हळद उत्पादनात भारत अग्रेसर

देशात यंदा हळद उत्पादनात २० हजार मेट्रिक टनाने वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच निर्यातदेखील वाढली आहे. परंतू हळद पावडरीची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून या माध्यमातून पावडरीची निर्यात करणे शक्‍य आहे. गटाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. - डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन, योजना कसबे डिग्रज, जि. सांगली
हळद उत्पादन
हळद उत्पादन

सांगली ः भारत जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के उत्पादन भारतात होते. गुणवत्ता चांगली असल्याने हळदीला देशांतर्गत आणि परदेशातही मोठी मागणी आहे. देशातून गेल्या पाच वर्षापासून हळदीची ८ ते १० टक्के निर्यात होत आहे. गेल्या वर्षी दाेन टक्‍क्‍यांनी वाढू होऊन १२ टक्के निर्यात झाली होती.  गेल्या काही वर्षांत जगभरात हळदीचा वापर वाढला आहे. आयुर्वेदाचा प्रसारही वाढला आहे. त्यामुळे देशातील हळदीला जगभरात मागणी वाढली आहे. बहुगुणी हळद मोठे परकीय चलन मिळवून देत आहे. यामुळे देशात दरवर्षी हळदीच्या क्षेत्रात १ ते २ टक्‍क्‍यांनी वाढ होते आहे. सन २००८-०९ च्या दरम्यान हळदीच्या उत्पादनात घट झाली होती. यामुळे हळदीला चांगला दर मिळाला. यामुळे देशात सन २०१३ पासून २०१६ पर्यंत हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यानंतर मात्र उत्पादनात वाढ झाल्याने दरात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. परिमाणी हळदीच्या क्षेत्रात घट होऊन उत्पादन तब्बल निम्म्याने घटले. देशातील उत्पादन जरी घटले असले तरी जगातील उत्पादन आणि निर्यातीचा आलेख कायम राहिला आहे. 

उत्पादन वाढण्याची शक्‍यता  गेल्या वर्षी देशातील हळद उत्पादन घेतल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे उत्पादनात घट झाली. परंतू यंदा वेळेत पावसाने हजेरी लावली. यंदा पीकही चांगले आहे. यंदाच्या हंगामात हळदीचे उत्पादन २० हजार टनाने वाढून देशात एकूण ४ लाख ६० हजार टन उत्पादन होण्याची शक्‍यता हळद संशोधन केद्राने व्यक्त केली आहे.  पूरक उद्योगांना प्रोत्साहन हवे  शासनाने हळद उत्पादकांसाठी प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान दिले आहे. मात्र, हे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचत नाही. यामुळे शेतकरी प्रक्रिया उद्योग करण्यासाठी पुढे येत नाहीत. मुळात व्यापाऱ्यांकडून हळदीची पावडर तयार केली जाते, आणि त्याची निर्यात केली जाते. पण हळद पावडर निर्यातीची संधी उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होते आहे. 

निर्यातीचे चित्र  गेल्या पाच वर्षांची हळद उत्पादनाची सरासरी विचारात घेतली तर भारतातून ८ ते १० टक्के निर्यात झाली आहे. मात्र, हळदीचा दर्जा चांगला असल्याने निर्यातीला अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे गेल्या वर्षी भारतातून हळदीची दाेन टक्‍क्‍यांनी निर्यात वाढली आहे.  प्रतिक्रिया कृषी विभागाने शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचा परवाना देण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे यासाठी गोदाम, निर्यातीच्या संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात.  - मनोज पाटील, हळद उत्पादक, पोखर्णी, ता. वाळवा, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com