देशी गाईंच्या संशोधनासाठी आयआयटींचा पुढाकार : डाॅ. विजय भटकर

देशात रासायनिक घटकयुक्त अन्नधान्ये व दुधाचा वापर होत असून, कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या समस्यांवर देशी गाय हा एक चांगला उपाय आहे - डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
सकाळ प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या देशी गाेवंश या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) झाले. या वेळी (डावीकडून) आदिनाथ चव्हाण, डॉ. भटकर, प्रतापराव पवार आणि डॉ. नितीन मार्कंडेय.
सकाळ प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या देशी गाेवंश या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) झाले. या वेळी (डावीकडून) आदिनाथ चव्हाण, डॉ. भटकर, प्रतापराव पवार आणि डॉ. नितीन मार्कंडेय.

पुणे : कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘देशी गोवंश’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुप्रजननशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मार्कंडेय, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.  डॉ. भटकर म्हणाले, कि देशी गाईंच्या जाती, वैशिष्ट्ये, संवर्धन याबाबत अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक सकाळ समूहाकडून प्रकाशित होत असल्याचा मला आनंद होतो आहे. मी स्वतः देशी गाईंचा अभ्यास करत असून, आयआयटीमधील पाच कृती गटांतील जवळपास १०० वैज्ञानिक सध्या देशी गाय आणि शेती, आरोग्य आणि विज्ञान यावर संशोधन करत आहेत. देशी गाईंच्या दुधासह पंचगव्यावरील संशोधनाचे निष्कर्ष क्रांतिकारी स्वरूपाचे असतील.  ‘‘देशात रासायनिक घटकयुक्त अन्नधान्ये व दुधाचा वापर होत असून, कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या समस्यांवर देशी गाय हा एक चांगला उपाय आहे. भारतीय संस्कृतीत गाईला महत्त्व आहे, कारण गाईत विज्ञान, अध्यात्म आणि धर्म असून, गोसंवर्धनाचे महत्त्व एकात्मिक पद्धतीने समजावून घेण्याची आवश्यकता आहे,’’ असेही डॉ. भटकर यांनी नमूद केले. 

प्रतापराव पवार म्हणाले, कि गाईंच्या ए-१ आणि ए-२ दुधावर चर्चा होते आहे. या विषयावर धर्म व राजकारण न आणता संशोधन व्हावे. वैज्ञानिक युगात आपापल्या मतांनी या विषयाकडे प्रत्येकाने बघावे. या विषयाची उपयुक्तता पाहूनच ‘सकाळ’ने वैज्ञानिक अंगाने देशी गोवंशाची माहिती पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणली आहे. ‘‘समाजातील विविध समस्यांवर केवळ टीका न करता प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची परंपरा ‘सकाळ’कडून  जोपासली जाते आहे. तनिष्का, सकाळ रिलीफ फंड, ‘अॅग्रोवन’ हे उपक्रम याच परंपरेची रूपे आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना हवी असलेली कृषी सामग्री, तसेच सल्ला थेट बांधापर्यंत पोचविण्याऱ्या एका प्रकल्पावर सकाळचे काम सुरू आहे,’’ असेही श्री. पवार यांनी नमूद केले.  पुस्तकाचे संकलक व संपादक डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, कि देशी गोवंशावर ‘सकाळ’कडून प्रसिद्ध होत असलेले हे पुस्तक शेती आणि समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे. धर्मविरहीत आणि सकारात्मक अंगाने देशी गाईंचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार व्हावा, कारण गाय हा आपल्या जीवनात समृद्धी आणणारा घटक आहे. ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध होत असलेल्या विषयांवर आधारित विविध विषयांवरील पुस्तके, तसेच उपक्रमांची माहिती दिली. 

या पुस्तकातील लेखक डॉ. सतीश दिग्रसकर, डॉ. मिलिंद वैद्य, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. गायत्री राजूरकर, मिलिंद देवल, ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे, तसेच आदर्श गोपालक चंद्रकांत भरेकर, यतीन गुप्ते, आनंद उंडे, परमेश्वर तळेकर यांचा सत्कार डॉ. भटकर व श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ऐश्वर्या कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com