पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपण

लोण खुर्द येथून पाणी आणले आहे. प्रतिटॅंकर साडेतीन हजार रुपये याप्रमाणे दोन वेळा पाणी विकत घेतले. दांड भिजविले. आता विहिरीचे पाणी पुरत नाही. शेतातून गावात पाणी न्यावे लागत आहे. - गंगाधर अफुने, शेतकरी, पिंपळा लोखंडे.
दुष्काळ
दुष्काळ

परभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव म्हणून ओळख पिंपळा लोखंडे (ता. पूर्णा) येथील फळबागा पाण्याअभावी वाळून जात आहेत. अनेक शेतकरी पाणी विकत आणून फळबागा जगविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत; परंतु पाणी विकत घेऊ शकत नसलेल्या अनेक शेतकऱ्यांना सरपण झालेल्या संत्रा बागा उपटून टाकाव्या लागल्या आहेत. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे संत्रा फळबागा उद्ध्वस्त असल्याने गावाच्या अर्थकारणाला खीळ बसली.  परभणी जिल्ह्यातील पूर्णा-हिंगोली-अकोला लाेहमार्गावरील पिंपळा लोखंडे (ता.पूर्णा) हे सुमारे ३ हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील बहुतांश शेतकरी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कापूस, सोयाबीन, तूर या पारंपारिक पीकपद्धतीसोबत संत्रा फळपिकाचे उत्पादन घेत आहेत. या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी किमान १०० ते कमाल २००० एवढी संत्रा झाडांची लागवड केलेली आहे. गावशिवारातील संत्र्याचे क्षेत्र ३०० हेक्टर एवढे आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून उद्भवत असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे संत्रा उत्पादकांची होरपळ सुरू झाली आहे.  पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर (जि. हिंगोली) येथील धरणाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ होतो. येलदरी धरण भरत नसल्यामुळे कालव्याच्या पाण्याची खात्री राहिली नाही. गतवर्षी कालव्याचे पाणी मिळाले होते; परंतु यंदा मिळाले नाही. त्यामुळे गतवर्षी मिळालेले उत्पन्न यंदा फळबागा वाचविण्यावर खर्च होत आहे. लोण येथील तलावातून पाइप लाइनद्वारे पाणी आणले आहे; परंतु आता या तलावातील पाणीदेखील कमी झाले आहे. काही शेतकरी विहिरी, बोअर खोदत आहेत. काही शेतकरी १५ ते २० किलोमीटरवरील पूर्णा नदीकाठच्या गावातील विहिरींवरुन टॅंकद्वारे फळबागा वाचविण्यासाठी पाणी आणत आहेत. फळबागातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम फळबागा वाचविण्यासाठी खर्च होत आहे. गावातदेखील पुरेशा प्रमाणात टॅंकरने पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिंपळा लोखंडे येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. फळबागा लागवडीसाठी जसे अनुदान देण्यात येते तसे फळबागा जगविण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गावाच्या अर्थकारणाला खीळ संत्र्याची बागेतूनच विक्री होते. शेतकऱ्यांना व्यवस्थापनानुसार एकरी दीड ते २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु सततच्या दुष्काळामुळे संत्रा उत्पादनात घट येत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे फळांचा दर्जादेखील राहिला नाही. त्यामुळे उत्पन्न घटले आहे. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च फळबागा वाचविण्यासाठी करावा लागत असल्याने संत्रा उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. गरजेपेक्षा कमी पाणीपुरवठा गावाची लोकसंख्या ३००० आहे. सध्या गावाला दोन टॅंकरद्वारे १४ हजार लिटर एवढा पाणीपुरवठा केला जाताे. टॅंकरच्या वेळा देखील भारनियमानुसार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना टॅंकर साठी ताटकळ बसावे लागत आहरे. प्रतिव्यक्ती १६ लिटर याप्रमाणे दररोज ४८ हजार लिटर पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. त्यासाठी फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. फळबाग वाचविणे अशक्य फळबागा वाचविण्यासाठी काही शेतकरी विहिरी, बोअर खोदण्याचा पर्याय निवडत आहेत; परंतु ७० ते ८० फूट विहिरी आणि ५०० ते १००० फूट बोअर खोदून पाणी लागत नाही. त्यामुळे खर्च वाया जात आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत गावातील काही शेतकऱ्यांनी शेततळ्यांची उभारणी केली आहे. शेततळ्यात भरण्यासाठी अनेकांकडे पाणी नाही. शेततळ्यातील पाणीसाठा कमी होत आहे. येत्या काळात फळबागा वाचविणे अशक्य आहे. परशराम लोखंडे, दासू अप्पा, डिंगांबर लोखंडे, बापूराव लोखंडे, साहेबराव पोवळे, धोंडिराम लोखंडे, बालाजी लोखंडे आदि शेतकऱ्यांवर फळबागा उपटून टाकण्याची वेळ आली.

प्रतिक्रिया माझ्याकडे संत्र्याची १ हजार ३५० झाडे आहेत. तीन विहिरी, बोअर आटले आहेत. त्यामुळे पाच किलोमीटरवरील लोण येथून पाइपलाइनद्वारे आणलेले पाणी शेततळ्यात साठविले आहे. गतवर्षी सिद्धेश्वर कालव्याचे पाणी मिळाले होते. त्यामुळे संत्रा बागेतून १० लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले. यंदाच्या दुष्काळात फळबागा वाचविण्यासाठी दुसऱ्या गावाहून पाणी आणण्यासाठी साडेतेरा लाख रुपये खर्च झाला. नवीन फळबाग लागवडीसाठी दिले जाते त्याप्रमाणे जुन्या फळबागा जगविण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे - एकनाथ लोखंडे, शेतकरी, पिंपळा लोखंडे, ता. पूर्णा संत्रा फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरने पाणी आणत आहेत. काही शेतकरी बोअर घेत आहेत. सर्व पाण्यावर खर्च होताे. गावात देखील टॅंकर सुरू आहेत. ४८ हजार लिटर गरज असताना केवळ चौदा हजार लिटर पाणी मिळत आहे. त्यातही गळती होते. अपुऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. टॅंकरच्या फऱ्या वाढवाव्यात. - तुकाराम लोखंडे, सरपंच, पिंपळा लोखंडे, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com