लातूर विभागातील गोदामांमध्ये तूर साठविण्यासाठी जागा अपुरी

तूर साठवण
तूर साठवण
परभणी ः राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांतील १४१ गोदामांमध्ये गतवर्षीची लाखो क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत या गोदामांची साठवणक्षमता ८५ हजार ५०० क्विंटल एवढी शिल्लक राहिली आहे. गतवर्षीची तूर अन्यत्र हलविल्याशिवाय यंदा खरेदी केलेली तूर साठविता येणे शक्य नाही.
 
गतवर्षीच्या तुलनेत महिनाभराचा कालवधी उलटून गेला, तरी अद्याप एकही शासकीय खरेदी केंद्र कार्यान्वित झालेले नाही. तूर्त नोंदणीच्या कामावर भर दिला जात आहे. गावागावांमध्ये जाऊन तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंदणी करून घेतली जाणार आहे.
 
राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागाअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४४ गोदामे असून, त्यांची साठवणक्षमता ६९ हजार १३० मेट्रिक टन आहे. हिंगोली जिल्ह्यात २० गोदामे असून, त्यांची साठवणक्षमता २९ हजार ४०० मेट्रिक टन आहे.
 
नांदेड जिल्ह्यात ३२ गोदामे असून, त्यांची साठवणक्षमता ५० हजार २१६ मेट्रिक टन आहे. लातूर जिल्ह्यात ३९ गोदामे असून, त्यांची साठवणक्षमता ८८ हजार ५२० मेट्रिक टन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८ गोदामे असून, त्यांची साठवणक्षमता १३ हजार मेट्रिक टन आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १४१ गोदामे असून, त्यांची एकूण साठवणक्षमता २ लाख ५० हजार १९६ मेट्रिक टन (२५ लाख क्विंटल १९६० क्विंटल) आहे.
 
या गोदामामध्ये गतवर्षी हमीभावाने खरेदी केलेली तूर, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गहू, तांदूळ, तसेच आधारभूत किमतीने यंदा खरेदी केलेले सोयाबीन, मूग, उडीद आदी माल साठविलेला आहे. या गोदामामध्ये साठवण केलेल्या मालापैकी ७५ ते ८० टक्के तूर आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत १४१ गोदामांमध्ये केवळ ८५ हजार ५०० क्विंटल शेतीमाल (तूर) साठविण्याची क्षमता शिल्लक राहिली आहे.
 
यामध्ये परभणी जिल्ह्यात १० हजार क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ९ हजार ९०० क्विंटल, नांदेड जिल्ह्यात देगलूर येथील गोदामात ६०० क्विंटल, लोहा येथील गोदामात ७०० क्विंटल, तसेच किनवट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गोदामात यंदापासून २७ हजार ८०० क्विंटल तीनही ठिकाणीचे मिळून एकूण २९ हजार १०० क्विंटल, लातूर जिल्ह्यात ३६ हजार क्विंटल आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५०० क्विंटल साठवण करण्याची क्षमता राहिली आहे.
 
ही तूर अन्यत्र हलविल्याशिवाय त्या ठिकाणी नव्याने खरेदी केलेली तूर साठविता येणार नाही. नाफेड तसेच संबंधित यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर जोपर्यंत वखार महामंडाळाच्या गोदामात साठविली जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना चुकारे मिळत नाहीत. गतवर्षीची तूर इतरत्र हलविण्याची वखार महामंडळाने मागणी केली आहे.
 
या जिल्ह्यांमध्ये खासगी गोदामांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे गोदामामध्ये पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होईपर्यंत तूर खरेदी सुरू करता येणार नाही, असे वखार महामंडाळच्या सूत्रांनी सांगितले. गतवर्षी डिसेंबरमध्येच शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झाली होती. यंदा तूर विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
 
खरेदी विक्री संघ, बाजार समित्यांमध्ये नोंदणी केली जात आहे. परंतु नोंदणीच्या कामात गती येण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या तुरीच्या पीक पेऱ्याची नोंदणी करून घेतली जाणार आहे, असे जिल्हा विपणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com