एचटीबीटी कापूस उपटून नष्ट करण्याची शिफारस

एचटीबीटी कापूस उपटून नष्ट करण्याची शिफारस
एचटीबीटी कापूस उपटून नष्ट करण्याची शिफारस

देशात अनधिकृत व बेकायदा लागवड करण्यात आलेल्या तणनाशक प्रतिरोधक (एचटीबीटी) कापूस वाणांचे पीक उपटून समूळ नष्ट करावे, अशी शिफारस फिल्ड इन्सपेक्शन ॲन्ड सायन्टिफिक इव्हॅल्युएशन कमिटीने (एफआयएसईसी) केली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने देशातील एचटीबीटी कापूस लागवडीची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमली होती. एचटीबीटी कापसामुळे पिकांच्या जैवविविधतेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतील, असे निरीक्षण या समितीने नोंदवले आहे.  `एफआयएसईसी`ने देशात लागवड झालेल्या एचटीबीटी कापूस वाणांचे नमुने गोळा करून त्यांचे परीक्षण केले. देशातील सर्व प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत एचटीबीटी कापसाचे लोण पसरले असल्यावर समितीने शिक्कामोर्तब केले आहे. सद्यस्थितीत उत्पादक, प्रक्रियादार, विक्रेता आणि शेतकरी या स्तरांवर एचटीबीटी कापूस बियाणे शोधून ते नष्ट करणे हाच व्यवहार्य उपाय असल्याचे समितीचे म्हणणे आहे. एफआयएसईसी ही उच्चस्तरीय समिती असून, के. वेलुथंबी तिचे प्रमुख आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय), जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी), केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर), पर्यावरण, वने मंत्रालय, तेलंगणा राज्य बियाणे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्राधिकरण (टीएसएसओसीए) आदी डझनभर संस्थांचे प्रतिनिधी या समितीवर आहेत. एचटीबीटी कापूस वाणातील तणनाशक प्रतिरोधक जनुकांचा परागीकरणामुळे इतर वनस्पतींमध्ये प्रसार होऊन कापूस व इतर पिकांच्या जैवविविधतेला धोका पोहोचेल; तसेच ग्लायफोसेटच्या अतिरिक्त वापरामुळे सुपर वीडचा (नियंत्रणाला अवघड असे शक्तिशाली तण) उदय होईल, याविषयी समितीने तीव्र काळजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एचटीबीटी वाणाच्या लागवडीमुळे भविष्यात सर्वच पिकांची वाढ आणि उत्पादन घटण्याचा धोका आहे, तसेच उत्पादनखर्चात वाढ होईल आणि मानवी व पशू आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. तेलंगणा सरकारने अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांचा छडा लावण्यासाठी बियाणे उत्पादक, डीलर्स व किरकोळ विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले असून त्याचबरोबर ग्लायफोसेटचा वापर रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसारित केल्या आहेत.

  •  एचटीबीटी कापूस वाणातील तणनाशक प्रतिरोधक जनुकांमुळे कापूस व इतर पिकांच्या जैवविविधतेला धोका पोचण्याची भीती.
  •  ग्लायफोसेटच्या अतिरिक्त वापरामुळे सुपर वीडचा (नियंत्रणाला अवघड असे शक्तिशाली तण) उदय होण्याचा तज्ज्ञांचा इशारा.
  •  एचटीबीटी वाणाच्या लागवडीमुळे भविष्यात सर्वच पिकांची वाढ आणि उत्पादन घटण्याचा धोका. उत्पादनखर्चात वाढ होण्याचा अंदाज.
  •  मानवी व पशू आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता.
  • (एचटीबीटी कापूस वाणातील) तणनाशक प्रतिबंधक जनुक जैवविविधता व्यवस्थेमध्ये परागकणांच्या माध्यमातून पसरू शकतो. त्यामुळे साध्या तणांचे रूपांतर मोठ्या प्रमाणात `सुपर वीड`मध्ये होऊ शकते. - के. केशवुलू, संचालक,  तेलंगणा राज्य बियाणे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्राधिकरण (टीएसएसओसीए)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com