'पणन अाणि प्रक्रियेवर भर देऊन शेतीचे चित्र बदला'

नाशिक ः शेतकरी सन्मान जागर अभियान.
नाशिक ः शेतकरी सन्मान जागर अभियान.

नाशिक  : कुणाची वाट पाहण्यापेक्षा एकत्र येऊन शेतीतील समस्या समजावून घेऊन त्या सोडवूया. शेतीकडे बघण्याचा जुनाट दृष्टिकोन बदलून नव्या युगातील मार्केटिंग व प्रोसेसिंग या मंत्राचा जपच शेतीतील समस्या सोडवू शकतो. शेती आज किफायतशीर नसली, तरी भविष्यात इतर सर्वच क्षेत्रातील रोजगार कमी झाल्यानंतर शेतीतच रोजगार उपलब्ध राहणार आहे. यामुळे भविष्यासाठी शेती जपून ठेवा, शेती हातातून जाऊ देऊ नका, असा मंत्र शेतकरी सन्मान जागर अभियानामध्ये देण्यात आला.

मखलाबाद येथील राम मंदिर सभागृहात शनिवारी (ता. २३) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व सकाळ यांच्या माध्यमातून शेतकरी सन्मान जागर या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक शेतीचा दृष्टिकोन देण्याबरोबरच सामाजिक भान देणाऱ्या या अभियानात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी मार्गदर्शन केले. 

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, प्रल्हाद गडाख, डॉ. प्रशांत देवरे, श्री. खताळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे आदी उपस्थित होते. संचालक सचिन पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. 

शेतकरी सन्मान जागर अभियानास मखमलाबाद परिसरातील शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला गोकुळ काकड, सुभाष तिडके, रामचंद्र काकड, दामोधर मानकर आदींनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

प्रत्येक शेतकरी व्हावा मार्केटिंग बोर्ड : झगडे  नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने जगात ते विकते ते पिकवायला शिकले पाहिजे. आपणच पिकविलेल्या शेतीमालावर प्रक्रिया करून लोकांना खाण्यासाठी तयार वस्तू पुरवा. तुम्ही ते विकले नाही, तर जगभरातील शेतकरी ते विकतील. यासाठी पणन मंडळावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक शेतकरीच स्वतः मार्केटिंग बोर्ड झाला पाहिजे. ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे शेतीमाल पुरवला पाहिजे, तरच आपण कर्जबाजारीपणा व कर्जमांफी या शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. श्री. झगडे यांनी जागतिक दृष्टिकोनातून आपल्या देशातील शेतीच्या समस्येचे विश्‍लेषण केले. 

शेतीतील नियोजन शिकले पाहिजे : नीलिमा पवार  शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक शेतीचा कास धरून शेतीचे नियोजन केले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे प्रोसेसिंग युनिट टाकून आपले ग्राहक तयार केले पाहिजेत, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांनी केले. श्रीमती पवार यांनी शेतकरी सन्मान जागर या अभियानाची संकल्पना सांगितली. त्या म्हणाल्या, की शेतीच्या समस्या गंभीर होत चालल्या असून, त्या समजून घेऊन सोडविण्यासाठी संस्थेने या अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व कौशल्य विकास यांची मदत करण्याचा मानस आहे. संस्थेच्या माती, पाणी परीक्षणाच्या फिरत्या व्हॅनचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. तसेच युवा शेतकऱ्यांना शेतीतील कौशल्यही कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिकविली जातील. या बरोबरच सामाजिक अनिष्ठ रुढी परंपरांना आपण तिलांजली दिली पाहिजे.

शेती व शिक्षणाच्या एकत्रीकरणाची गरज : श्रीमंत माने  पूर्वी आपल्याकडे शेती व शिक्षण हे एकमेकांशी संलग्न होते. तोपर्यंत शेतीमध्ये कुठल्याही समस्या नव्हत्या. परंतु आता आपण शेती व शिक्षक यांच्याकडे सुट्या पद्धतीने बघत असल्यामुळे शेतीतील समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा शेती व शिक्षणाची सांगड घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले. श्रीमंत माने म्हणाले, की मविप्र व सकाळ यांनी सुरू केलेले शेतकरी सन्मान जागर अभियान नव्या पर्वाची सुरवात आहे. शेतकरी व शिक्षण यांची सांगड या माध्यमातून घातली जाणार आहे. आम्ही केलेल्या पाहणीनुसार विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये ७० टक्के शेतकरी हे विभक्त कुटुंबातील होते, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातच आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार देण्याची गरज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com