पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेना

पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेना
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेना

अकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या अनुषंगाने प्रशासन वारंवार कडक भूमिका घेत असतानाही वाटपाची टक्केवारी तितक्याशा वेगाने वाढत नसल्याची बाब समोर आली आहे. एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात झालेली असून, आता जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, आजवर बँकांनी एक लाख ४० हजार ५११ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ २१ हजार ५७२ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले. ही रक्कम अवघी १९१ कोटी एवढी आहे. अधून-मधून पाऊस येत असून, पेरण्यांची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मात्र, अनेकांना पीककर्ज न मिळाल्याने पैशांची अडचण तयार झालेली आहे.

खरिपासाठी जिल्ह्यात १३३४ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. कर्जमाफीची प्रक्रिया एकीकडे राबवली जात असून, दुसरीकडे बँका पीककर्ज वाटप करीत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी पात्र असून, त्यांना प्राधान्यक्रमाने पीककर्ज देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

पीककर्ज वाटपाची गती वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने बँकांविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलले. जिल्ह्यात अॅक्सिस व कॅनरा बँकांतील शासकीय खाती बंद करण्याचे धाडसी पाऊल उचलण्यात आले. एकीकडे अशाप्रकारचे कडक धोरण अवलंबिले जात असताना बँक प्रशासन मात्र नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांना एकेका कागदासाठी वारंवार चकरा मारायला लावीत आहे.  कुठल्याही शेतकऱ्याचे काम सहजपद्धतीने होताना दिसत नाही. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता.१८) २१ हजार ५७२ शेतकऱ्यांना १९१ कोटींचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे.

या आठवड्यात आजवर दोन वेळा जिल्ह्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी पेरणी करण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी बियाणे, खते खरेदीकरिता शेतकऱ्यांना पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. हजारो शेतकरी पीककर्ज मिळण्यापासून लांबच असल्याने काहींनी दागदागिने गहाण ठेवत तर काहींनी सावकारांकडून पैशांची तजवीज करीत हंगाम साधण्याची धडपड सुरू केली आहे. बँकांना पीककर्ज वाटपाचा मोठा पल्ला गाठायचा असून, पेरणीसाठी किती व कधी पीककर्ज मिळते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

पीक कर्जवाटपाची वस्तुस्थिती

कर्ज उद्दिष्ट  १३३४ कोटी
१८ जूनपर्यंत वाटप  १९१ कोटी
वाटपाची टक्केवारी  १४ टक्के
कर्ज मिळालेले शेतकरी २१५७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com