तापमानातील फरकाचा भाज्या, फळबागांना फटका

तापमानातील फरकामुळे भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मातीच्या तापमानातील फरकामुळे पिकांच्या मुळांकडून अन्नघटक शोषणाची क्रिया मंदावते. त्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होईल. - डाॅ. एस. एम. घावडे , भाजीपाला तज्ज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
तापमानातील तफावतीमुळे केळी झाडाच्या वाढीवर परिणाम होत आहे.
तापमानातील तफावतीमुळे केळी झाडाच्या वाढीवर परिणाम होत आहे.

पुणे : राज्याच्या विविध भागांत दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये १० ते २० अंश सेल्सिअसची तफावत दिसून येत आहे. पहाटे गारठा आणि दुपारी कडक उन्हाचा चटका, यामुळे फळझाडे आणि भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. पिकांमध्ये विविध कीड- रोगांच्या वाढीसाठी परस्पर विरोधी हवामान कारणीभूत ठरत आहे. त्याचा अनिष्ठ परिणाम उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादकतेवर होत आहे.   राज्यात हवामानात वेगाने बदल होत असून, मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे दिवसाच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान २५ ते २७ अंशांपर्यंत खाली घसरले होते. अवकाळीचे ढग दूर होताच दिवसाचे तापमान वेगाने वाढले आणि पारा पुन्हा ३५ अंशांच्या वर सकरला. गेल्या दोन दिवांसपासून रात्रीचे तापमान १२ ते १४ अंशांपर्यंत घसरून तापमानात मोठी घट दिसून आली. पहाटे गारठा तर दुपारी कडक ऊन असे परस्पर विराेधी हवामानाचा पिकांवर परिणाम होत आहे.   हवामान तज्ज्ञ डाॅ रामचंद्र साबळे म्हणाले, की तापमानातील तफावतीबरोबरच रात्रीच्या तापमानात वाढ किवा घट होण्याचा पिकांवर सर्वाधिक परिणाम होतो. पिकाजवळचे हवामान बदलले किंवा तफावत वाढली तर खरबूज, टरबूज, पपई, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, आंबा या परिपक्वतेच्या अवस्थेतील पिकांमधील गोडीवर परिणाम होतो. तर रात्रीचे तापमान आणि दिवसाच्या तापमानातील तफावतीमुळे उसाला तुरा येणे, दशी पडण्यास सुरवात होऊन उत्पादन कमी होते. भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याबरोबरच कीड-रोगांवर वाढीवर निश्‍चित परिमाण होतो.  औरंगाबाद येथील फळबाग संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉ. संजय पाटील म्हणाले, की सध्या दिवसाचे वाढते तापमान आणि रात्री थंड तापमान होत आहे. या दोन्ही तापमानात सहा अंशांचा फरक जास्त दिवस राहिला तर फळगळ होण्याची शक्यता वाढते. जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञ नाझेमोद्दिन शेख म्हणाले, की तापमानात दिवसा होणारी वाढ व रात्री होणाऱ्या घटीमुळे केळीची पाने थोडी करपतात. मुळांकडून अन्नद्रव्यांच्या शोषणावर विपरित परिणाम होतो. परिणामी निसवणीच्या अवस्थेत असलेले घड अडकण्याचा धोका आहे. निसवण झालेल्या घडातील केळींची वाढ मंदावण्याची शक्यता असते. परिणामी केळीचे वजन भरणार नाही. तापमान तफावतीचे परिणाम

  •  उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादकतेवर परिणाम
  •  खरबूज, टरबूज, पपई, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, आंब्याच्या गोडीवर परिणाम
  •  उसाला तुरा येणे, दशी पडण्याची शक्यता
  •  भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम
  •  पिकांवर कीड-रोग वाढीस पूरक
  •  फळगळ होण्याचा धोका
  •  केळीची पाने करपण्याची शक्यता, घड निसवणीच्या अवस्थेत अडकण्याचा धोका  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com