कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाट

कापसाची उत्पादकता देशात ४८० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपुढे नसणार, असे चित्र आहे. अनेक वर्षांत उत्पादन ३१० लाख गाठींवर येणार आहे. ही बाब देशांतर्गत कापूस प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांसाठीदेखील चिंताजनक आहे. गुजरातमधील भावनगर, सुरेंद्रनगर, राजकोट या सौराष्ट्रमधील भागालादेखील मोठा फटका दुष्काळाने बसला आहे. - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
कापूस उत्पादकता
कापूस उत्पादकता

जळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताची या हंगामातील कापूस उत्पादकता ४८० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत राहील, असा अंदाज आहे. याच वेळी चीन, मेक्‍सिको, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांनी आपली कापूस उत्पादकता टिकवून ठेवल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.  कापूस उत्पादनात भारत या हंगामात जगात दुसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्‍यतादेखील आहे. देशात या हंगामात १२० लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. उत्पादन सुमारे ३१० ते ३२० लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७० किलो रुई) हाती येईल, अशी स्थिती आहे. उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत (२०१७-१८) सुमारे ४० ते ५० लाख गाठींनी कमी होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे.  देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये असलेल्या महाराष्ट्रात सुमारे १० लाख गाठी, गुजरातेत ३० लाख गाठी व तेलंगणा, कर्नाटक व इतरत्र मिळून सुमारे १० ते १२ लाख गाठींनी उत्पादन कमी झाले आहे. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस आला नाही. परिणामी उत्पादन व उत्पादकता घसरली आहे. मागील हंगामात उत्पादन ३६२ लाख गाठींपर्यंत होते. उत्पादनात मागील हंगामात भारत क्रमांक एक होता, या हंगामात उत्पादनात भारत चीनच्या मागे म्हणजेच क्रमांक दोनवर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भारताची कापूस उत्पादकता मागील हंगामाच्या तुलनेत ३५ ते ४० किलो रुई प्रतिहेक्‍टरी, एवढी घटणार असल्याचेही संकेत आहेत. चीनमध्ये या हंगामात सुमारे ३४० लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. तेथे ३२ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. तेथे सरळ व गुणवत्तापूर्ण वाण आणि सिंचनासंबंधी बऱ्यापैकी सुविधा असल्याने उत्पादकता, उत्पादन चांगले आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतासारखीच कमी उत्पादकता आफ्रिकेतील अंगोला, इथिओपिया, घाना केनिया, टांझानिया, झांबिया, झिंम्बावे, युगांडा या देशांचीदेखील आहे. फक्त साऊथ आफ्रिकेची उत्पादकता एक हजार किलो रुई प्रतिहेक्‍टरी आहे. तर साऊथ आफ्रिकासह या देशांची उत्पादकता मिळून २१७ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे. या देशांमध्ये २४ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. आफ्रिका खंडातील देश आणि भारत यांचा अंतर्भाव करून जगाची कापूस उत्पादकता या हंगामात ७०० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत पोचणार असल्याची स्थिती आहे. देशाची कापूस उत्पादकता ७७० किलो रुई प्रतिहेक्‍टरी, अशी राहण्याचा अंदाज कापूस हंगामाच्या सुरवातीला म्हणजेच सप्टेंबर, २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला होता. कापूस उत्पादकतेत जगात तुर्की, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, मेक्‍सिको या देशांचा डंका कायम राहिला असून, मागील दोन दशकांपासून या भागांत कापूस उत्पादकता फारशी कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाची उत्पादकता जगात सर्वाधिक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर, कमी कालावधीत येणारे कापूस वाण, कापूस वाण विकसित करण्यासंबंधीचे ठोस धोरण (सरकारचे प्रोत्साहन) आदी या देशांमधील कापूस उत्पादकता टिकवून ठेवण्याचे गमक असल्याचेदेखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात फक्त चार हजार हेक्‍टर, तुर्कीमध्ये साडेपाच हजार हेक्‍टर, तुर्कीमध्ये साडेचार हजार हेक्‍टरपर्यंत कापसाची लागवड झाली होती. मेक्‍सिकोमध्ये दोन हजार हेक्‍टर, ब्राझीलमध्ये १२ हजार हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती, अशी माहिती मिळाली. बांगलादेशात सुमारे ४५० हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. त्यांची उत्पादकता ७६५ किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत राहिली आहे.  प्रतिक्रिया ब्राझील, चीन व ऑस्ट्रेलियामध्ये कापूस उत्पादकांना गरजेएवढे पाणी, गुणवत्तापूर्ण वाण, हवी तशी लांबी व ताकदीची रुई निर्माण करणारी यंत्रणा, वाण तेथील सरकारने दिले आहेत. भारतात, असे मागील अनेक वर्षांत झालेले नाही. पावसातील अनियमितता आणि सिंचनाच्या सुविधांसह गुणवत्तापूर्ण वाणांचा अभाव यामुळे भारत उत्पादकता, उत्पादनात मागे पडला आहे. यंदा तर चिंताजनक स्थिती आहे. एका कापूस उत्पादकाला २० ते २५ क्विंटल कापूस पिकला तर तो सरकारकडे अनुदान व इतर भरपाई कशाला मागेल हो? - दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com