वऱ्हाडात सर्वदूर दमदार पाऊस

वऱ्हाडात दमदार पाऊस
वऱ्हाडात दमदार पाऊस

अकोला : या हंगामात अातापर्यंत काहीसा रुसलेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत बऱ्यापैकी बरसला अाहे. सोमवारी सकाळपर्यंत वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला असून, यामुळे पिकांना तसेच रखडलेल्या पेरण्यांना फायदा होणार अाहे. अकोला जिल्ह्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळेमन नदीला गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा पूर सोमवारी (ता.नऊ) सकाळी आला. यामुळे शेगाव-अकोला (नागझरीमार्गे) मार्गाची वाहतूक बराच काळ ठप्प होती. 

बुलडाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी नदी-नाले वाहते झाले अाहेत. या जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या मन नदीला मोठा पूर आल्याने शेगाव-नागझरीमार्गे अकोला वाहतूक बंद पडली होती. खामगाव तालुक्यातील विहिगाव अटाळी येथून उगम पावणाऱ्या या नदीला मागील सहा वर्षांत यंदा प्रथमच मोठा पूर अाल्याचे सांगितले जात होते.

शेगाव तालुक्यात आजवर दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट होते. मात्र रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे हे संकट तुर्त टळले आहे. याच जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यांमध्ये अाजवर पावसाचा जोर कमी होता, परंतु या पावसामुळे अाता बऱ्यापैकी दिलासा मिळाला अाहे. घाटाखालील जळगाव जामोद हा तालुका सोडला तर उर्वरित सहा तालुक्यांमध्ये सर्वत्र चांगला पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी बरसत होत्या.

अकोला जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत घेतलेल्या नोंदीमध्ये पातूर तालुक्यात सरासरी ८१.८ मिमी पाऊस झाला. या तालुक्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पाणी आले. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. बाळापूर तालुक्यातही जोरदार पावसाने दाणादाण उडवली. आलेगाव आणि चान्नी मंडळातही सरासरी ८० मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील निर्गुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पूर्णा खोऱ्यात असलेल्या सर्व उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. वाशीम जिल्ह्यातसुद्धा रविवारी रात्री सर्वत्र पाऊस झाला. प्रामुख्याने रिसोड, मालेगाव तालुक्यात चांगला पाऊस पडला अाहे.    

 जिल्हानिहाय पाऊस (मिमी) : अकोला जिल्हा ः अकोला ६.२, बार्शिटाकळी १९.७, अकोट ८, तेल्हारा १५, बाळापूर ४६, पातूर ८१.८, मूर्तिजापूर ६.८,  सरासरी २६.२ मिमी. बुलडाणा जिल्हा ः  बुलडाणा २५.६, चिखली ११, देऊळगावराजा ११.२, सिंदखेडराजा १३.८, लोणार २४.२, मेहकर ३३.४, खामगाव २०.९, शेगाव २२.६, मलकापूर ३३.४, नांदुरा १०.२, मोताळा ४८.३, संग्रामपूर  १३.२, सरासरी २०.६ मिमी. वाशीम जिल्हा ः वाशीम-११.८२, मालेगाव २५.३०, रिसोड ३९.६२, मंगरूळपीर ९.२९, मानोरा १५.७८, कारंजा १२.१५, सरासरी १९ मिमी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com