agriculture news in marathi, If you do not get the loan waiver, do not pay the government's due: Pawar | Agrowon

कर्जमाफी मिळत नसेल, तर सरकारी देणी भरू नका : पवार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

देशभरात सध्या वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न आवासून उभे आहेत. तरी देशाला वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न होत आहे. संशयाचे वातावरण तयार केले जात असून, याविरोधात आता संसदेतही हल्लाबोल केला जाईल.
-शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला हल्लाबोल करून जागे करण्यासाठी मोर्चा काढला. तरीही सरकार जागे होत नसेल, तर लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना उलथवून टाकायचा निश्चय केला पाहिजे. राज्य सरकार तुमच्या खात्यात कर्जमाफीची संपूर्ण रक्कम भरण्याचा विश्वास देत नसेल, तर यापुढे वीजबिल, सोसायट्यांची देणी आणि इतर कोणतीही सरकारी देणी भरायची नाहीत. आपल्या न्याय हक्कासाठी सरकारशी असहकार करा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. १२) केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाइं (कवाडे) आदी विरोधी पक्षांनी संयुक्तपणे काढलेल्या जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या सांगतेवेळी ते बोलत होते. काँग्रेस ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमीजवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेजहून पुढे निघाले. दोन्ही पक्षांचे मोर्चे लोकमत चौकात आले आणि तेथून एकत्रितपणे पुढे निघाले. त्यानंतर मॉरिस कॉलेज चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केले.

‘पंतप्रधानांनी देशाची परंपरा उद्‍ध्वस्त केली’
शरद पवार म्हणाले, की जनआक्रोश म्हणजे काय असतो याची प्रचिती या आंदोलनातून येते. राज्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला हल्लाबोल करून जागे करण्यासाठी हा मोर्चा सुरू केला. तरीही सरकार जागे होत नसेल तर लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना उलथवून टाकायचे. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, रोजगाराचे प्रश्न सोडवायचे नाहीत, सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचा उल्लेख करायचा हे देशाच्या हिताचे नाही, शरम वाटली पाहिजे, अशा कडवट शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देशाच्या परंपरेला उद्‍ध्वस्त करण्याचे काम पंतप्रधान करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

राज्यातील कर्जमाफीबद्दल बोलताना पवार म्हणाले, भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली तरी अजून कर्जमाफीचा पत्ता नाही. सगळ्याबाजूने संकटे वाढत असताना सरकारकडून मदत केली जात नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरीसुद्धा यांच्या अंतःकरणाला पाझर फुटत नाही, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री म्हणताहेत आम्ही कर्जमाफी देणार आहोत, गेल्या सहा महिन्यांपासून पैसे देतो म्हणून सांगत आहेत. आता या हल्लाबोल मोर्चामधून सर्वांनी एक निश्चय करूया, राज्य सरकार तुमच्या खात्यात सर्व प्रकारची रक्कम भरण्याचा विश्वास देत नसेल, तर यापुढे वीज, पाणी बिल, सोसायट्यांची कोणतीही देणी, इतर सरकारी देणी भरायची नाहीत. सरकारशी असहकार करा, असा निर्णय करूया. आता ती जबाबदारी राज्यकर्त्यांनी घ्यावी. पोरा-बाळांचे आयुष्य उद्‍ध्वस्त केले. शेतीमालाला किंमत दिली नाही आणि दुसरीकडे सक्तीने वसुली केली जाते. गावा-गावात जाऊन ही वस्तुस्थिती लोकांना कळू द्या, आता या सरकारचे कोणतेही देणे भरायचे नाही, अशी ठाम भूमिका घ्या.

मुख्यमंत्री म्हणतात, तुमच्या काळात काय केले ते सांगा. पंतप्रधान मनमोहनसिंग, माझ्या कृषिमंत्रिपदाच्या काळात विक्रमी शेतीमाल उत्पादन करून देशाच्या भुकेचा प्रश्न सोडवला. ही ताकद आमच्या सरकारमध्ये, विचारात होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
गुलाम नबी आझाद म्हणाले, सत्तेत येण्याची आम्हाला घाई नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही घाई केली होती. लोकांमध्ये फसवल्याची भावना झाल्यामुळेच जनआक्रोश निर्माण होतो, हे आज दिसून येत आहे. देशातला शेतकरी सर्वांसाठी धान्य पिकवतो. शेतकऱ्यांनी धान्य पिकवणे बंद केले तर देश उपाशी राहील. याच शेतकऱ्यांचा पंतप्रधान मोदी यांनी विश्वासघात केला. लोकसभेच्या निवडणुकीआधी मोदी यांनी देशात शेतीमालाला उत्पन्न खर्चावर आधारित पन्नास टक्के हमीभाव देण्याची घोषणा केली होती; मात्र निवडणुकीनंतर मोदी यांना या घोषणेचा विसर पडला आहे. हा देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. भाजपकडून फक्त सत्तेत येण्यासाठीच आश्वासने आणि घोषणा केल्या जातात. हा भाजपचा चुनावी जुमला आहे, शेतकऱ्यांशी खोटे वायदे करणाऱ्यांना माफी नाही, अशी कडवट टीकाही त्यांनी केली. आता हा हल्लाबोल संसदेत केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

मोहन प्रकाश म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्‍ध्वस्त झाली. यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसे मरतात, यावरून त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांमध्ये असेच ऐक्य राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, प्राचार्य जोगेंद्र कवाडे, खासदार सुप्रिया सुळे, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

देशात, राज्यात खोटारडे सरकार
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, देश आणि राज्यातील शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिक आज त्रासले आहेत. हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकलेले नाही. खोटे बोल, रेटून बोल असे सरकारचे काम आहे. देशात आणि राज्यातही खोटारडे सरकार आहे. त्यामुळे जनसामान्यांमधील आक्रोश बुलंद करण्यासाठीच हा मोर्चा काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात आणि राज्यातील भाजप सरकारचे मोदी आणि फडणवीस हे दोघेच लाभार्थी असल्याची टीकाही त्यांनी केली. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी उपहासात्मक टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

शेतकऱ्यांची लूट सुरू आहे : विखे
गेल्या तीन वर्षांत या सरकारने केवळ वारेमाप घोषणा केल्या आणि त्या घोषणांची जाहिरातबाजी केली. ‘होय, मी लाभार्थी, हे माझं सरकार’च्या फसव्या जाहिराती केल्या. कर्जमाफी योजनेला शिवछत्रपतींचे नाव देऊन राज्याच्या आराध्य देवतेच्या नावाआड आपले अपयश झाकण्याचा उद्योग सरकारने केला आहे. आज सोयाबीनचा प्रश्न ऐरणीवर आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्याला लुटले जाते आहे. बोंड अळीने कापसाचे ७५ टक्के क्षेत्र उद्‍ध्वस्त झाले आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...