परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे नुकसान

परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे नुकसान
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे नुकसान

परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध खरेदीअंतर्गत चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून शासकीय दूध दरात प्रतिलिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. पशुखाद्य तसेच वाहतूक खर्चात वाढ झालेली असतांना दर कपातीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दर कपात मागे घेणे गरजेचे आहे.

शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात गतवर्षीपेक्षा दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सध्या येथे दररोज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील मिळून ४५ हजार लिटर दूध संकलन होत आहे. परभणी येथील दुग्ध शाळेतील दूध संकलन क्षमता कमी असल्यामुळे नांदेड येथील दूध उदगीर येथे पाठविले जात आहे.

आजवरच्या प्रत्येक दुष्काळी वर्षामध्ये शेतीमालाच्या उत्पादनात घट आल्यामुळे शेतकरी शेतीपूरक दूध व्यवसायाकडे वळलेले आहेत. परंतु चांगला पाऊस झालेल्या वर्षी जनावरे विकून टाकल्यामुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. परंतु गेल्या वर्षी तसेच यंदाही दुष्काळी परिस्थितीमुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांसाठी पत संस्था, बॅंका पतपुरवठा करत असल्यामुळे दूध उत्पादनात वाढ होत आहे. परभणी जिल्ह्यात दूध संघ नाहीत.

त्यामुळे  शेतकऱ्यांना शासकीय दूध योजनेअंतर्गत दुग्धशाळेवर अवलंबून राहावे लागते. दोन्ही जिल्ह्यांत दीडशेहून अधिक दूध उत्पादक सहकारी संस्था आहेत. दूध उत्पादकांची संख्या वाढत असल्यामुळे संस्थाची संख्यादेखील वाढत आहे. परंतु नवीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. बिगर सभासद शेतकऱ्यांचे दूध घेण्यासदेखील मनाई केली जात आहे.

या सर्व बाबींमुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी तसेच संस्था यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दूध उत्पादन वाढत असल्यामुळे शासकीय दुग्धशाळेचे बळकटीकरण करुन क्षमता वाढविण्याची गरज आहे.

बिलासाठी करावी लागते महिनाभर प्रतीक्षा काही महिन्यांपूर्वी दूधास प्रतिलिटर २७ रुपये दर होता. परंतु त्यामध्ये २ रुपयाने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुखाद्य तसेच वाहतुकीचे दर वाढल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे दर कपातीमुळे आणखीन नुकसान होत आहे. दूध उत्पादक संस्थांच्या कमिशनमध्ये ८० पैसे तर गुणप्रतीसाठी १० पैसे कपात केली जात आहे. दूध उत्पादकांचे पेमेंट अकराव्या दिवशी मिळत असे. परंतु त्यासाठी आता महिनाभर थांबावे लागत आहे.

दुष्काळी परिस्थिीमुळे दूध दर तसेच संस्थांच्या कमिशनमधील कपात तत्काळ रद्द करावी. गुणप्रतीच्या नावाखाली संस्थांची अडवणूक करू नये. शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट अदा करण्यात यावे. - विठ्ठल गिराम, अध्यक्ष, दूध उत्पादक संस्था, पाथरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com