पाण्याचे महत्त्व न ओळखल्यास भारताचा सीरिया : डॉ. राजेंद्रसिंह

पाण्याचे महत्त्व न ओळखल्यास भारताचा सीरिया : डॉ. राजेंद्रसिंह
पाण्याचे महत्त्व न ओळखल्यास भारताचा सीरिया : डॉ. राजेंद्रसिंह

नाशिक - कधी काळी सीरिया कृषी क्षेत्रात अग्रणी होता. सीरियात येणारे पाणी हेतुपूर्वक वळविल्याने शेतीव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली. आज पाणीप्रश्‍नामधून या देशात अंतर्गत लढाई सुरू झाली आहे. भारतातही विकासाच्या नावावर पर्यावरण, निसर्ग व पाण्याचा ऱ्हास सुरू आहे. शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करताना पाण्याचे महत्त्व ओळखले नाही, तर भारताचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कारविजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी येथे केले. कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालयातील बायोटेक विभागातर्फे आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत ते मंगळवारी (ता.९) ‘शाश्‍वत विकासासाठी बायोटेक्‍नॉलॉजी’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी मुंबईतील भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर येथील डॉ. एस. पी. काळे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या रूपल सिंग, एस. आर. खंडेलवाल, बायोटेक्‍नॉलॉजी विभागप्रमुख प्रा. जे. डी. म्हस्के आदी उपस्थित होते. डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की ग्लोबल वॉर्मिंगसारख्या जागतिक समस्येच्या स्थानिक पातळीवरील उपाययोजनांचा विचार केला जाऊ शकतो.

बायोटेक्‍नॉलॉजी हेदेखील माध्यम उपयुक्‍त ठरू शकते. पाण्यावर मनुष्याचे अस्तित्व अवलंबून असेल, तर त्याचे गांभीर्य ओळखणेदेखील महत्त्वाचे ठरेल. बायोटेक्‍नॉलॉजी असो किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रावर प्रेम असेल, तरच त्या क्षेत्रात आपण योगदान देऊ शकू. डॉ. गोसावी यांनीही मार्गदर्शन केले. औपचारिक उद्‌घाटनानंतर डॉ. सिंह व डॉ. काळे यांच्या सत्रासोबतच दुपारच्या सत्रात औरंगाबाद येथील बीएएमयू येथील डॉ. जी. डी. खेडकर, तसेच एचपीटी-आरवायके महाविद्यालयातील डॉ. ए. व्ही. बोऱ्हाडे यांचेही व्याख्यान झाले.

कचरा ही संकल्पना करा नष्ट - डॉ. काळे कुठलीही शक्‍ती ही वाईट नसते. त्याप्रमाणेच अणुऊर्जादेखील वाईट नाही. या ऊर्जेचा वापर कसा केला जातो यावर होणारे परिणाम अवलंबून असल्याचे मत डॉ. एस. पी. काळे यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की घरातील कचरासंकलनाची जबाबदारी आपण महापालिकांवर टाकतो. घरच्या घरी कचऱ्याचे विघटन करताना कचरा ही संकल्पना कालबाह्य ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले.

संशोधन पेटंटसाठी करा प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या हानीची माहिती देताना डॉ. काळे यांनी वृक्षारोपणाची प्रतिज्ञा सहभागींकडून घेतली. शेतकरी, वैज्ञानिक व शिक्षक हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. उज्ज्वल भवितव्यासाठी युवा पिढीने या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ शोधनिबंध सादरीकरणापुरते मर्यादित न राहता संशोधन, पेटंटमध्ये आघाडी घेण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com