दुष्काळामुळे जळालेल्या फळबागांची माहितीच उपलब्ध नाही !

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा मात्र दुष्काळाने फळबाग उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. फळबागा वाचवण्यासाठी प्रशासकीय व सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही. नुकसानीची माहिती कृषी विभागाकडे नसणे तशी गंभीर बाब आहे. - साईनाथ घोरपडे, शेतकरी, भोसे, ता. पाथर्डी, जि.नगर.
दुष्काळामुळे जळालेली फळबाग
दुष्काळामुळे जळालेली फळबाग

नगर ः जिल्ह्यात गंभीर दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका बसला. अनेक बागा केवळ पाण्याअभावी जळून गेल्या. मात्र यंदा नेमक्या किती हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले याची ठोस माहिती ना कृषी विभागाकडे आहे ना जिल्हा प्रशासनाकडे. फळबागांच्या नुकसानीची माहिती ठेवणे हे आमचे काम नाही कृषी विभागाचे आहे, असे सांगून प्रशासन हात झटकते, तर पंचनामे आम्ही केले नाहीत, त्यामुळे आमच्याकडे अहवाल आले नाहीत, असे सांगून चक्क कृषी विभागही जबाबदारी झटकत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या फलोत्पादक शेतकऱ्यांची कृषी विभागाने फारशी दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस ते तीस हजार हेक्टरच्या जवळपास फळबागा वाया गेल्या आहेत. 

नगर जिल्ह्यात पारनेर, नगर, पाथर्डी भागांत संत्रा, मोसंबी, श्रीगोंदा, कर्जत भागात लिंबू, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, शेवगाव भागात डाळिंब, सीताफळाचे क्षेत्र अधिक आहे. पाऊस नसल्याने यंदा पाणी उपलब्ध नाही. अनेक भागांत दिवाळीपासून म्हणजे तब्बल सहा महिन्यांपासून फळबागा जगवण्यासाठी विकतचे पाणी घालत आहेत. फळबागा जळाल्या, ज्या उरल्या त्यांना वाचवण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी अजूनही सुरूच आहे. अनेक वर्षांपासून जोपासलेल्या बागा जळू नयेत, यासाठी बहार धरण्याऐवजी केवळ बागा जगवण्यावर भर दिला. मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांच्या बागा जागेवर जळाल्या. त्याची मात्र सरकार अथवा कृषी विभागाने फारशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

गेल्या सहा महिन्यांच्या काळात किती हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जळाल्या याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कृषी विभाग अथवा महसूल विभागाकडे माहिती नसल्याचे दिसून आले आहे. नुकसानीची नोंद ठेवण्याची जबाबदारी तशी कृषी विभागाची आहे. मात्र भर दुष्काळात येथील कृषी विभागाचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय’ असाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल प्रशासनाने पंचनामे केले, त्यामुळे आमच्याकडे नुकसानीचा आकडा नाही, महसूल प्रशासनाकडे आहे, असे कृषी विभागातून सांगितले जाते. ‘फळबागांच्या नुकसानीची आकडेवारी ठेवण्याची जबाबदारी आमची नाही’ असे महसूल प्रशासन सांगत आहे. 

नगर जिल्ह्यातील  फळबागांचे क्षेत्र (हेक्टर)
आंबा २३,९३० (कलमे व रोपे)
काजू ५४८
नारळ   १०९३
चिकू १२०५१
संत्रा १४९८
मोसंबी ३८०३
पेरू  ५२२४
डाळिंब  ११९३७
बोर  ६३१६
सीताफळ ६३५१
चिंच  ५०५०
अंजीर  ३८८
कागदी लिंबू ७६५९
जांभूळ ४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com