अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी

अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी
अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. तसेच या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले होते. १९ जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा यात समावेश होता. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश होता.  महसूल विभागाच्या स्थायी आदेशानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतपिके आणि फळबागांना मदत दिली जाते. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये मदत दिली जाते. दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. गेल्या काळातील या नुकसानीपोटी ६२५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एकूण २६ लाख २६ हजार १५० शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com