोबस्तात मतमोजणी हिमाचल प्रदेशात यंदा ७५.२८ टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता. उद्याच्या मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असेल.

राज्य एकूण जागा बहुमतासाठी
गुजरात १८२ ९२
हिमाचल प्रदेश ६८ ३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com