पाकिस्तानला केळी निर्यातीवर भारतीय निर्बंध

पाकिस्तानला केळी निर्यातीवर भारतीय निर्बंध
पाकिस्तानला केळी निर्यातीवर भारतीय निर्बंध

जळगाव : केळीच्या जम्मू व काश्‍मीरमार्गे पाकिस्तानात होणाऱ्या निर्यातीवर केंद्र सरकारच्या सुरक्षा व इतर यंत्रणांनी निर्बंध आणल्याने दर महिन्याला सुमारे एक हजार मेट्रिक टन केळीची निर्यात ठप्प आहे. परिणामी, केळीच्या दरांवरही दबाव आहे. यासंदर्भात केळी उत्पादक महासंघ व काही निर्यातदार लवकरच केंद्राच्या अखत्यारीमधील विदेश व्यापार विभाग, संरक्षण मंत्रालय आणि कृषी मंत्रालयास साकडे घालणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील केळीची अधिकाधिक निर्यात ही पाकिस्तान व अफगणिस्तानला होत आहे. रावेर व यावल तालुक्‍यातील ५० टक्के केळीचे खरेदीदार पाकिस्तान व अफगणिस्तानमधील व्यापारी असून, यामुळेच सावदा (ता. रावेर) येथून आपल्याकडे केळीचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी काश्‍मिरातील व्यापाऱ्यांनी कार्यालयेदेखील सुरू केली आहे. तसेच दिल्ली येथील नामांकित व्यापारीही जळगावमधील केळीची खरेदी करून तिची पाठवणूक जम्मू व काश्‍मिरातील व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने पाकिस्तानात करीत आहेत. यामुळे मागील वर्षभर केळीचे दर टिकून आहेत. दर्जेदार केळीला ऑनचे दरही मिळत होते.

जम्मूमधील पूंछ व श्रीनगर येथील सीमेवरून केळीची पाठवणूक केली जाते. विदेश व्यापार विभाग संरक्षण यंत्रणांच्या परवानगीने दीड महिन्यापूर्वी आठवड्यातून चार दिवस प्रतिदिन २० ट्रक केळी पाठविण्याची मंजुरी होती. एका ट्रकमध्ये सुमारे १८ मेट्रिक टन केळी असते. म्हणजेच आठवड्याला किमान ८० ट्रक (सुमारे १४४० मेट्रिक टन) केळी पाकिस्तान व पाकिस्तानमधून पुढे अफगणिस्तानात जात होती. १५ व १३ किलो क्षमतेच्या बॉक्‍समध्ये केळी भरून पाठविली जाते.

श्रीनगर व जम्मू येथील व्यापारी त्यासंबंधीची मध्यस्थी करीत होते. देवाण-घेवाण धोरण या निर्यातीसाठी होते. ते अजूनही कायम आहे. अर्थातच केळी पाठविली तर त्या बदल्यात पाकिस्तानमधून बदाम, मसाले, कापड आदींचा पुरवठा केळी मधस्थ असलेल्या जम्मू - काश्‍मिरमधील व्यापाऱ्यांना व्हायचा. अशातच मध्यंतरी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) जम्मू व काश्‍मिरात संशयास्पद हालचाली आढळल्याने छापेमारी केली, काही व्यापाऱ्यांकडे तपासणी केली. यानंतर खबरदारी म्हणून आठवड्यात फक्त चार दिवस प्रतिदिन पाच ट्रक केळीच पाठविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. दिवसाच ही वाहतूक करायच्या सूचना आहेत. अर्थातच सध्या आठवड्यात चार दिवस फक्त ३६० मेट्रिक टन केळीची निर्यात पाकिस्तान व अफगणिस्तानात होत आहे. जी केळी पाकिस्तान व अफगणिस्तानात पाठविली जाते त्यात सावदा येथील व्यापारी व निर्यातदार यांची ७० टक्‍के केळी असते. तसेच बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील निर्यातदारांची ३० टक्के केळी असते. सीमेवर तणाव असला की अनेकदा निर्यात बंद केली जाते. असा प्रकार मगीाल दीड महिन्यात वाढला आहे. जी केळी आपण जळगावमधून घेऊ ती पुढे पाकिस्तानला जाईलच याची श्‍वाश्‍वती, हमी नसल्याने जम्मू व काश्‍मिरचे व्यापारी खरेदी व आगाऊ नोंदणीबाबत हात आखडता घेऊ लागले आहेत.

जहाज व इराणचा पर्याय केळीची जम्मू व काश्‍मिरातून पाकिस्तानात रस्त्याने होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध आल्याने निर्यातदार जहाजाद्वारे केळी इराणमधील अब्बास बंदर व पाकिस्तानच्या कराची बंदरावर पाठवीत आहेत. जहाजाद्वारे निर्यातीसाठी अधिक खर्च व अडचणीही असून, यात प्रथम केळी जळगाव येथून १० टन क्षमतेच्या ट्रकने भरून आणल्यानंतर नाशिक किंवा मुंबईतील प्रीकूलिंग चेंबरमध्ये साठवावी लागते. मग जहाजाचे वेळापत्रक मिळाल्यानंतर २० टन क्षमतेचा कंटेनर उपलब्ध करून घ्यावा लागतो. कूलिंग चेंबरमधून केळी कंटेनरममध्ये भरल्यावर ती मुंबई येथील न्हावाशेवा बंदरावर पाठविली जाते. या बंदरावरून तिची पाठवणूक इराण व पाकिस्तानला होत आहे. अफगणिस्तानमध्ये केळी पाठवायची असल्यास ती इराणच्या अब्बास बंदरावर पाठवावी लागत आहे. निर्यातीची ही कार्यवाही फक्त बऱ्यापैकी वित्तीय क्षमता असलेले निर्यातदार करू शकत आहेत. जम्मू व काश्‍मिरातून केळी पाठविण्यास जेवढा खर्च लागतो, त्या तुलनेत जहाजाने केळी पाठवायचा खर्च किलोमागे किमान तीन रुपयांनी वाढला आहे. १५ किलोच्या बॉक्‍सचाच वापर जहाजाच्या कंटनेरसाठी केला जातो. जहाजाने पाकिस्तानातील कराची येथे १० दिवसांत केळी पोचते. कारण पाकिस्तानसाठी जहाजाने रोज मालाची वाहतूक होत नाही. तर जम्मू- काश्‍मिरातून पाकिस्तानात रस्त्याने पाचच दिवसांत केळी पोचू शकते.

केंद्रीय संस्थांनी पाकिस्तानमध्ये जम्मू व काश्‍मिरमार्गे रस्त्याने होणाऱ्या केळी वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. आता आठवड्यात चारच दिवस फक्‍त २० ट्रक केळी तेथे पाठविता येते. यामुळे निर्यातदारांना जहाजाद्वारे केळी पाठवावी लागत असून, त्याचा खर्च वाढला आहे. परिणामी, केळी उत्पादकांनाच याचा फटका बसण्याची वेळ आली आहे. - प्रशांत धारपुरे, केळी निर्यातदार, पुणे

केळीची जम्मू व काश्‍मीरमार्गे रस्त्याने पाकिस्तानात होणारी वाहतूक रखडत सुरू आहेत. त्याचा फटका केळी उत्पादकांनाच बसत आहे. सध्या उष्णता असल्याने तीन दिवसांत केळी कापणीसाठी तयार होते. कापणी जशी रखडते, तसा बाजारावरही त्याचा परिणाम होतो. याप्रश्‍नी आम्ही केंद्रीय कृषी व विदेश व्यापार विभागाला भेटणार आहोत. - भागवत विश्‍वनाथ पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com