कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान विभागाचे प्रतिनिधी

कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान विभागाचे प्रतिनिधी
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान विभागाचे प्रतिनिधी

पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान अंदाजाचा संदेश (एसएमएस) त्यांच्या भाषेतून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) हाती घेतला आहे. येत्या जूनपासून याची देशात सुरवात होणार आहे, याकरिता देशातील प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात हवामान विभागाचे दोन प्रतिनिधी असतील,’’ अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी गुरुवारी येथे दिली. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्याशी समन्वय करार करण्यात आला आहे. त्यांचे देशातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहेत. या केंद्राच्या आवारात आता ‘आयएमडी’चे कार्यालय सुरू करणार आहे. त्यासाठी केंद्रातर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल. तेथे ‘आयएमडी’चे दोन हवामान तज्ज्ञ आणि एक सहाय्यक यांची नियुक्ती करणार आहे. या अधिकाऱ्यांचे वेतन ‘आयएमडी’तर्फे दिले जाणार आहे.’’ ‘‘आयएमडी’चे अधिकारी जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहातील. हवामान खात्याचा अंदाज कृषी विज्ञान केंद्रापर्यंत पोचविला जाईल. त्यांच्या माध्यमातून हवामान अंदाज जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ते म्हणाले, ‘‘केंद्रीय कृषी खात्याच्या कृषी पोर्टलतर्फे सध्या शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचे ‘एसएमएस’ पाठविले जात आहेत. पण, त्याला मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सध्याच्या यंत्रणेतून ‘एसएमएस’ पाठविता येत नाहीत. त्यामुळे ‘आयएमडी’ आता स्वतःची ‘एसएमएस’ सुविधा विकसित करत आहे. त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांची मदत घेण्यात आली आहे. त्याला आता राज्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. येत्या जूनपासून ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. देशातील सुमारे चाळीस कोटी म्हणजे देशभरातील निम्म्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत ‘एसएमएस’द्वारे हवामान संदेश आता मिळणार आहे.’’  आपत्ती धडकण्यापूर्वीच घेणार ‘ॲक्‍शन’ ‘‘फक्त अंदाज वर्तविणे इतकी मर्यादित भूमिका आता भारतीय हवामान खात्याची (आयएमडी) नक्कीच राहिलेली नाही. तर, या वातावरणातील बदलाचा त्या भागातील लोकांवर नेमका काय परिणाम होणार आहे हे तर आता सांगितले पाहिजेच. पण, त्या पुढे जाऊन त्यापासून काळजी घेण्यासाठी लोकांनी काय करावे, हे देखील ‘आयएमडी’ सुचविणार आहे,’’ अशी माहिती पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी गुरुवारी (ता.१९) येथे स्पष्ट केले. ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम’चे (सॅसकॉफ) उद्‌घाटन डॉ. राजीवन यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘सॅसकॉफ १२’मध्ये ही दोन दिवसीय परिषद ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था’मध्ये (आयआयटीएम) आयोजित केली आहे. त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश, ‘आयआयटीएम''चे संचालक प्रा. रवी नंजुंदैय्या, हवामान संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. सहाय, ‘सार्क’च्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे संचालक पी. के. तनेजा, डॉ. डी. एस. पै या वेळी उपस्थित होते. या परिषदेत बांगलादेश, भूतान, मालदिव, मॅनमार आणि श्रीलंका येथील हवामान तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. ‘हवामान खाते आता फक्त ‘फोरकास्ट’ करणार नाही, तर ‘ॲक्‍शनेबल फोरकास्ट’ करणार आहे. याची सुरवात पुढील वर्षापासून होईल. त्यासाठी इंग्लंडच्या हवामान खात्याशी नुकताच समन्वय करार करण्यात आला आहे,’ असेही आहे. ‘ॲक्‍शनेबल फोरकास्ट’ म्हणजे काय? ‘‘हवामान अंदाज वर्तविण्याबरोबरच त्याचा नागरिकांवर काय परिणाम होणार याचाही अंदाज वर्तविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा वेध घेणे आवश्‍यक आहे,’’ असे त्यांनी सांगितले. हे अधिक स्पष्ट करताना राजीवन यांनी चक्रीवादळाचे उदाहरण दिले. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाचा वेग आम्ही सांगतो, ते कुठे आणि कधी धडकणार याचीही अचूक माहिती सहजतेने मिळते. पण, यापुढे जाऊन चक्रीवादळामुळे झोपड्या, पत्र्याची घरे यांचे किती नुकसान होईल, कोणती झाडे उनमळून, विजेचे खांब पडतील का, याची माहिती लोकांना देण्याची व्यवस्था ‘ॲक्‍शनेबल फोरकास्ट’मधून केली जात आहे.  डॉ. राजीवन म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे हवामान खाते वाऱ्याची दिशा आणि वेग सांगत आहे. पण, त्याचा परिणाम माझ्यावर काय होणार, हा प्रश्‍न आता लोकांच्या अधिक जिव्हाळ्याचा आहे. त्याचे हवामान खाते उत्तर देणार आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेत शाळा बंद कराण्याची सूचना हवामान खाते करेल. हा आदेश नसल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी सक्ती केली जाणार नाही. यात दिलेली सूचना लोकांनी पाळणे अपेक्षित आहे.’’

माहिती मिळणार मोफत ‘‘हवामान खात्यात गेल्या शंभर वर्षांची माहिती आहे. पडलेला पाऊस, दुष्काळ, तापमान, चक्रीवादळ अशी माहिती मिळविण्यासाठी खात्याकडे अर्ज करावा लागत असे. आता ही माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. संशोधक, विद्यार्थी आणि विद्यापीठ यांना याचा फायदा होईल,’’ असेही त्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com