ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे

ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे

ज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव हेऊ शकतो. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. जमिन : मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. पेरणीचा कालावधी : जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.

बियाण्याचे प्रमाण : संकरित ज्वारीसाठी हेक्टरी ७.५ किलो तर सुधारित वाणासाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.

लागवडीचे अंतर व ताटांची संख्या : पेरणी तिफणीने किंवा पाभरीने दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १२ सें.मी. ठेवून करावी. शिफारशीप्रमाणे हेक्टरी १.८० लाख झाडांची संख्या ठेवावी. गरज भासल्यास नांगी भरणे किंवा विरळणी करावी.

बीजप्रक्रिया : अझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक, नत्र व स्फुरद विद्राव्य जिवाणू २५० ग्रॅम प्रति ८ ते १० किलो बियाण्यास या प्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते. उशिरा पेरणी करावी लागल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायामिथोक्झाम (७० टक्के) २.१ ग्रॅम क्रियाशील घटक ३ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन : हेक्टरी ५ टन शेणखत मातीत चांगले मिसळून द्यावे. प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश खताची शिफारस केली आहे. त्यापैकी पेरणी करताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश द्यावे. शक्यतो पहिली मात्रा संयुक्त किंवा मिश्रखतातून (१५० किलो १०:२६:२६ मिश्रखत व ५० किलो युरिया) द्यावी. उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ८५ किलो युरियाद्वारे द्यावे. खते पेरणीच्या वेळी बियाण्याखाली ५ सें.मी. खोलीवर द्यावीत.

आंतरमशागत : पेरणीनंतर ८-१० दिवसांनी नांग्या  भराव्यात. २० दिवसांनी १५ सें.मी. अंतरावर १ रोप या प्रमाणे विरळणी करावी. तणनियंत्रणासाठी पीक ४०-४५ दिवसाचे होईपर्यंत दोन वेळा खुरपणी व दोन वेळा कोळपणी करावी.

आंतरपीक : खरीप ज्वारी व सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात दोन ओळीत पेरणी करावी. खरीप ज्वारी व तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणात पेरणी करावी. ज्वारीचा नोंदणीकृत बीजोत्पादन कार्यक्रम घेत असताना आंतरपीक घेऊ नये.

बहुविध पीक पद्धती : खरीप ज्वारी नंतर हरभरा किंवा जवस किंवा करडईची पेरणी करावी.

ज्वारीवरील पहिल्या टप्प्यातील किडींचे व्यवस्थापन

खोडमाशी : पिकाची अवस्था  : बाल्यावस्था (१० ते ३० दिवस) लक्षणे : पोंगेमर होऊन झाडाला जमिनीलगत फुटवे फुटतात. नियंत्रण : अाॅक्सीडिमेटॉन मिथाईल (२५ टक्के प्रवाही) किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोडकिडा : पिकाची अवस्था : बाल्यावस्था ते पक्व (२५ ते १०० दिवस). लक्षणे : पानांवर एका सरळ रेषेत छिद्रे दिसतात. पोंगेमर होते. कणीस मधून फाटते. नियंत्रण : क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पोंग्यातील ढेकूण : पिकाची अवस्था : पोंगे अवस्था (३० ते ६० दिवस) लक्षणे : झाड पिवळे पडून वाळते किंवा नीट निसवत नाही. नियंत्रण : डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वाण सरळ वाण : पीव्‍हीके – ८०१ (परभणी श्‍वेता), पीव्हीके ४०० (पांचाली), पीव्हीके – ८०९, सीएसव्ही – १७,सीएसव्ही - २०, सीएसव्ही – २३

संकरित वाण : सीएसएच – १४, सीएसएच – १६, सीएसएच – २३, सीएसएच – ३०, सी. एस. एच. २५ (परभणी साईनाथ), एस. पी. एच. १६४१

संपर्क : डॉ. एस. पी. म्हेत्रे, ०२४५२ - २२११४८ (लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत अाहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com