‘अंकुर सीड्स’च्या वाणात आढळला ‘एचटी’ जीन

हंगामापूर्वी सर्वच कंपन्यांच्या गोदामातून नमुने एकाचवेळी घेण्यात आले. त्यामुळे गोंधळ उडून नमुने बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आम्ही शेतकऱ्यांचा विश्‍वास गेल्या अनेक वर्षांत संपादित केला आहे. आमच्या कपाशी वाणांना मागणी असताना आमच्याकडून असे प्रकार होणे शक्‍यच नाही किंवा आम्हाला त्याची गरजही नाही. याविरोधात आम्ही न्यायालयात आमची भूमिका मांडू. - माधवराव शेंबेकर, व्यवस्थापकीय संचालक, मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेड, नागपूर
बीटी बियाणे
बीटी बियाणे

अमरावती ः मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडच्या ३०२८ या कपाशी वाणातच एचटी जीन आढळून आले आहे. १०० पैकी ३० नमुन्यांमध्ये तणनाशकास सहनशील जनुकीय अंश (एचटी) जीन असल्याची धक्‍कादायक बाब अहवालात समोर आल्यानंतर या प्रकरणी विभागीय गुणनियंत्रक डॉ. पंकज चेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे नागपूर येथील व्यवस्थापकीय संचालक व उपप्रादेशिक व्यवस्थापक चिरंजीव रेड्डी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. महाराष्ट्र कापूस बी-बियाणे नियम २००९ अन्वये या वर्षी पहिल्यांदा बाजारात बियाणे पोचण्यापूर्वीच कंपन्यांच्या गोदामात, प्रक्रिया केंद्रात नमुने घेण्यात आले.  मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडच्या मलकापूर  (जि. बुलडाणा) येथील बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातूनदेखील ३०२८ या बिजी-२ वाणाचे नमुने १५ मे २०१८ रोजी घेण्यात आले. २५ मे २०१८ रोजी हे नमुने विश्‍लेषणाकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आले. १९ जुलै रोजी त्याचा अहवाल प्राप्त झाला. अंकुर सीड्स चे हे बियाणे केंद्र शासनाच्या जनुकीय समितीने निर्बंध घातलेले तणनाशकास सहनशील जनुकीय अंश ३० टक्‍के पॉझिटीव्ह असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात नमुद होते. अशा बियाण्याच्या वापरामुळे पर्यावरण तसेच शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाच्या अमरावती विभागीय गुणनियंत्रण संचालकांनी या संदर्भाने पुणे कृषी आयुक्‍तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.  अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत या प्रकरणी तत्काळ कारवाईच्या सूचना अमरावती विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या.

पोलिसांनी केले गुन्हे दाखल दरम्यान, मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडचे नागपूर येथील व्यवस्थापकीय संचालक; तसेच मलकापूर (जि. बुलडाणा) येथील प्रक्रिया केंद्राचे प्रादेशिक उपव्यवस्थापक चिरंजीव रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती विभागीय गुणनियंत्रण संचालक डॉ. पंकज चेडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com