बोंड अळीचे संकट गुजरातने पेलले

बोंड अळीचे संकट गुजरातने पेलले
बोंड अळीचे संकट गुजरातने पेलले

जळगाव : कापूस लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत सुमारे १५ लाख हेक्‍टरने कमी असतानाही गुजरातेत यंदा १०४ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन झाले आहे. कापसाखालील अधिकाधिक क्षेत्राला सूक्ष्मसिंचनाची सुविधा आणि बोंड अळीच्या निर्मूलनासाठी राबविलेला ‘गुजरात पॅटर्न’ या बाबी गुजरातचे कापूस उत्पादन वाढविण्यासाठी मोठे बळ देणाऱ्या ठरल्या आहेत.  कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासह, कापूस सल्लागार मंडळाने (सीएबी) गुजरातमध्ये देशात सर्वाधिक कापूस उत्पादन आल्याचे स्पष्ट केले आहे. याच वेळी गुजरातने महाराष्ट्रातून फेब्रुवारीअखेरपर्यंत एक कोटी क्विंटल कापूस आयात केला. अर्थातच सुमारे २० लाख गाठींचा कापूस गुजरातने महाराष्ट्रातून घेतला. यामुळेही गुजरातचे उत्पादन वाढल्याचे दिसत आहे, असा दावा खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला.  गुजरातमधील कापूस उत्पादनाबाबत जमेच्या बाजू बडोदा कृषी विद्यापीठाने शोधलेल्या देशी सुधारित कापूस वाणांचा चांगला प्रसार झाला. पूर्ण सौराष्ट्र, मध्य गुजरातेत कापसाखालील क्षेत्र अधिक होते. जुनागड, राजकोटचा कापूस देशात सर्वाधिक गुणवत्तापूर्ण ठरला. महाराष्ट्रालगतच्या तापी जिल्ह्यात काही प्रमाणात कापूस लागवड होती. गुजरातमधील कापसाखालील ८० टक्के क्षेत्र ओलिताखाली असून, सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा १०० टक्के वापर तेथे झाला. २०१४ - १५ मध्ये तेथे सर्वप्रथम बोंड अळी आली. मोठे नुकसान झाले. लागलीच तेथील सरकारने गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी २१ कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर केला. शेतकऱ्यांना एक लाखांवर कामगंध सापळ्यांचे मोफत वितरण केले. जिनींग प्रेसिंग कारखाने, सूतगिरण्यांमध्ये कामगंध सापळे लावले. बोंड अळीबाबत प्रीव्हेंटिव्ह कार्यक्रमावर दोन वर्षे भर दिला. कापूस बियाणे उत्पादक व पुरवठादारांवरही जबाबदारी टाकली. निधी उभारला. बोंड अळी निर्मूलनाच्या या कार्यक्रमाला आता गुजरात पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे. यामुळे २०१७-१८ च्या हंगामात गुलाबी बोंड अळी सौराष्ट्रमध्ये नव्हती. महाराष्ट्रालगत तापी जिल्ह्यात किरकोळ स्वरूपात गुलाबी बोंड अळी आली. यामुळे उत्पादकता हेक्‍टरी ८०० किलो रुईपर्यंत तेथे पोचली आहे. काही शेतकरी तर एकरी २५ क्विंटल कापूस घेऊ शकले आहेत, अशी माहिती मिळाली.  महाराष्ट्रातील कापसाला फटका बसण्याची कारणे २०१७-१८ चा हंगाम कापूस उत्पादकांना कर्जबाजारी करणारा ठरला. सुरवातीलाच पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला. दुबार पेरणी झाली. नंतर ऑक्‍टोबरमध्ये गुलाबी बोंड अळी एवढी आली की पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करावे लागले. फरदड कापूस अपवाद वगळता कुठेही नव्हता. बुलडाणा व विदर्भातील उर्वरित सातपुडा पर्वतालगतच्या भागातून मध्य प्रदेशात कापूस गेला. खानदेश व मराठवाड्यातील औरंगाबादमधील काही भागांतून गुजरातेत कापूस अधिक गेला. यवतमाळ आणि मराठवाड्यातून तेलंगणात कापूस मोठ्या प्रमाणात गेला. यामुळे गाठींच्या उत्पादनात महाराष्ट्रात मागे दिसत आहे. तर कापसाखालील सुमारे २२ टक्के क्षेत्रच ओलिताखाली होते. यामुळे उत्पादकता अपेक्षेनुसार गाठता आली नाही, असे लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी सांगितले.  कापूस लागवड क्षेत्र देशातील : १२० लाख हेक्‍टर महाराष्ट्र : ४१ लाख ४९ हजार हेक्‍टर गुजरात : २६ लाख हेक्‍टर कापूस उत्पादन (उत्पादन गाठींमध्ये, एक गाठ १७० किलो रुई) महाराष्ट्र : ८१ लाख गुजरात : १०४ लाख मध्य प्रदेश - २१ लाख हरियाना - २४ लाख राजस्थान - २१ लाख पंजाब - ११ लाख तेलंगणा - ५३ लाख तमिळनाडू - ४ लाख इतर राज्ये - ४ लाख (माहिती स्रोत ः कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com