राज्यातील धरणांत निम्मा पाणीसाठा

उजनी धरण
उजनी धरण

पुणे : जून आणि जुलै महिन्यात पाणलोटामध्ये झालेल्या पावसाने धरणांना पाणीपुरवठा करणाऱ्या नद्या, नाले दुथडी भरून वाहिले. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, बुधवारपर्यंत (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ३ हजार २६५ प्रकल्पांमध्ये ७३६.५२ टीएमसी (५०.८८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला तर उजनी आणि जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.  घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोटामध्ये झालेल्या पावसाने नाशिक, पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातून नद्यांना झालेला पाणीपुरवठा यामुळे जायकवाडी आणि उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. अचल पातळीत गेलेले उजनी धरण उपयुक्त पातळीत आले आहे. अचल पातळीतील पाणीसाठा विचारात घेता जायकवाडी धरणात सध्या ५०.७७ (४९ टक्के), उजनी ८२.२५ टीएमसी (७० टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, सध्या धरणात ८६.०२ टीएमसी (८२ टक्के) पाणीसाठा आहे. राज्यात समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी पुढील दोन महिन्यांत जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे.  मराठवाड्यात अवघा २० टक्के पाणीसाठा पावसाचे प्रमाण कमी असल्याने नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणीपुरवठा न झाल्याने जायकवाडी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. मराठवाड्यातील मोठ्या ४४ प्रकल्पांमध्ये ३४.३७ टीएमसी (२२ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ७.०९ टीएमसी (१९ टक्के) आणि लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ११.१२ टीएमसी (३१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील बहुतांशी धरणांत ८० टक्के पाणी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर धो-धो कोसळलेल्या पावसामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणांना पाणीपुरवठा करणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहिल्या. कोयनेसह विभागातील प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. अचल पातळीत गेलेल्या उजनी धरण उपयुक्त पातळीत अाले असून, पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३२९.८८ टीएमसी (७५ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २५.५६ टीएमसी (५३ टक्के) आणि लहान ६४० प्रकल्पांमध्ये १२.२५ टीएमसी (१९ टक्के) पाणीसाठा झाला. नाशिक विभागात ९५.६४ टीएमसी पाणी नाशिक विभागातील धरणांच्या पाणलोटात जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला होता. दारणा, गंगापूर, करंजवन, ऊर्ध्व वैतरणा, भंडारदरा, निळवंडे धरणांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला. काही धरणांमधून विसर्ग करावा लागला असला, तरी विभागतील धरणांमध्ये यंदा गतवर्षी पेक्षा १० टक्के कमी पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ९५.६४ टीएमसी पाणीसाठा झाला. यात मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ७२.३७ टीएमसी (५५ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये ११.४४ टीएमसी (२७ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ११.८३ टीएमसी (३१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.  विदर्भात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात गतवर्षी पावसाने ओढ दिली होती. गतवर्षी १ आॅगस्ट रोजी नागपूर विभागात १९ टक्के तर अमरावती विभागात २२ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र या दोन्ही विभागात अनुक्रमे ३८ व ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील मोठ्या १७ प्रकल्पांमध्ये ४१.६३ टीएमसी (३३ टक्के), मध्यम ४२ प्रकल्पांमध्ये १२.५७ टीएमसी (५६ टक्के), लघू ३२६ प्रकल्पांमध्ये ८.९७ टीएमसी (५० टक्के) पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील मोठ्या १० प्रकल्पात ३२.५२ टीएमसी (३७ टक्के), मध्यम २५ प्रकल्पांमध्ये ८.८६ टीएमसी (३७ टक्के), लघू ४१० प्रकल्पांमध्ये मिळून १०.०६ टीएमसी (२८ टक्के) पाणीसाठा आहे.  कोकणात ८५ टक्के पाणीसाठा  सह्याद्रीच्या पश्‍चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांमुळे कोकणातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकणातील भातसा, सूर्या धामणी, सूर्या कवडास, तिल्लारी प्रकल्पासह ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ७४.८८ टीएमसी (८६ टक्के), ७ मध्यम प्रकल्पामध्ये १४.७६ टीएमसी (८६ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात १५.८५ टीएमसी (८०) पाणीसाठा झाला आहे. राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील १ आॅगस्टपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

विभाग प्रकल्पांची संख्या  एकूण पाणीसाठा   शिल्लक साठा  टक्केवारी
अमरावती ४४५  १४८.००  ५१.४०  ३५
कोकण  १७६   १२३.९२  १०५.५३ ८५
नागपूर ३८५   १६६.०३  ६३.३०   ३८
नाशिक   ५७१ २११.९३  ९५.६४  ७९
पुणे   ७२५  ५३७.४४   ३६७.७०  ६८
मराठवाडा  ९६३    २६०.१२ ५२.९६  २०
एकूण  ३२६५  १४४७.४४ ७३६.५२  ५०.८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com