बुलडाणा, वाशीम, परभणी उस्मानाबाद, हिंगोलीत गारपीट

बुलडाणा, वाशीम, परभणी उस्मानाबाद, हिंगोलीत गारपीट

पुणे : सोमवारी रात्री आणि मंगळवारी मराठवाडा, विदर्भातील काही भागांत गारपिटीने पुन्हा दाणादाण उडविली. वऱ्हाडात दोन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीचा सर्व्हे सुरू असतानाच मंगळवारी (ता. १३) बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत तीन तालुक्यांत जोरदार गारपीटीने शेतीचे मोठे नुकसान केले. मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांतही काही भागांत गारपिटी कहर केला.

दुसऱ्यांदा गारपीट दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीचा सर्व्हे सुरू झालेला असताना सोमवारी (ता. १३) बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत दुपारी जोरदार गारपीट झाली. मेहकर, मालेगाव, रिसोड या तालुक्यांना गारपिटीने झोडपले. या भागात १० अाणि ११ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीत अाधीच कोट्यवधींचे नुकसान झाले अाहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात दुपारी चार ते पाच या दरम्यान ठिकठिकाणी गारपीट झाली. तर दुसरीकडे मालेगाव, रिसोड तालुक्यांतही ठिकठिकाणी गारपीट झाली. मेहकर तालुक्यात विश्वी, दुधा परिसरात प्रचंड गारपीट झाली. दुधा येथील शरद देशमुख यांचा तीन एकरांतील बीजोत्पादनाचा कांदा, २० एकरांतील हरभरा, एक एकर टरबूज जमीनदोस्त झाले.  दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या गारपिटीपासून हा भाग वाचला होता. मात्र सोमवारी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. देऊळगाव माळी, हिवराअाश्रम या परिसरात २०ते २५ मिनिटे पाऊस व सोबतच गारा पडल्या. या भागात हरभऱ्याचे पीक अंतिम टप्प्‍यात अालेले अाहे. मालेगाव, रिसोड तालुक्यांतसुद्धा याचवेळी गारपीट झाली. या दोन्ही तालुक्यांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीने अतोनात नुकसान केलेले अाहे. त्यानंतर हा दुसऱ्यांदा अाघात झाला.

मराठवाड्यात गारपीट परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, सोनपीट आणि पालम तालुक्यांतील काही गावांना मंगळवारी (ता. १३) दुपारी पावणेपाचच्या सुमारास गारपिटीचा तडाखा बसला. गेल्या दोन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचे सत्र सुरू आहे. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहत आहे. परंतु चार-साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. मंगळवारी (ता. १३) दुपारी साडेचार पावणेपाचच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, मरडसगाव, मसला, मालेवाडी, पडेगाव, राणीसावरगाव, गुंजेगाव, मुळी, नागठाणा, हारंगुळ, वाघलगाव तसेच पालम तालुक्यातील केरवाडी, पालम, बनवस, चाटोरी आदी परिसरांत गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोनपेठ तालुक्यातील वडगांव, उखळी, करम आदि गावशिवारात गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी मध्ये वादळी पाऊस आणि गारांनी गहु, हरबरा पिकांचे प्रचंड नुकसान केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा व उस्मानाबाद तालुक्‍यांत सोमवारी (ता. १२) रात्री व मंगळवारी (ता. १३) पहाटे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या डाळिंब, तुरोरी, बलसूर, उमरगासह जवळपास १५ ते २० गावांत अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी, गव्हाचे पीक झोपले; तर सोंगणी झालेला हरभरा भिजला. लोहारा तालुक्‍यात मंगळवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे जवळपास तीस गावांतील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com