agriculture news in marathi, higher educated youths prefers farming then service | Agrowon

उच्च पदवीधर तरुणाला अधिक भावली नोकरीपेक्षा शेती
गोपाल हागे
शनिवार, 31 मार्च 2018

अकोला जिल्ह्यातील शिर्ला येथील स्वप्नील सुहासराव कोकाटे या उच्च पदवीधर तरुण शेतकऱ्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची सूत्रे हातात घेतली. पारंपरिक पिकांऐवजी बाजाराची मागणी अोळखून तशा पिकांकडे कल वाढविला. शक्य तेथे उत्पादन खर्च कमी करीत सेंद्रिय शेतीचा अंगीकार केला. हळदीला मुख्य पीक बनवून अन्य हळद उत्पादकांच्या साह्याने सेंद्रिय हळदीचा ब्रॅंड तयार करण्याकडे त्यांनी आगेकूच केली आहे. 

अकोला जिल्ह्यातील शिर्ला येथील स्वप्नील सुहासराव कोकाटे या उच्च पदवीधर तरुण शेतकऱ्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची सूत्रे हातात घेतली. पारंपरिक पिकांऐवजी बाजाराची मागणी अोळखून तशा पिकांकडे कल वाढविला. शक्य तेथे उत्पादन खर्च कमी करीत सेंद्रिय शेतीचा अंगीकार केला. हळदीला मुख्य पीक बनवून अन्य हळद उत्पादकांच्या साह्याने सेंद्रिय हळदीचा ब्रॅंड तयार करण्याकडे त्यांनी आगेकूच केली आहे. 

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात शिर्ला येथील सुहासराव कोकाटे हे शेतकरी राहतात. त्यांची सुमारे ४६ एकर शेती आहे. त्यांना दोन मुले असून दोघेही कृषी क्षेत्रातील ‘एमएस्सी’ झाले आहेत. पैकी थोरला मुलगा अकोला येथे बांधकाम क्षेत्रात काम करतो. 

नोकरी सोडून शेतीत करिअर 
सुहासराव यांचा धाकटा मुलगा स्वप्नील याने हॉर्टीकल्चर क्षेत्रात एमएस्सी केले आहे. तो गुजरातमधील एका कंपनीत नोकरीस होता. त्यात चांगले करियर सुरू असले तरी झालेले शिक्षण व घरची शेती याबाबतच विचार मनात घोळत होते. आपल्याच शेतीत काहीतरी विधायक घडवायचे याच विचाराने आठ वर्षांपासून सुरू असलेली नोकरी सोडण्याचा (२०१५) निर्णय घेतला. त्यानंतर घरच्या शेतीची सूत्रे हाती  घेतली. 

हळदीतून केला पीकबदल 
अकोला जिल्ह्यात सोयाबीन, तूर या पिकांचे क्षेत्र अधिक आहे. कोकाटे यांच्या शेतीतही काही फळबाग क्षेत्र सोडले तर सोयाबीन, मूग, उडीद, तूर हीच पिके घेतली जायची. काही क्षेत्रावर खासगी कंपनीसाठी सोयाबीन, हरभरा पिकांचे बीजोत्पादन घेतले जात होते. संत्रा, कागदी लिंबूची बागही आहे. स्वप्नील यांनी वडील व भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ च्या हंगामापासूनच पीक बदल करायला सुरवात केली. 

मार्केट अभ्यासून हळदीची निवड 
बाजारात असलेली मागणी, दर, उत्पादन, हवामान आदी बाबींचा अभ्यास केल्यानंतर हळद हे पीक स्वप्नील यांच्या पसंतीस उतरले. त्याचे बेणे तयार करण्यासाठी पहिल्या वर्षी अर्धा एकरात लागवड केली. त्याचे बेणे २०१६ च्या हंगामात उपयोगी ठरले. अशा प्रकारे घरच्याच दर्जेदार बेण्याची सोय झाली. 

प्रशिक्षणाचा फायदा
स्वप्नील ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. दोन वर्षांपूर्वी पुणे येथे सकाळ माध्यम समूहाच्या ‘एसआयआयएलसी’ संस्थेत हळद शेतीविषयक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या वेळी  सोयगाव (जि. औरंगाबाद) येथील एका हळद लागवड यंत्र विकसित करणाऱ्या शेतकऱ्याची अोळख झाली. उत्सुकतेपोटी सोयगाव येथे जाऊन ते यंत्र पाहिले. ते खरेदीही केले. त्याची किंमत साधारण  ७५ हजार रुपये आहेत. या यंत्राद्वारे एका दिवसात कमी मजुरांच्या सहाय्याने तीन ते साडेतीन एकरांपर्यंत लागवड होते. 

आंतरपिकातून खर्चात बचत 
हळदीत उडीद व तुरीचे आंतरपीक घेतले. यात उडीद एकरी तीन क्विंटल तर तुरीचा उतारा दोन ते अडीच क्विंटल आला. या प्रयोगामुळे हळदीचा खर्च कमी झाला. शिवाय दोन्ही आंतरपिकांचा जमिनीलाही फायदा होणार आहे.   

उत्पादन व दर 
मागील वर्षी एकरी १२८ क्विंटल अोले तर सुकवलेले २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. सन २०१७ च्या हंगामात सात एकरांतील हळदीची नुकतीच काढणी झाली. त्याचे एकरी १४० क्विंटलपर्यंत (ओले) उत्पादन मिळाले. हळदीचा दर्जा चांगला असल्याने बाजार समितीच्या तुलनेत क्विंटलला सातशे रुपये अधिक दर मिळाला. कळमनुरी येथील गोदावरी शेतकरी उत्पादक कंपनी व अकोला येथील एका मसाले कंपनीने खरेदी केली. त्यास ७८०० ते ८००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

रासायनिक घटकांना सोडचिट्ठी 
रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी केला. या वर्षी बहुतांशी वापर सेंद्रिय म्हणजे जीवामृत, दशपर्णी अर्क आदींचा केला. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे पाण्याची गरज कमी झाली. फेब्रुवारी महिन्यापासून हळदीचे पाणी बंद झाले. तरी मार्च महिन्यात काढणीत अडचण आली नाही. शेत अत्यंत भुसभुशीत राहिल्याने मजुरांना कंद वेचायला सोपे गेले. उत्पादन खर्च सुमारे ५० टक्के कमी झाला.
  
सेंद्रिय हळदीचा ब्रॅंड तयार करणार 
हळदीवर प्रक्रिया करून नागपूर, अमरावती सारख्या शहरांमध्ये "सेंद्रिय’ ब्रॅंड तयार करून विक्री करण्याचे स्वप्नील यांचे उद्दीष्ट आहे. त्यांनी शेजारील चार- पाच जिल्ह्यांतील ३५० शेतकऱ्यांचा व्हॉट्‌स ॲप ग्रूप तयार केला आहे. त्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेण्याचा मानस आहे.  

पाणी समस्येवर शोधला उपाय 
पातूर तालुक्‍यात दरवर्षी पावसाचे प्रमाण घटते आहे. या हंगामात अवघा ४०० मिमी. पाऊस झाला. विहिरी आटल्या असून बारमाही ओलिताची सोय असणारे शेतकरी हंगामी सिंचनावर आले. कोकाटे यांच्याकडेही दोन विहिरी, शेततळे घेऊनही पुरेसे पाणी नाही. ठिबकचा वापर केला जातो. मात्र पुरेशा पाण्याअभावी हळदीला फेब्रुवारीपासून बंद करावे लागले. पाणी फाउंडेशनतर्फे गावात जलसंधारणाची कामे झाली. ग्रामस्थांनी श्रमदान केले. या कामामुळे तालुका स्तरावर गावाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पाणी फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनीही गावाला भेट दिली आहे. स्वप्नीलदेखील सामुदायिक शेततळे खोदण्याच्या प्रयत्नात आहेत.  

आधुनिक पद्धत व यांत्रिकीकरण 

  • पारंपरिक पद्धत सोडून गादीवाफ्यावर (बेड)लागवड 
  • दोन बेडमधील अंतर पाच फूट तर दोन झाडांमधील अंतर नऊ इंच
  • बेडमधील अंतर जास्त असल्याने आंतरपीक घेणे सुकर बनले
  • लागवडीपूर्वी बेणेप्रक्रियेवर भर 
  • प्लॅंटरद्वारे लागवड केल्याने मजुरांची संख्या कमी लागली. पर्यायाने मजुरीचा खर्च वाचला.
  • लागवड एकसमान पद्धतीने होत असल्याने रोपांची संख्याही योग्य राहते.  
  • कंद लागवडीची खोली, अंतर एकसारखे मिळत असल्याने उत्पादन वाढीला पोषक
  •  : स्वप्निल कोकाटे, ९९२२३३१९८१ 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...