एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे नुकसान

एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे नुकसान
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीने १ लाख ९६ हजार ६७२ हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्‍तालयाने जाहीर केला आहे. बाधित क्षेत्रापैकी १ लाख ७१ हजार ४०५ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यापूर्वीच गारपीट आणि अवकाळीने राज्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर पुन्हा झालेल्या गारपिटीने यात वाढ झाली आणि एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. यंदा खरीप हातचा गेल्यानंतर आता रब्बीवरही गारपिटीनं कुऱ्हाड कोसळविली आहे. औरंगाबाद वगळता सर्वच सातही जिल्ह्यांत अवकाळी पाउस व गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांसह, फळपिकांचे मोठे नुकसान केले आहे. सर्वाधिक नुकसान परभणी जिल्ह्यात झाले आहे. या जिल्ह्यात ५८ हजार १६७ हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ३७ हजार १३३ हेक्‍टरवरील, नांदेड जिल्ह्यात २९ हजार ६३५ हेक्‍टरवर, बीड जिल्ह्यात १० हजार ७५७ हेक्‍टरवर, लातूर जिल्ह्यात २२ हजार ३२२ हेक्‍टरवर, हिंगोली जिल्ह्यात ८ हजार ५४६ हेक्‍टरवर तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३० हजार ११२ हेक्‍टरवरील पिकांचे गारपिटीने नुकसान केले आहे. 

प्राथमिक अंदाजानुसार बाधित एकूण १ लाग ९६ हजार ६७२ हेक्‍टर क्षेत्रापैकी १ लाख ७१ हजार ४०५ हेक्‍टरवरील पिकाचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे विभागीय आयुक्‍तालयाच्या प्राथमिक अंदाजात नमूद आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये जालना जिल्ह्यातील ३७ हजार १३३ हेक्‍टर, परभणी जिल्ह्यातील ५५ हजार ४८० हेक्‍टर, हिंगोली जिल्ह्यातील ५४९५ हेक्‍टर, नांदेड जिल्ह्यातील २५ हजार १३८ हेक्‍टर, बीड जिल्ह्यातील १० हजार ७५६ हेक्‍टर, लातूर जिल्ह्यातील १५ हजार २३२ हेक्‍टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २२ हजार १७० हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे.  २० व्यक्‍ती जखमी, तिघांचा मृत्यू तीन दिवसांत गारपिटीत २० व्यक्‍ती जखमी झाल्या. ११ फेब्रुवारीला जखमी झालेल्या १ व्यक्‍तीसह १२ फेब्रुवारीला जखमी झालेल्या १६ व  १३ फेब्रुवारीला जखमी झालेल्या ३ व्यक्‍तींचा समावेश आहे. तीन व्यक्‍तींना या गारपिटीत आपला जीव गमवावा लागला.  ५६ जनावरांचेही गेले प्राण तीन दिवसांच्या गारपिटीत ५६ मराठवाड्यातील ५६ जनावरांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये ११ फेब्रुवारीला मृत्युमुखी पडलेल्या १९ जनावरांसह १२ फेब्रुवारीच्या २७ व १३ फेब्रुवारीला मृत्युमुखी पडलेल्या १० जनावरांचा समावेश आहे. तीन दिवसांत अहवाल पाठविण्याचे आदेश अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीबाबत संयुक्‍त पंचनामे करून प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये सविस्तर प्रस्ताव तीन दिवसांत पाठविण्याचे आदेश शासनाने सर्व विभागीय आयुक्‍तांना १२ फेब्रुवारीला दिले आहेत. या प्रस्तावात शेती पिकाच्या नुकसानीचा उल्लेख करताना ३३ टक्‍के, ५० टक्‍के व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची स्वतंत्र माहिती देण्याचे व दोन्ही प्रकरणांतील नुकसानीचा अहवाल स्वतंत्र प्रपत्र अ, ब, क, व ड मध्ये पाठविण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्‍तालयाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासन आदेशाविषयी अवगत करण्यात आले असून येत्या चार ते पाच दिवसांत पंचनाम्यासह प्रत्यक्ष नुकसानीचा शासनाला अपेक्षित अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

 जिल्हा फळपिकाचे क्षेत्र जिरायती क्षेत्र     बागायती क्षेत्र
जालना ३०८९.९० २०६७२.५० १३३७०.९०
परभणी २९४३     ३८५८६ १३९५१
हिंगोली ७५ ४३११ ११०९
नांदेड ४५४ २०८२९ ३८५५
बीड ५६५.५०  ५४२९ ४७६२.३०
लातूर २६७ ९५७२ ५३९३
उस्मानाबाद १२१     २१३५६ ६९३

असे अाहे नुकसान... 

  •  विभागीय आयुक्तालयाचा तीन दिवसांतील नुकसानीचा अंदाज
  •  १ लाख ७१ हजार हेक्‍टवर ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान
  • ७५१५ हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान
  •  १ लाख २० हजार हेक्‍टरवरील जिरायती पिकांना फटका
  •  ४३ हजार हेक्‍टरवरील बागायती पीकही बाधित
  • ५६ जनावरांचा मृत्यू २० व्यक्‍ती जखमी, तिघांना गमवावे लागले प्राण  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com