सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ

सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ
सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने १९ कोटी १५ लाख ८५ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा जिल्ह्यातील प्रश्न गंभीर बनत आहे. यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यामध्ये नऊ टँकरची भर पडली आहे. सध्या पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया गेली आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७५ गावे, ७३४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला ६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जत तालुक्यातील ३४ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरने, आटपाडीतील २२ गावांमधील १७२ वाड्या-वस्त्यांना १८ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना सहा टँकरने, तासगावमधील तीन गावे आणि १३ वाड्या-वस्त्यांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील १० आणि ४७ वाड्या-वस्त्यांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मार्चअखेर १६९ टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे. परंतु ते जादा दराने खरेदी करून जनावरांना जगविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

पाण्यासाठी आंदोलने सुरूच सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये टँकरची मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दुष्काळग्रस्तांना सतावत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com