agriculture news in Marathi, horticulture in trouble due to drought, Maharashtra | Agrowon

परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा व्हेंटिलेटरवर (video सुद्धा)
माणिक रासवे
सोमवार, 20 मे 2019

जायकवाडी कालव्याच्या पाण्याच्या आशेने केळी लागवड केली. कालव्याला पाणी होते तोपर्यंत विहिरीला पाणी होते. परंतु उन्हाळी आवर्तन न मिळाल्यामुळे दोन एकर केळी आणि ऊस होरपळून गेला. सर्व खर्च वाया गेला. आता पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.
- नारायण गिराम, लोणी बु., ता. पाथरी, जि. परभणी

परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे सद्यःस्थितीत दुष्काळाची दाहकता अधिकच जाणवत आहे. पाण्याअभावी होरपळत असलेल्या हजारो हेक्टरवरील फळबागा व्हेंटिलेटरवर आहेत. प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता अनेक शेतकरी जिवापाड जपलेल्या फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. जिद्दीने दुष्काळाशी दोन हात करून झुंज देत आहेत. परंतु मॉन्सूनच्या आगमनास विलंब लागण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा चिंता वाढविणारी आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे.

जिल्ह्यत फळबागांचे क्षेत्र ५ हजार ४७४ हेक्टर आहे. संत्रा, लिंबू, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, केळी ही प्रमुख फळपिके आहेत. त्यातही संत्र्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. परभणी, पूर्णा, मानवत, जिंतूर या तालुक्यात संत्रा फळपिकांखालील क्षेत्र अधिक आहे. सेलू, परभणी तालुक्यात लिंबाचे क्षेत्र आहे. पूर्णा, सेलू, पाथरी, मानवत, जिंतूर तालुक्यात मोसंबीचे तर पाथरी, परभणी, जिंतूर, मानवत आदी तालुक्यांत प्रामुख्याने केळीचे उत्पादन घेतले जाते. सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात डाळिंब, पेरू, सीताफळ या फळपिकाची लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या दुष्काळात पाण्याअभावी सरपण झालेल्या संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, पपई आदी फळपिकांच्या बागा शेतकऱ्यांना मोडून टाकाव्या लागत आहेत.

शेतकरी मांडताहेत व्यथा.. पहा व्हिडिओ


सध्या दुष्काळी मदत खात्यावर जमा होत आहे. परंतु जिल्हा बॅंकेत नोटांची टंचाई आहे. त्यामुळे एका चकरामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. असंख्य शेतकऱ्यांकडे खरिपाच्या पेरणीसाठी पैसे नाहीत. कर्जमाफीचा घोळ अजून सुरूच आहे. बॅंकांनी अद्याप नवीन पीककर्ज वाटप सुरू केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी उधर उसनवारीसाठी इतराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. 

सर्वच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी अडचणीत...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचा लाभ पाथरी, मानवत, परभणी गंगाखेड, पूर्णा या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो. जायकवाडीत २०१७ च्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा जमा झाला होता. शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे डाव्या कालव्याद्वारे जेमतेम दोन आवर्तने मिळाली. नियमित पाणी आवर्तनाच्या भरवशावर केळी, ऊस लागवड केलेल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जबर फटका बसला ऊस तसेच केळीचे पीक पाण्याअभावी होरपळून गेल्याने लागवड खर्च वाया गेला. अपूर्ण काम असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर रब्बी हंगामात पाणी आवर्तन सोडण्यात आले होते, परंतु त्याने फारसा फायदा झाला नाही. सिद्धेश्वर कालव्याचे पाणी मिळाले नाही. करपरा मध्यम प्रकल्पाच्या धरणातून रब्बीसाठी आवर्तने मिळाली, परंतु मासोळी मध्यम प्रकल्पाची आवर्तने मिळाली नाहीत. लघू प्रकल्प तसेच गोदावरी नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. 

टॅंकरच्या चुकत आहेत फेऱ्या
जिल्ह्यातील ६३ लोकवस्त्यांवरील लाखाहून अधिक लोकसंख्येला ६८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तीनशेहून अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, असे सरकारी अहवाल सांगतो. परंतु ग्रामीण भागातील भारनियमन तसेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने टॅंकर भरण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे टॅंकरच्या फेऱ्या चुकत आहेत. मानवत तालुक्यातील पाळोदी या गावाची लोकसंख्या साडेपाच हजारावर आहे. गावात एक टॅंकर सुरू झाला असून, गावातील विहिरीत पाणी आणून टाकले जात आहे. परंतु वीजपुरवठा विस्कळित झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून टॅंकर आला नाही.

पाणी विक्रीचे व्यवसाय जोरात
नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत आटल्यामुळे, तसेच अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींच्या नियोजन अभावी ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. या परिस्थितीत गावागावातून शुद्ध पाण्याच्या नावाखाली थंड पाण्याच्या जारची वीस ते तीस रुपये दराने विक्री केली जाते. अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना असे थंड पाणी विकत घेणे परवडत नाही. त्यांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

संत्रा फळबाग वाचविण्यासाठी धडपड
हत्तलवाडी येथील शिवाजी शिंदे आणि जयश्री शिंदे यांची दोन हेक्टर संत्रा बाग आहे. पाच वर्षांची ही बाग वाचविण्यासाठी या दांपत्याची पराकाष्ठा सुरू आहे. संत्रा फळबाग जिवंत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. चारा वैरण नसल्यामुळे बैलजोडी तसेच दुभती म्हैस विकली. त्यातून आलेल्या पैशावर सामाईक विहिरीतील गाळ काढला. परंतु त्याने फारसा फरक पडला नाही. त्यामुळे एक बोअर खोदला, परंतु त्यालादेखील फारसे पाणी लागले नाही. आता केवळ १५ ते २० मिनिटे चालतो. त्यामुळे संत्रा बाग जगविणयासाठी बाराशे रुपये दराने पाच हजार लिटरचे टॅंकर भरून पाणी विकत घ्यावे लागले. गावात केवळ हातपंप सुरू आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शेतातून घरी पाणी न्यावे लागत आहे. या परिस्थितीत उत्पन्नाचा स्रोत म्हणून गावरान आणि कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन सुरू केले. अंडी न विकल्यामुळे पक्ष्यांची संख्या पाऊणेदोनशेपर्यंत वाढली; परंतु तापमानात वाढ झाल्यामुळे त्यातील अर्ध्याहून अधिक मृत्युमुखी पडली. आॅनलाइन भरलेली संत्र्याचा विमा भरपाई मिळाला नाही. कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. बॅंका नवीन कर्ज देत नाहीत. मुलांच्या शिकवणीच्या फीसाठी तगादा लागला आहे, अशा व्यथा शिवाजी शिंदे आणि जयश्री शिंदे या दांपत्याने सांगितल्या.

प्रतिक्रिया
दुष्काळी अनुदानाच्या याद्या बॅंकेत लागल्या आहेत. परंतु जिल्हा बॅंकेत पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध होत नसल्याने पैसे उचलण्यासाठी चकारा माराव्या लागत आहेत. खरिप पीक कर्जवाटप सुरू केलेले नाही. हिरवा चारा संपला आहे. कडबादेखील कमी आहे. त्यामुळे दूध उत्पादन कमी झाले आहे.
- बाळासाहेब रनेर, शेतकरी, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.

दोन एकर हळद ८० हजार रुपये खर्च केला. पाणी कमी पडल्यामुळे काढून फेकून द्यावी लागली. कर्जमाफी म्हणायलेत पण माफी कुठे झाली तसच नावावर दिसायले कर्ज. पहिलीच देणी थकल्याने पेरणीसाठी व्याजानं द्यायला पण कुणी तयार नाही. संत्रा बाग वाचविण्यासाठी खर्च होतोय. त्यामुळे सरकारन बागा जगविण्यासाठी अनुदान द्यावं.
- शिवाजी शिंदे, शेतकरी, हत्तलवाडी, ता. मानवत, जि. परभणी

गावातील नळयोजना ८ ते १० महिन्यांपासून बंद आहे. तुरीचे खळे झाले तेव्हापासून शेतातून घरी बैलगाडीत पाणी न्यावे लागत आहे. विहिरीत साठवून ठेवलेले पाणी दुष्काळात कामी येत आहे.
- लक्ष्मण साखरे, शेतकरी, सावरगाव, ता. मानवत.

टॅंकरसाठी अधिग्रहण केलेल्या विहिरीवरील पंपाचा विजपुरवठा खंडित होत असल्याने दोन दोन दिवस पाण्याचा टॅंकर गावात येत नाही. एका टॅंकरने गावाची पाण्याची गरज भागत नाही. त्यामुळे टॅकरची संख्या वाढविण्याची मागणी केली, परंतु त्याकडे प्रशासनाकडून दुलर्क्ष केले जात आहे.
- विजय काकडे, पाळोदी, ता. मानवत, जि. परभणी.

शिवारात पाणी नसल्यामुळे फळबागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. गावात पाणी नसल्यामुळे महिनाभरापासून टॅंकर सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाण्यासाठी हाल सोसावे लागणार आहेत.
- पांडुरंग काळे, शेतकरी, सावळी, ता. मानवत, जि. परभणी.

शिमग्यापासून विहिरीला झुळुझुळू पाणी येतंय. आत ते बी कमी झालं. पपईची बाग वाचविण्यासाठी दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी घेतलं पण त्याचा उपयोग झाला नाही. समंदी पपईची बाग वाळून गेली.
- जनार्दन काकडे, शेतकरी, पाळोदी, जि. परभणी.

गतवर्षी जून मध्ये एक हेक्टरवर संत्रा लागवड केली. फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन तास चालणारा बोअर आता अर्धा तासदेखील चालत नाही. त्यामुळे टॅंकरने पाणी विकत घ्यावं लागत आहे. संत्र्याच्या झाडांभोवती गव्हाचा भुसा टाकला आहे.
- सोमेश्वर शिंदे, शेतकरी, हत्तलवाडी, ता. मानवत, जि. परभणी

 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...