दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... 

 दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी हरितगृहात योग्य तापमान आणि आर्द्रता ठेवावी.
दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी हरितगृहात योग्य तापमान आणि आर्द्रता ठेवावी.

परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी वाढू लागली आहे. फुलांच्या उत्पादनाबरोबरच गुणवत्तेसही महत्त्व आहे. पिकांचे गुणवत्तापूर्ण व जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी हरितगृहाचा वापर फायदेशीर आहे. नियंत्रित वातावरणातील शेती पारंपरिक शेतीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.  हरितगृहात मुख्यत्वे गुलाब, जरबेरा आणि कार्नेशन या फुलपिकांची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार पारंपरिक पद्धतीपेक्षा हरितगृहातील लागवडीपासून पिकांचे ३४ ते ९७ टक्के इतके अधिक उत्पादन मिळते; तसेच उत्पादित मालाची गुणवत्तासुद्धा लक्षणीयरीत्या वाढते, असे सिद्ध झाले आहे. हरितगृहाप्रमाणेच शेडनेटगृहाचाही नियंत्रित वातावरणातील पीक उत्पादनासाठी होतो.  हरितगृह  वनस्पतींच्या वाढीसाठी तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता व कार्बन डाय ऑक्‍साईड यांचे योग्य प्रमाण आवश्‍यक असते. या सर्व घटकांचे ज्याठिकाणी कृत्रिमरीत्या नियंत्रण केले जाते.

हरितगृहासाठी वापरले जाणारे आवरण :  हरितगृहासाठी पॉलिइथिलिन, पॉलिव्हिनील क्‍लोराइड (पीव्हीसी), फायबर, ग्लास, अॅक्रेलिक, पॉलिकार्बोनेट इत्यादींचा वापर केला जातो.  पॉलिइथिलिन फिल्मची किंमत कमी असल्यामुळे सर्व साधारणपणे त्याचा सर्वाधिक वापर केला जातो. ही फिल्म अतिनील किरण प्रतिबंधक  असून, तिची जाडी २००० मायक्रॉन इतकी असते. तिचे आयुष्यमान ३ ते ४ वर्षे इतके असते.

प्रकार :  हरितगृहातील वातावरण नियंत्रण आणि उभारणी यानुसार हरितगृहाचे तीन प्रकार पडतात. १)  नैसर्गिक वायूविजन असलेले कमी खर्चाचे हरितगृह : या हरितगृहाचा सांगाडा लाकडी खांब किंवा बांबूपासून करता येतो. त्यामुळे खर्च तुलनेने कमी येतो; मात्र हरितगृहाचे आयुष्यमानही कमी असते. या प्रकारच्या जास्त आयुष्यमान असलेल्या हरितगृहाच्या सांगाड्यासाठी जीआय पाइपचा वापर केला जातो. मात्र, त्यांचा तुलनात्मक खर्च जास्त येतो. या हरितगृहामध्ये नैसर्गिक वायुविजन होते. त्यासाठी छत व बाजूच्या झडपा उघड्या ठेवाव्या लागतात. 

२) अर्धनियंत्रित वातावरण असलेले मध्यम खर्चाचे हरितगृह :  या प्रकारच्या हरितगृहामध्ये मुख्यत्वे जीआय पाइपचा वापर केला जातो. यातील वातावरण नियंत्रण करण्यासाठी एक्‍झॉस्ट फॅन व कूलिंग पॅडचा वापर केला जातो. अशा हरितगृहाची देखभाल जास्त करावी लागते.

३) संपूर्ण नियंत्रित हरितगृह :  हे हरितगृह अर्धनियंत्रित हरितगृहाप्रमाणेच असते. परंतु यामध्ये आतील वातावरण पूर्णपणे नियंत्रित केलेले असते. 

हरितगृहातील उत्पादनासाठी महत्त्वाच्या बाबी : 

  • हरितगृहातील सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी शेडिंग नेटचा वापर करावा. 
  • हरितगृहात परिणामकारक आर्द्रता मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारच्या फॉगिंग पद्धतीचा अवलंब करावा. 
  • पिकाला पाणी देण्यासाठी कार्यक्षम अशा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. हरितगृहातील फूलशेतीला दररोज विद्राव्य खतांची मात्रा द्यावी लागते. ठिबक सिंचन संचामुळे हे शक्य होते.
  • शेडनेटगृह उन्हाची तीव्रता जास्त असते अशा वेळेस पिकांना आवश्‍यकतेपेक्षा जास्त तापमानात तग धरणे कठीण होते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धताही कमी असते. पाण्याची टंचाई व तापमानात मोठी वाढ अशा विपरीत वातावरणात पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतात. उत्पादनात लक्षणीय घट होते. अशा परिस्थितीत पिकांना शेडनेटच्या साहाय्याने सावली केली, तर पिकांना सुसह्य अशा वातावरणाची उपलब्धता होते. तसेच, पिकांची पाण्याची गरजसुद्धा कमी होते; त्यामुळे पीक लागवड यशस्वी होते. शेडनेटगृह हे जीआय पाइप, लोखंडी अॅंगल्स, लाकूड किंवा बांबू यापासून बनविलेल्या सांगाड्याचे घर असते. सावलीसाठी या  सांगाड्यावर  विशिष्ट यु. व्ही. संस्कारित अशा १०० टक्के पॉलिइथिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या जाळ्यांचा (शेडनेट) वापर केलेला असतो. शेडनेटच्या साहाय्याने दिवसा पिकांसाठी प्रकाशाची तीव्रता व प्रभावी उष्णता कमी करता येते. त्यामुळे बऱ्याच अंशी वातावरणावर नियंत्रण मिळविता येते. हरितगृहाप्रमाणे शेडनेटगृहाचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व काही फूलपिकांच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी केला जातो. शेडनेटगृहात पावसाळा सोडून इतर हंगामात पिके घेता येतात.

    शेडनेटगृहात उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी : शेडनेटगृहात उत्पादनासाठी लाल रंगाची, लॅटेराइट प्रकारची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा. मातीची विद्युत वाहकता (इ.सी.) एकपेक्षा कमी असावी. मातीतील क्षारांचे प्रमाण अर्ध्या टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. लाल माती, शेणखत, वाळू, भाताचे तूस हे (३ः३ः३ः१ प्रमाणात) एकत्र करून त्यापासून लागवडीचे माध्यम तयार करावे.

    शेडनेटगृहात लागवडीयोग्य पिके :  शेडनेटगृहात उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फूलपिके, तसेच बिगरहंगामी पिकांचे उत्पादन घेता येते. मुख्यतः गुलाब, कार्नेशन, जरबेरा, शेवंती, ऑर्किड, लिलियम आदी फूलझाडे व अॅन्थुरियमसारख्या शोभिवंत झाडांची लागवड केली जाते.  संपकर् : राजेंद्र हसुरे, ९४२१९८३४०३   (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com