नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती पवार पहिल्या महिला खासदार

नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती पवार पहिल्या महिला खासदार
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती पवार पहिल्या महिला खासदार

नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार व पक्षांसाठी ही यंदाची निवडणूक अटीतटीची होती. मात्र महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार यांनी विक्रमी विजय संपादन केला आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे हे पुन्हा रिपीट झाले, तर दिंडोरीमधून भाजपने चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी लाटेचा प्रभाव जिल्ह्यात दिसून आला. अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे व दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या उपस्थितीत सर्व व्यवस्था पोलिस यंत्रणेसह काटेकोरपणे ठेवण्यात आली होती. नाशिकच्या २७ तर दिंडोरीच्या २५ मतमोजणीच्या फेऱ्या पार पडल्या;  मात्र कामकाज संथ गतीने झाले. नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत शेतकऱ्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता होती. कांदा, द्राक्ष यांच्या भावासह ड्रायपोर्ट व कृषी टर्मिनलची झालेली घोषणा, शेतीसिंचन व बुडीत निघालेला सहकार याचा परिणाम निवडणुकीत होणार अशी चर्चा होती. ग्रामीण भागात मोदी सरकारबद्दल नाराजीचा सुरू बघायला मिळाला होता. केंद्राच्या ‘शेतकरी सन्मान योजना'' व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता असताना ग्रामीण भागातील जनतेने महायुतीला कौल दिला असल्याचे या निकालात स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीपासूनच हेमंत गोडसे यांनी आघाडी घेतली होती. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ गोडसेंचा विजयी वारू रोखतील अशी अनेकांना खात्री होती. मात्र निकालाचे चित्र वेगळेच पाहायला मिळाले. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या उमेदवारीने नेमकी कुणाला बाधा ठरेल असे बोलले जात होते. दोघांनीही लाखांहून अधिक मते मिळविली. मात्र हेमंत गोडसे यांनी विजयी शिक्कामोर्तब केले. तसेच दिंडोरीमध्ये डॉ. भारती पवार यांनीही पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांना आपल्या पारड्यात भुजबळ पिता पुत्रांचे वजन पडेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. माकपचे उमेदवार व विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांचाही करिश्मा म्हणावा तसा दिसून आला नाही. त्यामुळे दोन्हीही लोकसभा मतदारसंघात महायुतीने २०१४ ची यशस्वी पुनरावृत्ती केली आहे.

दोघांनीही मोडले विक्रम नाशिक लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भानुदास कवडे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा म्हणून निवडून येणारे खासदार म्हणून हेमंत गोडसे हे एकमेव उमेदवार आहेत, त्यामुळे ‘रिपीट’ होण्याचा यांनी बहुमान मिळविला आहे, तर नाशिक जिल्ह्यात पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान भाजपच्या डॉ. भारती पवार यांना मिळाला आहे. उमेदवारांना मिळालेली एकूण मते नाशिक लोकसभा मतदारसंघ

हेमंत गोडसे विजयी (शिवसेना)  ५,६३,५९९
समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)  २,७१,३९५
माणिकराव कोकाटे (अपक्ष) १,३४, ५२७
मताधिक्याने विजय   २,९२,२०४

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

डॉ. भारती पवार (भाजप) ५,६७,४७०
धनराज महाले (राष्ट्रवादी काँग्रेस) ३,६८,६९१
जीवा पांडू गावित (माकप) १,०९, ५७०
बापू बर्डे (वंचित बहुजन आघाडी) ५७,०४८
मताधिक्याने विजय १,९८,७७९

मला मतदारांनी पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या कामासाठी झटल्याचे चीज झाले. - हेमंत गोडसे, शिवसेना विजयी उमेदवार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून माझ्यावर नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार, आता जबाबदारी वाढली आहे. आता मतदारसंघातील समस्या सोडविण्यास प्रयत्नशील राहणार. - डॉ. भारती पवार, भाजप विजयी उमेदवार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com