फळबाग योजनेला उदंड प्रतिसाद

फळबाग लागवडीच्या नव्या योजनेसाठी गरजू शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू आहे. नोकरी, व्यापार करीत नसल्याचे हमीपत्र लिहून देणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. जोडधंदा किंवा नोकरी, व्यवसायाचे साधन नसलेल्या शेतकऱ्याला फळबागेच्या रूपाने उदरनिर्वाहासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल. - शिरीष जमदाडे, फलोत्पादन सहसंचालक
फळबाग
फळबाग

पुणे:  राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कै. पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच वर्षी सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील पात्र शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. फळे निर्यातीत देशात आघाडीचे राज्य असणाऱ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा गरूडभरारी घेण्याची संधी या योजनेमुळे मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यात रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) फळबाग लागवड होते. मात्र, त्यात जॉबकार्ड सक्ती तसेच अनेक अटी असल्यामुळे काही भागांमध्ये या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही.  `आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊनच नवी योजना केली आहे. त्यात जॉबकार्ड अट काढून टाकली आहे. मनरेगात अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो,` असे सूत्रांनी स्पष्ट केले.  शेतकऱ्यांकरिता नव्या फळबाग योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सात ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीत १ लाख ४४ हजार ५७८ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून क्षेत्र १ लाख ३५ हजार ६७१ हेक्टर आहे. अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नाही. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पूर्वसंमती पत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. योजनेत सर्वात जास्त पेरूला अनुदान असून, ते तीन लाख रुपयांपर्यंत असेल. शेतकऱ्यांना या योजनेतून पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि शेवटच्या वर्षी २० टक्के अनुदान दिले जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.  गेल्या हंगामात देशातून ३ हजार ११३ कोटी रुपये मूल्याची ३ लाख ५१ हजार ८३३ टन प्रक्रियायुक्त फळे निर्यात झाली. त्यात राज्याचा वाटा ३४ टक्के म्हणजे १ हजार ५४ कोटी रुपयांचा होता. देशातून ताज्या फळांची निर्यात ४ लाख ९ हजार ९३८ टन इतकी झाली. त्याचे मूल्य १ हजार ८५८ कोटी रुपयांचे होते. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा १ लाख २८ हजार टनाचा असून, त्याचे मूल्य ८०५ कोटी रुपये भरते.  शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्याची कारणे 

  • अतिघनदाट फळबाग लागवडीला प्राधान्य 
  • जॉबकार्ड, किचकट नियमांना फाटे 
  • सोडत काढून प्रत्येक शेतकऱ्याला नंबर
  • रोपांऐवजी कलमांना अनुदान मिळणार 
  • कलम लागवडी व ठिबक सक्तीमुळे बागा लवकर वाढणार
  • गरजू शेतकऱ्याला प्राधान्य 
  • नव्या फळबाग योजनेची वैशिष्ट्ये

  • पहिल्या वर्षी अनुदान वाटप होणार- १०० कोटी
  • अर्जदार शेतकऱ्यांची संख्या -१.४४ लाख
  • नव्या बागांचे नियोजित क्षेत्र- १.३५ लाख हेक्टर
  • पहिल्या टप्प्यात होणारी उभारणी- ३० हजार हेक्टर
  • अनुदान मर्यादा- किमान २० गुंठे आणि कमाल ६ हेक्टर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com