पुणे जिल्ह्यात ६१५० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

फळबाग लागवड
फळबाग लागवड
पुणे  ः पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ६१५० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेतून विविध फळझाडांची लागवड करता येणार आहे.
या योजनेतून २०१६-१७ मध्ये ४०९ तर २०१७-१८ मध्ये ८३२ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉबकार्डची मुख्य अट असल्याने शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद या योजनेस मिळत आहे. या योजनेतून फळबाग लागवडीसाठी शासनाकडून पूर्वी २०१ रुपये याप्रमाणे रोजंदारी दिली जात होती. चालू वर्षी यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना २०३ रुपयांप्रमाणे रोजंदारी मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले असून जास्तीत जास्त लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या योजनेतून शेतकऱ्यांना आंबा, डाळींब, द्राक्षे, लिंबू, मोसंबी, चिंकू, सिताफळ, बोरं अशा विविध फळझाडाची लागवड करता येणार आहे. कृषी सहायकांना प्रतिदहा हेक्‍टर याप्रमाणे लागवडीचा लक्षांक देण्यात आला आहे. 
तालुका कृषी कार्यालयाकडून लक्षांकाप्रमाणे तत्काळ संमतीपत्रके प्राप्त करून घेत तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी, मस्टर काढणे, खड्डे खोदणे अशी कार्यवाही सुरू करावी. त्यासाठी प्रक्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बैठका आयोजित करून योजनेची अंमलबजावणी सुरळीत करून मार्गदर्शक सूचनानुसार लक्षांक साध्य करावा.
शासकीय रोपवाटिकेतील उपलब्धतेनुसार लागवडीसाठी आवश्‍यक कलमे, रोपांचे उचलीबाबत नियोजन करावे. त्यासाठी कलम रोपांची मागणी कार्यालयास सादर करावी. जेणेकरून कमी पडणारी कलमे, रोपे परजिल्ह्यातील शासकीय किंवा विद्यापीठाच्या रोपवाटिकेमधून उपलब्ध करण्यासाठी विभागास, आयुक्तलयास मागणी करण्यासाठी सोपे होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.     
 
योजनेचा लाभ घेण्यासाठी  अटी व नियम ः 
लाभार्थी जॉबकार्डधारक असावा, अनुसूचित, जाती, जमाती, दारिद्र रेषेखालील लाभार्थी असावा, भूसुधार योजनेचा लाभार्थी असावा, इंदिरा आवास योजनेचा लाभार्थी असावा, कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती योजनेत सहभागी होऊ शकेल, योजनेत सहभागासाठी ग्रामसभेची मंजुरी हवी.
 
जिल्ह्यातील फळबाग लागवडीचे उद्दिष्ट (हेक्‍टर) : 
भोर ३९३, वेल्हा २६२, मुळशी ३९३, मावळ ३९३, हवेली ५२३, खेड ५२३, आंबेगाव ५२३, शिरूर ५२३, जुन्नर ५२३, बारामती ५२३, इंदापूर ५२३, दौंड ५२४, पुरंदर ५२४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com