निम्मा सप्टेंबर कोरडाच; खरिपावर संकट

निम्मा सप्टेंबर कोरडाच; खरिपावर संकट
निम्मा सप्टेंबर कोरडाच; खरिपावर संकट

पुणे : सप्टेंबर महिन्यात सुरवातीपासून राज्यात पावसाने मोठी दडी मारल्याचे चित्र आहे. पंधरादिवसांहून अधिक काळ पावसाच्या उघडिपीने खरिपावर संकट ओढवले आहे. पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या असून, उन्हाच्या चटक्याने पिकेही सुकू लागली आहेत. ऐन दाणे भरण्याच्या कालावधीतच पावसाने अोढ दिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. आता पावसाचे अवघे काही दिवस शिल्लक असून, मोठ्या पावसासाठी आकाशाकडे डोळे लागले आहेत. आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून अनेक भागात पावसाची उघडीप आहे. मात्र, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात सर्वत्र पाऊस थांबला, यातच राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच बाजूने पिकांना फटका बसत आहे. कोकण, नागपूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दिलासा दिला आहे. मात्र नाशिक, औरंगाबाद, अमरावती जिल्ह्यांत परिस्‍थिती खूपच चिंताजनक झाली असून, पुणे विभागातही अडचणी वाढल्या आहेत. या चार विभागातील पंधरा जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस पडला आहे.    सप्टेंबर महिन्यातील पावसाचा विचार करता राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी ३२५ तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमी, तर २५४ तालुक्यांत २५ टक्‍क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यातही तब्बल ४५ तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नसल्याचे चित्र आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यात सर्वाधिक २२१ टक्के, तर कोल्हापूरमधील शाहूवाडी तालक्यात ११३ टक्के पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. काही तालुक्यांत पावसाची सरासरी चांगली असली तरी या तालुक्याच्या बहुतांशी भागात दखलपात्र पाऊसच झालेला नाही. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक तालुक्यात पावसात मोठा खंड पडला आहे.  पावसाने दडी मारलेले जिल्हे (कंसात टक्केवारी)  धुळे (५.६), जळगाव (६.६), नगर (३.५), सोलापूर (४.१), सांगली (६.८), औरंगाबाद (३.२), जालना (५.६), बीड (५.९), परभणी (२.७), हिंगोली (२.१), बुलडाणा (६.६), अकोला (२.३), वाशिम (६.५), अमरावती (७.५), यवमताळ (७.३). पाऊसच पडला नसलेले तालुके   उरण (रायगड), नांदगाव, देवळी (नाशिक), शिरपूर, शिंदखेडा (धुळे), शहादा (नंदूरबार), जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेर, धरणगाव (जळगाव), नगर, पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, राहाता (नगर), शिरूर, बारामती (पुणे), पंढरपूर (साेलापुर), आटपाडी (सांगली), औरंगाबाद, पैठण, वैजापूर (औरंगाबाद), जालना, अंबेड, बदनापूर, घनसांगवी (जालना), पाटोदा, आष्टी, धारूर (बीड), परभणी, पाथरी, जिंतूर, मानवत (परभणी), हिंगाली (हिंगोली), देऊळगाव राजा (बुलडाणा), तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर (अकोला), रिसोड (वाशिम). तालूकानिहाय पावसाची स्थिती

  •  २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस : २५४
  •  २५ ते ५० टक्के पाऊस : ७१
  •  ५० ते ७५ टक्के पाऊस : १७
  •  ७५ ते १०० टक्के पाऊस ९
  •  १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस : २
  • सप्टेंबर महिन्यातील विभागनिहाय  पावसाची स्थिती (मिलीमीटरमध्ये)   

    विभाग  सरासरी पाऊस   पडलेला पाऊस टक्केवारी
    कोकण    २०२.१  ६७.२  ३३.२
    नाशिक  ८४.६   ९.९   ११.७
    पुणे  ८४.४  १५.४  १८.३
    अौरंगाबाद  ९४.३    ८.८     ९.३
    अमरावती   ८८.९ ५.६ ६.३
    नागपूर   १११.७ ४१.३    ३७.०
    महाराष्ट्र  १०७.८   २०.१ 

    १८.६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com