agriculture news in Marathi, is inflation increased by only MSP, Maharashtra | Agrowon

महागाई फक्त हमीभावानेच वाढते का ?
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देण्याचे अाश्वासन दिले आणि असोचेम व रिझर्व्ह बॅंकेने महागाईवाढीची ओरड सुरू केली. मुळात सर्वच गोष्टींचे दर वाढत असताना शेतमालच का फुकट विकावा? कृषी निविष्ठांचेही दर गगनाला भिडले. शेतकऱ्यांनी तोट्याची शेती कुठपर्यंत करावी. जेव्हा सरकारी नोकरांना वेतन आयोग लागू होतो, बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात, तेव्हा महागाई वाढत नाही का? शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ येते, तेव्हाच अशी ओरड का सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळालाच पाहिजे. महागाई फक्त शेतमालाच्या हमीभावावरूनच वाढते का?

सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देण्याचे अाश्वासन दिले आणि असोचेम व रिझर्व्ह बॅंकेने महागाईवाढीची ओरड सुरू केली. मुळात सर्वच गोष्टींचे दर वाढत असताना शेतमालच का फुकट विकावा? कृषी निविष्ठांचेही दर गगनाला भिडले. शेतकऱ्यांनी तोट्याची शेती कुठपर्यंत करावी. जेव्हा सरकारी नोकरांना वेतन आयोग लागू होतो, बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात, तेव्हा महागाई वाढत नाही का? शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ येते, तेव्हाच अशी ओरड का सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळालाच पाहिजे. महागाई फक्त शेतमालाच्या हमीभावावरूनच वाढते का? अशा प्रतिक्रिया राज्यभरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

नोकरदारांना प्रत्येक वर्षी ठरलेल्या प्रमाणे महागाई भत्ता मिळत असून, त्यामध्ये वाढही होते. मात्र, शेतीमालाच्या दरात वाढ होत नाही. दरामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने धोरण आखले पाहिजे. मात्र, त्यापद्धतीने शासन धोरण आखताना दिसत नाही. शेतकऱ्यांना शेतीमाला दीडपट हभीमाव मिळालाच पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या रहाणीमानात बदल होईल. मुळात व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात शेतीमालाची खरेदी करतो. व्यापारी शेतीमालाची साठेबाजी करतो आणि अधिक दरात विक्री करतो. शासनाचे व्यापाऱ्यांवर नियंत्रण नाही, त्यामुळे शेतकरी प्रत्येक शेतीमालाची विक्री तोट्यात करतोय. महागाई वाढण्यास शासन आणि व्यापारीच कारणीभूत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव दिलाच पाहिजे.
- कृषिभूषण, संजीव माने, आष्टा, जि. सांगली

मुळात ज्या प्रकारे एखादी कंपनी उत्पादित करीत असलेल्या उत्पादनाची किंमत ठरवते. त्याचप्रमाणे शेती उत्पादनांची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळायला हवा. म्हणजे, दीडपट हमीभावामुळे महागाई वाढेल हे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही. बाजारात इतर सगळ्या वस्तू, उत्पादनांच्या किमती नित्यनियमाने वाढत असताना शेतकऱ्यांना दोन पैसे मोजायची वेळ आली, की या लोकांच्या पोटात का मळमळते हेच समजत नाही. शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात खरेदी करायचे आणि ग्राहकांना चढ्यादराने विक्री करायचे ही व्यापारी मनोवृत्ती घातक आहे. मधल्यामध्ये हेच व्यापारी शेतकऱ्याला, ग्राहकाला आणि देशाला लुबाडत आहेत. अशा व्यापारी वृत्तीचे लोक आता दीडपट हमीभावामुळे महागाई वाढेल असे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करीत आहेत. 
- यज्ञेश सावे, शेतकरी, बोर्डी, ता. तलासरी, जि. पालघर

शेतमालास हमीभाव हा उत्पादन खर्चाच्या आधारावर काढला जातो. यामुळे हमीभाव आणि महागाई वाढण्याचा काहीही संबध येत नाही. दीडपट हमीभावास विरोध करून शेतकऱ्यांना दाबून ठेवायाचे, हे व्यापाऱ्यांचे षड्‍यंत्र आहे. शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास शेतकऱ्यांचा उत्साह वाढेल, त्यातून उत्पादनवाढ होण्यास मदत होणार आहे.
- जयाजीराव मोहिते, शेतकरी, तळबीड, जि. सातारा

महागाईचा सगळा भार आमच्यावरच का? उत्पादन खर्चही मिळत नसताना आमच्या शेतीमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्यास महागाई कशी वाढेल, हेच कळत नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव रोज वाढत आहेत. ही महागाई शेतकऱ्याला नाही का? गॅस, लोखंड, कपडे, शालेय वस्तू या सगळ्याचेच भाव मागच्या आठ- दहा वर्षांत भरमसाट वाढले व अजूनही वाढतच आहेत. फक्त शेतमालाचे भाव वाढले नाहीत. आज शंभर रुपये किमतीचा भाजीपाला पिकवायला आम्हाला कमीतकमी ८० रुपये खर्च येतो. त्याचे शंभर रुपये मिळतीलच ही गॅरंटी कोण देणार? कधी कधी तर भाजीपाला फेकून द्यावा लागतो, तेव्हा कुठे जाते महागाई? दहा वर्षांपूर्वी द्राक्षाचे दर किलोला १२ ते २० रुपये होते. आज ही एखादे वर्ष अपवाद सोडला तर तोच भाव शेतकऱ्याला मिळतोय.
- सुनील देशमुख, कसबे सुकेणे, ता. निफाड, जि. नाशिक

व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांचा माल खरेदी करून दुप्पट भावात विकतात, तेव्हा महागाई वाढत नाही काय? एकदा शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देऊन पाहा, मग बघू किती महागाई वाढते ती. होऊ द्या एकदा शेतकरी सुखी. असं म्हणतात ना, शेतकरी सुखी, तर जग सुखी !
- विजय इंगळे, शेतकरी, चितलवाडी, जि. अकोला

पै-पैचा हिशेब ठेवणाऱ्या व्यापारी आणि त्यांच्या संघटनेला शेतकऱ्यांना नफा मिळणार ही कल्पना शासनाने मांडताच त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्याला आरबीआयने दुजोरा द्यावा ही समस्त भारतातील शेती आणि शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. कोणताही व्यापारी नफा मिळाल्याशिवाय व्यवसाय करीत नाही. मग आमच्याकडूनच ही अपेक्षा का? खते, बियाणे, मजुरी, कुटुंबाचा उदरनिर्वाह खर्च वाढलाय. शेती आतबट्ट्याचा व्यवसाय ठरतोय. आज शेतकऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा राहिली नाही. शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत. ग्रामीण भागात नैराश्याचे वातावरण आहे. ब्रॅंडेड वस्तू व उच्च जीवनमान जगणाऱ्या व्यापारी वर्गास शेतकऱ्यांच्या भावना समजतील तो सुदिन समजावा.
- गणेश श्यामराव नानोटे, शेतकरी, निंभारा, जि. अकोला 

बाजारातील तेजी-मंदी, महागाई याचा विचार करून नोकरदारांना सहाव्या, सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. पण, शेतकऱ्यांचा विचार कोणीच करत नाही, आता कुठे दीडपट हमीभावाचा विषय आला की लगेच रिझर्व्ह बँकेला महागाई वाढेल, असा साक्षात्कार झाला. मुळात सरकारलाच हा भाव द्यायचा की नाही, याबाबत शंका वाटते आहे. सरकारची द्यायची तयारी असताना रिझर्व्ह बँक अशा पद्धतीने फाटे फोडत असेल, तर रिझर्व्ह बँकेच्या आडून सरकार काही खेळी करत नसेल कशावरून? या प्रश्नात सरकारच्या हेतूवरच शंका वाटते.
- रमेश कचरे, शेतकरी, तेलंगवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर

केंद्र सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. परंतु असोचेमने महागाई वाढेल असा फुकटचा सल्ला दिलाय. मात्र, रिझर्व्ह बॅंकेनेही ही शक्‍यता व्यक्‍त का केलीय? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने तो आहे तिथंच खितपत पडून संपत चाललाय. व्यापार मात्र वाढतच चाललाय. जर तो बुडायला लागला, की मोठं कर्ज किंवा कर्जमाफी देण्याचं धोरण घेताना रिझर्व्ह बॅंक त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, हे बरोबर नाही, असं का म्हणत नाही? सरकारने या सर्व व्यवस्थांना फटकारून शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावं, अन्यथा आपल्याला कृषिप्रधान देश व आपली अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, असं म्हणण्याचा अधिकारच उरणार नाही.
- ज्ञानोबा भागवतराव तिडके, शेतकरी, पांगरी, ता. परळी, जि. बीड 

शेतकऱ्याने पिकवायचे आणि त्याचा माल अगदी अल्प दरात व्यापारी, खरेदीदारांनी घ्यायचा, असा प्रकार देशात अनेक वर्षे सुरू आहे. शेतकऱ्यांची अरबो रुपयांची लूट झाली, ती थांबतच नाही. त्यांना हमीभावही मिळू नये, हा प्रकार कृषिप्रधान भारतात लज्जास्पद आहे. दीडपट हमीभाव मिळाला नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होतच राहील. कर्जमाफी, आत्महत्या हे प्रश्‍न कायम राहतील. कितीही पॅकेज, कर्जमाफी मिळाली, तरी शेतकऱ्याची स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे प्रथम शेतकऱ्याला जो खर्च लागतो तो पूर्ण निघून त्याला नफा हा सुटलाच पाहिजे. कुठला व्यापारी, अडतदार, उद्योजक तोट्यात व्यवसाय करतो? फक्त शेतकरीच तोट्यात शेती करीत आहे, याचा विचार सर्व व्यापारी, संघटना, देशाच्या वित्तीय संस्था यांनी करायला हवा.
- गोकूळ पाटील, शेतकरी, चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले आणि लगेच रिझर्व्ह बॅंकेच्या पोटात दुखू लागले. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जिवावर बॅंका उभ्या राहत आहेत. मुळात रिझर्व्ह बँकेने महागाईची काळजी कशाला करावी? कारखानदार, उद्योगपती, मोठे व्यवसायिक आणि सर्रासपणे बॅंकेचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशांत पळ काढणाऱ्या कर्जबुडव्यांमुळे महागाई वाढत नाही का? बॅंकेने त्यांच्याकडून वसुली कशी करता येईल, याची काळजी करावी. ज्या वेळी शेतकऱ्यांना पैसे मिळू लागतील, त्या वेळी महागाई वाढल्याची बोंब होते आणि मातीमोल दराने विकावे लागते, त्या वेळी ही मंडळी बोलत नाहीत. 
- जगन्नाथ कोरडे, शेतकरी, प्रवरा संगम, ता. नेवासा, जि. नगर, 

शेतमालाच्या किमतीत वाढ हेच महागाईवाढीचे कारण, असे आरबीआयचे म्हणणे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार आहे. शासकीय नोकरदारांना वेतन आयोगाची खिरापत वाटली जाते, त्या वेळी रिझर्व्ह बॅंक चुप्पी साधते. इतरही अनेक कारणे महागाईवाढीसाठी असताना ती दुर्लक्षित करून केवळ शेती आणि शेतकऱ्यांच्या शोषणाचाच विचार सारी यंत्रणा करते, हे रिझर्व्ह बॅंकेच्या या विधानावरून स्पष्ट होते. लोकांच्या मनात भयगंड निर्माण करून सामाजिक असंतोष निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे.
- रवी मारशेटवार, शेतकरी, वाशीम

जेव्हा मोबाईल, एलईडी, वाहने, नामांकित कंपनीचे कापड, देशी विदेशी दारू, सुगंधी अत्तरे, नामांकित पादत्राणे, माॅलमधील उत्पादने, हाॅटेल ह्यांचे भाव वाढतात तेव्हा महागाई वाढत नाही का? लोकप्रतिनिधी पगार वाढीचे विधेयक चर्चा न करता संमत करतात. सातवा वेतन आयोग लागू करताना कोणालाही त्रास झाला नाही. लायकीपेक्षा पगार जास्त झाला तर कोणी नकार देत नाही. परंतु, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कधी नव्हे एकदा हमीभावाची नुसती चर्चा झाली तर शेतकरी सोड़ून सगळ्यांच्या पोटात गोळा उठला. शासन दरवर्षी महागाईभत्ता कशासाठी वाढवून देते, आज शेतकरी मित्रांना जागे होण्याची वेळ आली आहे.
- दीपक जोशी, पैठण, जि. औरंगाबाद

शेतमालास दर मिळत नसल्याने आज शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शेतमालास दीडपट हमीभाव देणे आवश्‍यक झाले आहे. मात्र फुकटखाऊ मंडळी दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल अशी ओरड करत आहेत. ही ओरड करणारी मंडळी शेतमाल सोडून सर्व गोष्टी महाग घेण्यास विरोध करत नाहीत. शरीराच्या बाह्यअंगास वाटेल तेवढा खर्च करण्यास तयार असतात; मात्र शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या अन्नधान्याने माणूस जीवन जगत असतो, अशा गोष्टींना योग्य दर दिला जात नाही. यामुळे समाजात समानता येत नाही. शेतमालास हमीभाव दीडपट दिला तरच सर्व समाजात समानता येणार आहे.
- मनोहर साळुंखे, कृषिभूषण शेतकरी, नागठाणे, जि. सातारा

शेती क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांत उत्पादन किमतीच्या दुपटीने वस्तूंची विक्री केली जाते. शेतकरी शेतात कष्ट करतो. शेतीमालाला दर मिळाला नाही, की आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. नेहमीच शेतकऱ्यांवर अन्याय का? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव मिळाला तर कुठे बिघडले? शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर दीडपट दर मिळाला तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल. शेतीमालाचे दर दीडपड वाढल्यास महागाई वाढणार नाहीच.
- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...